Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या 4 टेस्ट निगेटिव्ह, पण आजींना झाला भलताच आजार; कळलंच नाही की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 18:40 IST

कोरोना नाही म्हणून आनंदी झालेल्या 72 वर्षांच्या आजींना काही दिवसातच आपल्या जगण्याची शाश्वती राहिली नाही...

ठळक मुद्देकोरोना नाही म्हणून आनंदी असलेल्या ज्यूली स्मिथ यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं.  आपल्याला काहीच झालं नाही याचा आनंद साजरा करणाऱ्या ज्यूली स्मिथ यांच्या जगण्याची शाश्वती नाही. 

ज्युली  स्मिथ 72 वर्षांची आज्जीबाई. इंग्लडमधील वेल्स्येथील पाॅण्टिप्रिड या शहरात राहातात. बटलिन या समुद्र किनाऱ्यावरील रिसाॅर्टमध्ये मुला नातवंडांसोबत मज्जा करुन घरी आल्या. रिसाॅर्टमध्ये असताना पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला. तिथेच त्यांना खोकला झाला. पण कोरोना प्रतिबंधक लसींचा डोस पूर्ण केला असल्याने त्या निर्धास्त होत्या. पण खोकला काही थांबत नव्हता. सोबत तोंडाची चवही गेलेली. झाला असेल कोरोना , पण होईल सर्व ठीक म्हणत स्मिथ आजी आपल्या नेहमीच्या डाॅक्टरांकडे गेल्या. कोविड  टेस्ट केली गेली. पण तीही नाॅर्मल आली. डाॅक्टर म्हणाले, ' बिनधास्त राहा, काहीही झाले नाही!' डाॅक्टरांच्या बोलण्यानं आणि कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानं स्मिथ आजी खूष होत्या.

पण खोकला थांबत नव्हता, तोंडाची चवही गेलेलीच. पुन्हा डाॅक्टरांकडे गेल्या. पुन्हा कोविड टेस्ट. तीही निगेटिव्ह. अशा कोविडच्या चार टेस्ट केल्या गेल्या. चारही निगेटिव्हच. मग डाॅक्टरांना शंका आली म्हणून पुढील तपासण्या केल्या गेल्या. त्यात त्यांना शेवटच्या स्टेजचा फुप्फुसांचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. लक्षण काय तर फक्त खोकला आणि तोंडाची चव गेलेली पण निदान मात्र  फुप्फुसाच्या कॅन्सरचं... तोही शेवटच्या स्टेजचा.

Image: Google

स्मिथ आजी सन 1989पर्यंत धूम्रपान करत होत्या. पण 1989पासून त्यांनी धूम्रपान करणं सोडलं. ज्यूली सिम्थ यांचा  पहिला पतीशी घटस्फोट झालेला. पण आपल्या दुसऱ्या पतीसोबत त्या आनंदानं राहात होत्या. मुलं नातवंडामध्ये रमल्या होत्या. काहीच महिन्यांपूर्वी त्यांच्या पहिल्या पतीचं फुप्फुसाच्या कॅन्सरनं निधन झालं. त्याचा धक्का ज्यूली यांना बसला होता. पण आपल्याबाबतीतही तेच असेल याची  त्यांनी कल्पनाही केली नव्हती. 

स्मिथ आजींचा फुप्फुसाचा कॅन्सर हा लसिका ग्रंथी आणि हाडांपर्यंत पसरला असून त्यांना यातून बाहेर काढणं अशक्य असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे. इतर कोणताही कॅन्सर असेल तर त्याचं लवकरच्या टप्प्यात निदान होवून रुग्णाचा जीव वाचतो. पण फुप्फुसाच्या कॅन्सरमध्ये निदान खूप उशिरा तर कधी शेवटच्या टप्प्यात होतं. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणं अशक्य होतं. असं वेल्स येथील डाॅक्टरांचं म्हणणं आहे. स्मिथ आजींच्या बाबतीतही असंच झालं. वेल्सयेथील डाॅक्टर फुप्फुसाच्या कॅन्सरचं पहिल्या टप्प्यात निदान करणारं स्कॅनिंग उपलब्ध असण्याची मागणी करत आहेत. 

Image: Google

सध्या स्मिथ आजींवर केमोथेरेपी सुरु आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर इम्युनोथेरेपीही सुरु आहे. या थेरेपीने कॅन्सरशी लढण्याची त्यांची प्रतिकारशक्ती वाढून थोडं अधिक जगता येईल अशी स्मिथ यांची आणि त्यांच्या डाॅक्टरांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरल