आपण अनेकदा सुंदर दिसण्यासाठी किंवा नवीन लूक हवा म्हणून पार्लर किंवा सलूनमध्ये जातो. पण कधी विचार केला आहे का, की एखादा चुकीचा हेअरकट एखाद्या सलूनला कंगाल करू शकतो? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये झळकणारे लांबसडक आणि रेशमी केस हे कोणत्याही मॉडेलसाठी केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून तिच्या करिअरचा कणा असतात. पण जर याच केसांसोबत सलूनमध्ये एखादा अघोरी प्रयोग झाला तर? दिल्लीतील नामांकित मॉडेल आशना रॉय यांच्यासोबत असंच काहीसं घडलं आणि एका हेअरकटने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले(model Aashna Roy bad haircut controversy).
हे प्रकरण केवळ वादापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. आपल्या केसांच्या नुकसानीमुळे आणि झालेल्या मानसिक त्रासामुळे आशना रॉय हिने कायदेशीर लढा दिला. अखेर सुप्रीम कोर्टाने (Aashna Roy haircut case) या प्रकरणाची गंभीर दखल घेत सलूनला तब्बल २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. केवळ काही इंच केसांची ही चूक सलूनला इतकी महागात कशी पडली? आणि कोर्टाने नक्की काय म्हटले? हे अजबगजब (bad haircut case ITC Maurya) वाटणारं प्रकरणं नेमकं आहे तरी काय...
चुकीचा हेअर कट करणं पडलं महागात...
मॉडेल आशना रॉय ही १२ एप्रिल २०१८ रोजी दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमधील सलूनमध्ये हेअर कट करायला गेली होती. तिला एका जॉब इंटरव्ह्यू आणि मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी सुंदर शोभेल असा हेअर कट करायचा होता. तिने हेअरस्टायलिस्टला स्पष्ट सूचना दिली होती की, तिचे केस फक्त ४ इंच खालून कापावेत परंतु, हेअरस्टायलिस्टने चुकीने तिचे थोडे जास्त केस कापले, याला 'जुडवा स्टाईल' असेही म्हटले गेले.
आशना रॉय ही नामांकित कंपन्यांसाठी हेअर मॉडेल म्हणून काम करत होती. लांब केस हे तिच्या करिअरचे मुख्य वैशिष्ट्य होते. चुकीच्या हेअरकटमुळे तिच्या हातांतून अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स गेले. सोबतच तिला प्रचंड मानसिक धक्का आणि नैराश्याचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर, त्यानंतर करण्यात आलेल्या ट्रीटमेंटमध्ये जास्त अमोनिया वापरल्याने तिच्या स्काल्पला इजा झाली आणि खाज सुटण्याचा त्रास सुरू झाला.
त्यानंतर लगेचच आशना रॉय हिने 'नॅशनल कंज्यूमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन' (NCDRC) कडे धाव घेतली. कमिशनने सांगितले की, हॉटेलच्या सेवेत मोठी चूक होती. मॉडेलच्या करिअरचे झालेले नुकसान लक्षात घेऊन २०२१ मध्ये कमिशनने हॉटेलला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की ती सलूनची चूक होती, पण २ कोटींची रक्कम कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ठरवली गेल्याचे सांगत हे प्रकरण पुन्हा तपासण्यासाठी कमिशनकडे पाठवले.
नुकताच, ६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, "भरपाई ही केवळ तक्रारदाराच्या इच्छेवर किंवा कल्पनेवर ठरवता येत नाही, तर त्यासाठी ठोस पुरावे लागतात." आशना रॉय यांनी सादर केलेले बहुतेक पुरावे हे केवळ फोटोकॉपी होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २ कोटी रुपयांची भरपाई रद्द करून ती आता २५ लाख रुपये केली आहे. ही तीच रक्कम आहे जी हॉटेलने यापूर्वीच कोर्टाच्या आदेशानुसार आशना रॉय यांना दिली होती. आता त्यांना यापेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आपण नेहमी म्हणतो,"केस काय आज कापले तर उद्या पुन्हा वाढतील!" पण आशना रॉय यांच्या बाबतीत हे विधान फोल ठरलं. त्यांच्यासाठी ते केस नसून त्यांचं स्वप्न आणि करिअर होतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या सलूनमध्ये जाल, तेव्हा तुमच्या सूचना स्टायलिस्टला स्पष्टपणे द्या आणि शक्य असल्यास त्या कामाचे बिल किंवा पावती जपून ठेवा. तुम्ही जेव्हा केस कापायला जाल तेव्हा हा २५ लाखांचा हेअरकट नक्की आठवा आणि आपल्या स्टायलिस्टला सूचना देताना किमान दोनदा विचार करा...
