Join us
Daily Top 2Weekly Top 5

साडीची घडी मोडण्याच्या जुन्या प्रथेचा पाहा खास अर्थ.. तुम्ही मोडलीय का कधी आईच्या-वहिनीच्या साडीची घडी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 17:29 IST

साडीची घडी मोडण्याच्या जुन्या प्रथेचा नेमका अर्थ माहितीये?

ठळक मुद्देही आपली जुनी परंपरा मनाचा किती मोठेपणा दाखविणारी आहे. कधी नव्हे ती नवी साडी मिळायची आणि स्वत:चा मोह सोडून ती दुसरीला अगदी सहज नेसायला द्यायची..

साडी हा काही अपवाद सोडले तर बहुतांश महिलांसाठी एक अतिशय हळवा विषय. प्रत्येक साडी त्यांच्यासाठी खास असते आणि प्रत्येक साडीच्या काही वेगवेगळ्या आठवणी असतात. साडी नेसून नेसून कितीही जुनी झाली तरी ती टाकून द्यावी वाटत नाही आणि कपाटात कित्येक साड्या असल्या तरी साड्यांचा मोह टाळता येत नाही, अशी परिस्थिती. पण जुन्या काळी असं नसायचं. बहुसंख्य महिलांकडे अगदी मोजून ४ ते ५ साड्या असायच्या. लग्न समारंभात, सणावाराला त्याच पुन्हा पुन्हा नेसल्या जायच्या. शिवाय नवी साडी खरेदी करण्याचा प्रसंगही अगदी क्वचितच यायचा.. म्हणूनच तर त्यावेळी त्या साडीचा आनंदही खूप असायचा. पण असं असलं तरी आपल्या वाट्याला कधीतरीच आलेली नवी कोरी साडीही घडी मोडण्यासाठी म्हणजेच पहिल्यांदा नेसण्यासाठी घरातल्या दुसऱ्या महिलेला दिली जायची. तिने ती आधी नेसायची आणि मग ती आपल्याला नेसायला मिळायची. वर वर पाहता अगदी साधी वाटणारी ही गोष्ट असली तरी केवढा मोठा अर्थ तिच्यात दडलेला असायचा...

 

साडीची घडी मोडणं म्हणजे काय हे आताच्या जेन झी ला कदाचित ठाऊकच नसेल. पण ही आपली जुनी परंपरा मनाचा किती मोठेपणा दाखविणारी आहे. कधी नव्हे ती नवी साडी मिळायची आणि स्वत:चा मोह सोडून ती दुसरीला अगदी सहज नेसायला द्यायची..

अधिक मास २०२६ : अधिकात जोडवी तर घेतातच, सोबत घ्या दागिन्यांचे पारंपरिक प्रकार-बिछवे, मासोळ्या, करंगुळ

असं पुर्वीच्या काळी घराघरांत घडायचं. कारण तेव्हा पैशांची श्रीमंती नसली तरी मनाचा मोठेपणा सगळ्यांकडे असायचा.. नव्या साडीचा मोह कोणाला होत नाही, पण तरीही मन मोठं करत साडी शेअर केली जायची. यातून त्या समोरच्या व्यक्तीला केवढा आनंद होत असेल याचा विचारही आपण करू शकत नाही.  यातही जर समोरच्या महिलेची परिस्थिती आणखीनच गरीबीची असेल तर तिला होणारा आनंद आणखीनच वेगळा... हेच तर 'शेअरिंग' आज आपल्याला आणि नव्या पिढीला शिकण्याची गरज आहे.. 

 

आता आपलं स्वत:चं उदाहरण घ्या. आपण एखादी साडी खूप हौशीने आणलेली असते. ती कधी पहिल्यांदा नेसायला मिळणार याची आपण संधीच शोधत असतो. ती संधी मिळाली की आपण साडी नेसून आपल्या अंगाखांद्यावर मिरवतो.

चमचा मसाज ऐकलाय? 'या' पद्धतीने रोज सकाळी २ चमचे चेहऱ्यावरून फिरवा-इन्स्टंट ग्लो-चेहरा चमकेल

त्या नव्या साडीचा कोरा कोरा सुगंध आपणच पहिल्यांदा अनुभवावा, तिचा नवा करकरीतपणा पहिल्यांदा आपल्याला जाणवावा.. असं आपल्याला वाटत असतं. अशावेळी ती साडी घडी मोडण्यासाठी इतर कोणाला द्यावी हा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही... अर्थात आता सगळ्यांकडेच साड्यांची सुबत्ता आहे. त्यामुळे आपल्याला कोणी नवी साडी घडी मोडायला द्यावी ही अपेक्षाही नसते. पण तरीही अवचित कोणी आपल्याला घडी मोडण्यासाठी त्यांची नवी कोरी सुंदर साडी दिली तर आपल्याला आनंद होईलच ना आता तो काळही सरला आणि ती प्रथाही मागे पडली. पण त्या प्रथेतून आपल्या पणजीने, आजीने, आईने दिलेली शिकवण आपण विसरता कामा नये ना कारण त्यातूनच तर शेअरिंंग इज केअरिंग हे आतापर्यंत झिरपत आलंय... 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Unveiling the Meaning of Breaking a Saree's Fold: A Tradition

Web Summary : An old tradition involved sharing a new saree, allowing another woman to wear it first. This act symbolized generosity and sharing, reflecting a time when emotional wealth outweighed material possessions. It taught valuable lessons in caring and sharing.
टॅग्स :साडी नेसणेसोशल व्हायरलपारंपारिक विधी