अंजना देवस्थळे (लेखिका पर्यावरणप्रेमी हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
बारा वर्षांपूर्वीचा संक्रांतीच्या हळदीकुंकूचा गंमतशीर किस्सा. (म्हटली तर गंमत, विचार केला तर भयानक)नव्यानी बांधण्यात आलेल्या गृहसंकुलात आम्ही राहायला आलो. नव्याची नवालाई होती, उत्साह भरभरून होता. सोसायटीत सार्वजनिक गणेश उत्सव जोरात साजरा झाला, नवरात्रीत भोंडला, गरबा दणकून झाला. यानिमित्ताने ओळखी वाढल्या. मग नवीन वर्षांत संक्रांत आली आणि हळदीकुंकवाची आमंत्रण घरोघर पोहोचली. आम्ही दोघी जावा छान नटूनथटून हळदी कुंकवाला अनेकांच्या घरी गेलो. रथसप्तमीपर्यंत आमच्या घरी प्लॅस्टिकच्या तब्बल सहा गाळण्या, प्लॅस्टिकचे अनेकरंगी आठ डबे आणि काही चकचकीत रांगोळ्यांचे सेट जमा झाले. घरकामाला येणाऱ्या मदतनीस बाईंना द्यावं तर त्यांनीही घेण्यास साफ नकार दिला. आमच्या आधीच अनेकींनी गाळण्या, डबे पुढे त्यांच्याकडे सरकवले होते. संक्रांतीत असं निरूपयोगी वाण अनेकींनी ‘लुटलं’ होतं.
ते पाहून मला आठवलं की माझ्या लहानपणी हळदीकुंकवाला जाण्याची उत्सुकता असायची. अत्तराचा सुवास, गुलाबदाणीतून शिंपडलेले सुगंधी पाणी, नटलेल्या बायका आणि हो, उसाचे करवे, बोरं, गाजराचे तुकडे, मटार, हरभरे, तीळ-गूळ सगळं एका सुगडीत घालून दिलं जायचं. ते खाण्यात मज्जा असायची. वाण म्हणून बऱ्याचदा कुंकवाचा करंडा असायचा. आई, आजी, काकूला ते वर्षभर पुरत. आम्हा मुलींना बांगड्या मिळायच्या, ज्या आम्ही रोज घालून मिरवायचो. कुणी रुमाल द्यायचं, त्यानंतर टिकल्यांची पाकीट आली. काही वेळा आमंत्रण देणारीची लग्नानंतरची पहिली संक्रांत असायची ती कंगवा, आरसा असं काही द्यायची. भारी कौतुक होतं त्या वाणांचं. पुढे स्टीलच्या ताटल्या, चमचे, छोट्या डब्या, निरंजन येऊ लागले. आई आजी हळदीकुंकू घेऊन परतल्या की वाण काय मिळालं हे बघण्याची भयंकर उत्सुकता असायची. मिळालेल्या प्रत्येक वाणाचं अप्रूप असायचं. लहान डबा, भांडं मिळालं की हे माझ्या भातुकलीत जाईल असे मी घोषित करायचे. क्वचित चिनी मातीच्या लहानशा बरण्या आल्या, त्यात हमखास मीठ, लोणचं काढून ठेवलं जात असे. अजूनही माहेरी गेले की माझ्या लहानपणी घरात आलेले वाण आजही वापरात दिसते.
पण मग मध्येच कधीतरी अचानक प्लॅस्टिकची घुसखोरी झाली. वाणाचं स्वरूप बदललं. नवीन नवीन त्यांचंही अप्रूप होतं कारण बजेटमधे बसतील अशा विविध रंगांच्या, निरनिराळ्या आकारांच्या वस्तू मिळत. पण त्यानंतर घरोघरी नकोशा वस्तू येऊ लागल्या. एकीने प्लॅस्टिकचे डबे वाटले, तर दुसरी बाटल्या वाटणार, तिसरी पर्स. वस्तू अशा की ना टिकाऊ, ना काही कामाच्या, ना त्या पुढे सरकावण्याची सोय. बऱ्याच वस्तू घरात खात पडू लागल्या. एक दिवस साफसफाईच्या ओघात रवानगी कचरापेटीत. पैसे खर्च करून वाटलेल्या वस्तू काहीच कामाच्या नाही म्हणून टाकून देताना वाईट वाटतं खरं, पण इलाज नाही. हे टाकून दिलेलं वाण कचरापेटीतून, घंटागाडीची सफर करत कचराडेपोत जातं किंवा वाहत जात नाले-नदी-समुद्रात तरंगता. नाहीतर जाळलं जाऊन घाणेरड्या वासाच्या प्रदूषण पसरवणाऱ्या धुरात रूपांतरित होतं. वाण नको म्हणता येत नाही आणि घेतलेलं वाण टाकून देताना वाईट वाटतं.
सुदैवाने मी ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंचची कार्यकर्ती असल्याने माझ्या संपर्कात अनेक पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण सुजाण व्यक्ती येतात. मुळात संस्थेचं ध्येय पर्यावरणपूरक सण साजरे करणं असल्यानं आपल्या पारंपरिक पद्धतीने सण साजरे केल्यास आनंद द्विगुणित होऊ शकतो हे लोकांना पटवून द्यावं लागतं. वाण लुटायला खूप पैसे टाकायला लागतात आणि प्लॅस्टिकच्या किंवा पर्यावरणपूरक नसलेल्या स्वस्त वस्तूच द्याव्या लागतात असं काही नाही. उलट आपलं वाण नैसर्गिक आणि उपयुक्त असावं. याच विचाराच्या काही मैत्रिणी भेटल्या.एकीच्या मुलाने आणि तिने ओरिगामीचे कागदाचे छोट्या डब्या बनवून त्यात हळद कुंकू लुटलं. वाण म्हणून चाफ्याची फुलं किंवा गजरा घेताना मन सदैव प्रफुल्लीत झालं. एकीने तर जुन्या साड्यांच्या पर्समध्ये राहतील अशा पिशव्या शिवल्या आणि त्या लुटल्या. एका मैत्रिणीने तिच्याकडच्या जुन्या चादरींची पायपुसणी बनवून घेतली आणि ती मांडून ठेवली. आपल्या पसंतीने आपले वाण निवडा. काही मैत्रिणींनी स्वतः कागदी पिशव्या बनवून गुळाची ढेप कडधान्य त्यात भरून वाटले.त्यांच्याकडून प्रेरित होऊन आम्हीपण अशीच शक्कल लढवली. आमच्या गावी मोठ्या प्रमाणात बांबू होतो. त्यातला चांगल्या आकाराचे पोकळ बांबू आम्ही मदतनिसांकडून कापून घेतले. ते वाळवले. आमच्या मुलींनी त्यावर सुंदर नक्षी, पानंफुलं रंगावली आणि छान पेनस्टॅण्ड, चमचे ठेवायचा स्टॅण्ड तयार झाल्या. घरातल्या बारीक सारीक गोष्टी ठेवायला ते उपयोगी ठरलं.मला सर्वात आवडलेली लूट आमच्या ओळखीच्या बुजुर्ग डॉक्टर बाईंनी केली. त्यांनी सगळ्यांना हळदीकुंकू दिलं, हातावर अगदी चविष्ट, खुसखुशीत तिळाची वडी दिली आणि वाण दिलंच नाही. दिवानखाण्याच्या मध्यभागी एक फलक लावला होता, त्यावर त्यांनी वाणाच्या किमतीची रक्कम वनवासी कल्याण आश्रमाला देणगी स्वरूपात देणार असल्याचे लिहिले होते. हे वाचल्यावर आमच्यापैकी अनेकींनी त्यासाठी देणगी दिली.वाणाचा असा उपयोगी, निसर्गस्नेही, पर्यावरणपूरक विचार आपण केला तर घरातली प्लॅस्टिकची आणि बिनकामाच्या वस्तूंची अडगळ कमी होईल.हळदीकुंकू समारंभ हा एक आनंदाचा सोहळा. तिथं भेटीगाठी व्हाव्या, स्नेहसंबंध वाढवे. निरूपयोगी भेटवस्तूंचा भडीमार होऊन पर्यावरणावर संक्रांत येऊ नये.
Web Summary : This Sankranti, opt for useful, eco-friendly gifts instead of unwanted plastic. The author reminisces about traditional, cherished gifts and suggests alternatives like homemade items or donations to charity, reducing clutter and environmental impact.
Web Summary : इस संक्रांति, अवांछित प्लास्टिक के बजाय उपयोगी, पर्यावरण के अनुकूल उपहार चुनें। लेखिका पारंपरिक, पोषित उपहारों को याद करती हैं और घर की बनी वस्तुओं या दान जैसे विकल्पों का सुझाव देती हैं, जिससे अव्यवस्था और पर्यावरणीय प्रभाव कम होता है।