Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकाच्या पदवीदान समारंभात सुप्रिया सुळेंनी नेसली भारतीय हातमाग परंपरेतली साडी, एका खास मैत्रीणीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 16:21 IST

Kasuti Kanjivaram Saree: सुप्रिया सुळे यांनी नेसलेल्या कासुती साडी, वैभवशाली हातमाग परंपरेचा सुंदर वारसा

लेकाचं ग्रॅज्युएशन ही कोणत्याही आईसाठी आयुष्यभर अभिमानानं मिरवावी अशी आनंदी घटना. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलाने नुकतीच न्युयॉर्क विद्यापीठातून एमबीए या विषयात पदवी मिळवली. त्याच्या पदवीदान सोहळ्यासाठी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पारंपरिक भारतीय पोशाख त्यांनी या कार्यक्रमासाठी निवडला. तशीही त्यांची साड्यांची निवड अप्रतिम असते. कॉटन-लिनन-सिल्क साड्या त्या निवडतात, दिसायला अगदी साध्या पण अत्यंत क्लासी दिसणाऱ्या साड्या.  आताही लेकाच्या कौतूक सोहळ्यासाठीही त्यांनी नेसलेली साडी अतिशय खास होती. ती साडी त्यांच्या एका खास मैत्रीणीनं भेट दिल्याचं त्यांनीच सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं. कासुती कांजीवरम प्रकारातली ही साडी अतिशय सुंदर असून तिचं नेमकं वेगळेपण काय ते पाहुया...

 

ही खास कासुती साडी सुप्रिया सुळे यांना एका खास मैत्रीणीने म्हणजेच द्रमुक नेत्या कानीमोझी यांनी दिल्याचे आणि या आनंदी प्रसंगी त्या साडीची घडी मोडल्याचे त्या सांगतात. अत्यंत देखणी अशी ही पारंपरिक साडी भारतीय हातमागाची वैभवशाली कहाणीच सांगते.

कासुती साडीची खासियत काय?

करड्या रंगाकडे वळणारा हिरवट रंग आणि निळे काठ अशा रंगसंगतीची साडी सुप्रिया सुळे यांनी नेसली होती. ही साडी कासुती कांजीवरम साडी म्हणून ओळखली जाते. ही साडी मुळची कर्नाटकची असून कर्नाटकी भरतकामाचा उत्तम नमुना कासुती साड्यांवर दिसून येतो. कर्नाटकच्या धारवाड प्रांतात कासुती साड्या प्रामुख्याने तयार केल्या जातात. वरवर पाहता कासुती, धारवाड आणि इरकल या साड्या सारख्या वाटत असल्या तरी त्यांच्यात फरक आहे. धारवाड आणि इरकल हा साडीच्या सुताचा म्हणजेच फॅब्रिकचा प्रकार आहे. तर कासुती ही एक वीणकामाची कला आहे. कर्नाटकचं हे पारंपरिक वीणकाम ज्या साडीवर असतं ती साडी कासुती साडी म्हणून ओळखली जाते. 

 

त्यामुळेच इरकल, धारवाड याप्रमाणचे कांजीवरम साड्यांवरही कासुती काम दिसून येतं. यामध्ये सुती धागे वापरून काम केलं जातं आणि हत्ती, पालखी, कमळ, चौकडा असे काम प्रामुख्याने दिसते. कर्नाटकला तर नववधूंकडे एक तरी कासुती प्रकारातली साडी असतेच. सुप्रिया सुळेंनी नेसलेल्या साडीवरही हेच कासुती काम दिसून येतं. पण मूळ साडी कांजीवरम असल्याने कासुती कांजीवरम अशी तिची ओळख आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule dons handloom saree at son's graduation, gift from friend.

Web Summary : Supriya Sule wore a special Kasuti Kanjivaram saree gifted by DMK leader Kanimozhi at her son's graduation. The saree, a symbol of Indian handloom, features traditional Kasuti embroidery from Karnataka, showcasing elephants, lotuses, and palanquins.
टॅग्स :सोशल व्हायरलसाडी नेसणेसुप्रिया सुळेकर्नाटक