Join us  

जन्मत:च बाळाचं वजन ६.५ किलो! जगातलं सर्वाधिक वजनाचं बाळ, गुटगुटीत बाळाचं आईबाबांनाही कौतुक, ते म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 5:07 PM

Ontario couple welcomes 6.5kg baby boy largest on record since 2010 : सामान्य बाळांपेक्षा हे वजन दुपटीने जास्त असल्याने या बाळाबाबत सगळीकडे जोरदार चर्चा आहे.

गर्भवती महिलेचे ९ महिने पूर्ण होतात आणि प्रत्येकाला आतुरता असते बाळाच्या जन्माची. एकदा बाळाचा जन्म झाला की मुलगा आहे की मुलगी याबाबत सगळ्यांना उत्सुकता असते. इतकेच नाही तर बाळाची आणि आईच्या तब्येत, बाळाचे वजन यांसारख्या गोष्टी जवळच्या लोकांकडून आवर्जून विचारल्या जातात. बाळाचे जन्मत: वजन भारतात साधारणपणे ३ ते ४ किलो असते तर परदेशात साधारणपणे बाळाचे जन्मत: वजन ५ किलोपर्यंत असते. पण कॅनडामध्ये नुकत्याच एका बाळाने जन्म घेतला असून त्याचे जन्मत: वजन तब्बल ६.५ किलो इतके आहे. सामान्य बाळांपेक्षा हे वजन दुपटीने जास्त असल्याने या बाळाबाबत सगळीकडे जोरदार चर्चा आहे (Ontario couple welcomes 6.5kg baby boy largest on record since 2010). 

या बाळाचे पालक असलेले ब्रिटनी आणि चान्स आयरेस हे जोडपे स्वत:ही आपल्या नवजात बाळाचे वजन ऐकून आश्चर्यचकित झाले. या जोडप्याचे हे पाचवे अपत्य असून त्याने २३ ऑक्टोबर रोजी केंब्रिज मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सी सेक्शनद्वारे जन्म घेतला. बाळाचे वजन १४ पाऊंड होते त्याचप्रमाणे त्याची उंचीही चांगली म्हणजे ५५ सेंटीमीटर इतकी होती. याबाबत चान्सने मिडीयाशी बोलताना सांगितले की, बाळाच्या जन्माच्या वेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर आणि नर्सेस यांच्यातही बाळ किती मोठे असेल यावरुन पैजा लागत असल्याचे मी अनुभवत होतो. पण प्रत्यक्षात जेव्हा बाळाला वजन काट्यावर ठेवले तेव्हा त्याचे वजन पाहून सगळेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहत राहिले आणि हे काहीतरी अचंबित करणारे आहे अशाप्रकारचे उद्गार सगळ्यांच्या तोंडातून निघाले. पण आपले बाळ इतके वजनदार असेल असा मी कधीही विचार केला नव्हता असेही तो म्हणाला. 

(Image : Google )

हे मूल आमच्यासाठी एकप्रकारचा आशिर्वाद आहे अशा भावना ब्रिटनी या आईने व्यक्त केल्या. मुलाचे नाव सोनी ठेवण्यात आले असून अपेक्षित तारखेपेक्षा १ आठवडा आधी तो जन्माला आला. मात्र पूर्ण गर्भधारणेच्या काळात तिला कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीला सामोरे जावे लागले नाही. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सोनी हे त्यांच्या कारकिर्दीतले सर्वात मोठे बाळ असून २०१० नंतर जन्मलेले ते सर्वात मोठे बाळ आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलनवजात अर्भककॅनडा