Join us  

मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी, रुमीचे पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 2:28 PM

सौदी अरेबियन तरुण मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार या बातमीची एवढी चर्चा का?

ठळक मुद्देसौदीतील स्त्रियांसाठी प्रतिकात्मकता म्हणूनही बदलाचे आणि प्रगतीचे हे एक नवीन पाऊल आहे.

सौदी अरेबियाची एक मुलगी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणार हीच जगासाठी फार मोठी बातमी आहे. रुमी अल-कहतानी ही तरुणी सौदी अरेबियाच्यावतीने पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होईल. सौदी अरेबियात महिलांसाठीच्या सुधारणांनी मोठा वेग घेतला आहे. ज्या देशात स्त्रियांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नव्हतं, कार चालवण्याची परवानगी नव्हती त्या देशातली तरुणी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेते हे सुधारणावादीच पाऊल आहे. 

सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांच्या दृष्टीनं खूपच प्रागतिक असे निर्णय घेतले आहेत. ‘महिला’ म्हणून ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या देशांत अमान्य होत्या, त्यातल्या अनेक गोष्टींना आता त्यांनी परवानगी दिली आहे. जिथे गाडी चालवण्याची परवानगी नव्हती तिथे आता महिला रेल्वे, विमानंही चालवणार आहेत. 

(Image : google)

आजवर  या स्पर्धेत भाग घेण्याची सौदीच्या सौंदर्यवतींना परवानगी नव्हती. आता मात्र  २७ वर्षीय रुमी या स्पर्धेत दाखल झाली आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधची रहिवासी.  ती मॉडेल आणि सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. या वर्षीच्या अखेरीस मेक्सिको येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत रुमी आपल्या देशाची अधिकृत प्रतिनिधी असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्स स्पर्धेत स्विम सूट इव्हेंट नसतो. कदाचित यामुळेही रुमीला या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी सौदीची पहिली महिला बनण्याचा मान मला मिळतोय, याचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय आहे, अशी पोस्ट तिने साेशल मिडियात शेअर केली आहे. 

सौदीतील स्त्रियांसाठी प्रतिकात्मकता म्हणूनही बदलाचे आणि प्रगतीचे हे एक नवीन पाऊल आहे.

 

टॅग्स :सौदी अरेबियामिस युनिव्हर्स