'पहिली बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं' पण हे फक्त बोलण्यापुरतं, आजही मुलगा हवा असा आग्रह अनेकांना असतो. एका मुलीच्या पाठीवर दुसरा मुलगा तरी हवाच म्हणून सेकंड चान्स घेणारे काही कमी नाहीत. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा.(son preference in India) हा दिवा उजळावा म्हणून आजही स्त्रीचं शरीर, मन आणि आयुष्य किती वेळा तरी सहज दावणीला बांधलं जातं. पण गर्भातल्या मुली मारणारेही कमी नाहीत आणि मुलगाच हवा म्हणून बाईवर बाळंतपण लादणारेही. म्हणून तर आजही दहा मुलींच्या पाठीवर मुलगा झाला आणि कुटूंबानं आनंद उत्सव साजरा केला ही बातमी होते. (women’s health issues India)
महिलांमध्ये अल्कोहोलमुळे वाढतंय कॅन्सरचं प्रमाण, चिअर्स म्हणत सोशल ड्रिंक करत असाल तर..
अशीच एक बातमी हरयाणातली, सध्या व्हायरल आहे.उचाना कला नावाच्या एका महिलेला ९ मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. मुलगाच हवा या हट्टापायी त्यांनी एकापाठोपाठ एक मुली जन्माला घातल्या. सगळ्यात लहान मुलगी ३ वर्षांची तर मोठी २१ वर्षांची आहे. मुलींची नावही प्रत्येकवेळी त्यांची निराशा झाली तशी बदलत गेली असं तेच सांगतात. कल्पना, आरती, भारती, खुशी, मानसू, रजनी, रजीव, काफी, माफी अशी त्यांच्या मुलींची नावं आहे. काफी आणि माफी अशी मुलींची नावं ठेवण्याइतपत निबर मनं आईबापासह घरातल्या सगळ्या नातेवाईकांची आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रातही नकुशी नाव असलेल्या मुली काही कमी नाहीत. तर १० वेळा या बाईंची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि आता मुलगा झाला म्हणून त्यांनी गावभर जल्लोष करत मुलाचं नाव दिलखुश ठेवलं.
हे वाचून हताश वाटलं तरी हेच आपल्या समाजाचं वास्तव आहे. आजही मुलगी नको वाटते आणि मुलगा हवासा. कुणी बोलतात कुणी लपवतात.आपल्या घराचा वारसा पुढे चालवण्यासाठी सासरच्या मंडळींचा वंशाचा दिवा हवा हा अट्टाहास काही केल्या संपतच नाही. आजही आपल्या समाजात अशी घरे आहेत, जिथे मुलीच्या जन्मानंतर आनंद साजरा करण्याऐवजी 'पुढच्या वेळी मुलगा होऊ दे' अशी प्रार्थना केली जाते.
नऊ मुली झाल्यानंतर दहाव्या वेळी मुलगा झाला, ही बातमी आनंदाची मग त्या नऊ मुलींचा जन्म इतका नकोसा होतो या समाजात हे वास्तव कसं नाकारणार!
आणि त्या ३८ वर्षांच्या माऊलीचं काय. नऊ बाळंतपणे सोसणं म्हणजे मृत्यूच्या दारातून पुन्हा येण्यासारखेच आहे. बाईच्या शरीराची होणारी झीज, रक्ताची कमतरता आणि मानसिक थकवा यापेक्षा सासरच्या मंडळींना 'वारस' जास्त महत्त्वाचा वाटतो. वंशाच्या दिव्याच्या नादात ते घरातील 'लक्ष्मी' असलेल्या स्त्रीच्या आरोग्याची अक्षरशः वाट लावत असतात. केवळ मुलगा हवा या एका अट्टहासापायी स्त्रीला केवळ 'मुलं जन्माला घालणारं यंत्र' समजणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. पण तरीही मुलगाच हवा हा अट्टाहास काही संपत नाही. वंशाचा दिवा हा घरात प्रकाश देण्याऐवजी आईच्या आरोग्याची राखरांगोळी करत असेल तर आपण स्वत:ला काय आधुनिक म्हणवतो? ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात मुलाचं महत्व एवढं असेल तर आईबाप खोट्या प्रतिष्ठेपायी मुलींचा जन्म नाकारतच राहणार, कधी बदलणार हे सारं..?
