जोपर्यंत काही खाण्याची किंवा पिण्याची वेळ येत नाही, तोपर्यंत आपण आरामात मास्क लावून बसू शकतो. पण जेव्हा काही खायचं असतं किंवा पाणी प्यायचं असतं, तेव्हा मात्र मास्क एकतर काढून टाकावा लागतो किंवा मग सरळ त्याच्या दोऱ्या कानात अडकवलेल्या असतानाच तो ओढून हनुवटीखाली आणावा लागतो.. अशी सगळी अडचण तर होतेच आणि नेमका याच वेळेला म्हणजे मास्क खाली ओढलेला असतानाच कोरोना (corona) संसर्ग होण्याचीही भीती असतेच..
यावर एक भन्नाट उपाय शोधलाय दक्षिण काेरियातील एका कंपनीने. त्यांनी “kosk” या नव्या प्रकारच्या मास्कची निर्मिती केली आहे. दक्षिण कोरियामध्ये नाकाला ko म्हणतात. त्यामुळे नाकाचा मास्क म्हणून हा “kosk”. हा मास्क केवळ तुमचे नाक कव्हर (mask that covers your nose only) करतो. त्यामुळे तुम्ही मास्क लावलेला असतानाही आरामात काहीही खाऊ- पिऊ शकता. अशा प्रकारच्या १० मास्कची किंमत भारतीय चलनानुसार ६१० रूपये आहे. या मास्कला दोन भाग असणार आहेत. हा kosk तुम्ही नाकावर घालायचा आणि याचा बाहेरचा भाग आपल्या रेग्युलर मास्कप्रमाणे असेल जो आपले नाक आणि तोंड दोन्ही कव्हर करेल.
त्यामुळे तुम्ही जेव्हा मास्क घालाल तेव्हा तुम्हाला दोन्ही मास्क घालावे लागतील. फक्त जेव्हा काही खायचे- प्यायचे असेल तेव्हा बाहेरचा मास्क काढून टाकावा लागेल. कोरियामध्ये आता आणखी काही कंपन्याही असाच मास्क तयार करण्याच्या बेतात आहे. काहींनी तर विविध रंगात उपलब्ध असणारा त्यांचा असा मास्क बाजारात आणलेलाही आहे... एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की कोरोना व्हायरस आपल्या शरीरात येण्यासाठी नाक हे सगळ्यात सोपे माध्यम आहे.
हा kosk मास्क सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटत आहे. पण जेवताना नाकावर काही नसण्यापेक्षा हा मास्क असणे कधीही चांगलेच, असे मत काही संशोधकांनीही व्यक्त केले आहे. कोरियामध्ये सध्या कोरोनाच्या Omicron प्रकाराने धुमाकूळ घातला असून दिवसागणिक तिथे २० ते २२ हजार रूग्ण सापडत आहेत.