Join us  

‘नो बिंदी, नो बिझनेस’; या हॅशटॅगवरुन सोशल मीडिया का भडकला आहे? काय आहे हा टिकलीचा वाद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 2:35 PM

दिवाळीच्या ऐन तोंडावर विविध ब्रॅण्डस, त्यांच्या जाहिराती, मॉडेल्सचे सुतकी चेहरे आणि कपाळावर नसलेली टिकली यानं सोशल मीडियात रणकंदन.

ठळक मुद्देकशामुळे टिकली इतकी चर्चेत आली? ऐन दिवाळीच्या तोंडावर टिकली का होतेय ट्रेंड? नो बिंदी, नो बिझनेस हॅशटॅग आहे तरी काय?

टिकली लावायची का नाही हा जिचा तिचा प्रश्न आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या विषयावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. मुद्दा आहे,‘नो बिंदी, नो बिझनेस’. याचं कारण आहेत काही कपड्याच्या किंवा दागिन्यांच्या दिवाळी जाहिराती. दिवाळीच्या उत्सवी जाहिराती करताना कोऱ्या कपाळाच्या, अजिबात आनंदी नसणाऱ्या सुतकी चेहऱ्याच्या मॉडेल्स का वापरल्या जाता? असा हा सवाल सोशल मीडियावर करण्यात आला. ‘नो बिंदी, नो बिझनेस’ हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. दिवाळीसारख्या हिंदू सणांसाठी उत्पादने विकत असताना हिंदुंच्या भावनांचा विचार जाहिरातींमध्ये केला जात नसल्याची टिका सोशल मीडियावर करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पोस्ट, फोटो आणि काही हॅशटॅग गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत.

लेखिका शेफाली वैद्य यांनी 'नो बिंदी नो बिझनेस' असा हॅशटॅग घेऊन एक पोस्ट केली होती, त्यात त्या म्हणतात, ‘ मी माझ्यापुरतं ठरवलं आहे की मी "दिवाळीसाठी त्या ब्रँड्सकडून काहीही विकत घेणार नाही, ज्यांच्या जाहिरातीत मॉडेल्सनी बिंदी लावलेली नाही." पुढे त्या म्हणतात "हा मुद्दा एखाद्यानं बिंदी वापरावी की नाही, याबाबतचा नाहीये. तर काही ब्रँड हिंदू सणासाठी उत्पादने विकत आहेत, पण ते करताना हिंदूंच्या भावना त्यांच्याकडून दुखावल्या जात आहेत. तुम्हाला हिंदू लोकांकडून पैसे पाहिजे असतील, तर हिंदू धर्मातील प्रतिकांचा आदर करा. त्यामुळेच 'नो बिंदी, नो बिझनेस' हा हॅशटॅग चालवला जात आहे."

फॅब इंडिया या कपड्यांच्या मोठ्या ब्रँडने दिवाळीसाठी कपड्यांची जाहिरात करताना जन्श-ए-रिवाज असे म्हणत काही मॉडेलसचे फोटो घेतले होते. यामध्ये त्यांनी घातलेले कपडे पारंपरिक होते मात्र एकीच्याही कपाळावर कुंकू किंवा टिकली लावलेली नसल्याने या वादाला सुरुवात झाली. त्यानतंर पु.ना.गाडगीळ या पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सनी पण सोनाली कुलकर्णीसोबत केलेल्या जाहिरातींमध्ये सोनालीला पारंपरिक वेशभूषा करुनही टिकली लावण्यात आली नव्हती. मात्र हा वाद सुरु झाला आणि दोन्ही ब्रँडनी बाजारातील आपले स्थान टिकवण्यासाठी आपल्या जाहिरातील मागे घेत त्यामध्ये बदल केले.

दरम्यान ‘नो बिंदी, नो बिझनेस’ हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. दोन्ही बाजूने त्याविषयी लिहिले गेले. बायकांनी टिकली लावायची की नाही हा व्यक्तिगत विषय आहे त्यावरुन वाद कशाला, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या ‘नो बिंदी, नो बिझनेस’ हॅशटॅगवर टीकाही झाली. ऐन सणावाराला सध्या सोशल मीडियात टिकलीचा वाद मोठा गंभीर झालेला आहे. त्यावरुन अनेक मिम्स, टीका, विनोद, आणि बाजूनं केले जाणारे युक्तिवादही व्हायरल होत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया