Join us  

आपलं घर नवं नवं वाटेल करा घरात 5 बदल, वाटेल फ्रेश- खर्चही होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 4:24 PM

घर तेच, माणसं तीच पण लूक बदलला तर वाटेल सगळंच नवंनवं, पाहा घरात बदल करण्याच्या सोप्या युक्त्या

ठळक मुद्देरोपांना छान फुले आली असतील किंवा अगदी ती हिरवीगार झाली असतील तरी आपला दिवसभराचा थकवा त्यांना पाहून दूर पळून जाऊ शकतो. आहे त्या गोष्टींमध्येच थोडे बदल केले तर छाव वाटेल आणि मूडही होईल एकदम फ्रेश

आपण राहत असलेल्या घरात आपल्यालाच काही वेळाने खूप कंटाळा यायला लागतो. सतत तेच ते घर, तीच ती माणसं आणि त्याच त्या वस्तू यांमुळे आपण कंटाळून जातो. आपल्या आजुबाजूच्या गोष्टी थोड्या वेगळ्या असायला हव्यात असे आपल्याला सतत वाटत असते. पण त्यावर काय उपाय करता येईल हे मात्र आपल्याला समजत नाही. अशावेळी काही सोपे उपाय आपल्याला एकदम ताजेतवाने करु शकतात. कंटाळा आला म्हणून घर बदलणं काही शक्य नसतं. फारतर आपण ४ दिवस किंवा अगदी ८ दिवस ट्रीपला जाऊन येऊ शकतो. पण पुन्हा आपल्याला आल्यावर त्याच घरात राहावं लागतं. अशावेळी काही साधे बदलही आपले आहे तेच घर नवीन वाटण्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात ते कोणते ते पाहूया...

(Image : Google)

१. पडदे, सोफा कव्हर बदला

आपण घरात आलो की रोज तेच पडदे, तेच सोफा कव्हर किंवा तेच पिलो कव्हर बघत असतो. तेच ते रंग आणि डिझाईन पाहून कदाचित आपल्याला कंटाळा आलेला असू शकतो. अशावेळी खिडक्यांचे पडदे, सोफ्याचे कव्हर, पिलो कव्हर्स बदलल्यास आपल्याला आपलेच घर आहे त्याहून थोडे वेगळे वाटू शकते. यामध्ये थोडे व्हायब्रंट रंग घेतल्यास घराची शोभा आणखी वाढू शकते. 

२. वस्तूंच्या जागा बदला 

अनेकदा आपण वस्तू अशा काही मांडून ठेवतो की त्या आहेत तिथून कधी हलूच नयेत. पण असे न करता काही दिवसांनी घरातील अॅरेंजमेंट थोडी बदलायला हवी. त्यामुळे आपल्याला आहे त्यातच थोडे वेगळे वाटू शकते. सोफा, टिपॉय, काही कपाट किंवा कॉर्नर पीस असेल तर तो इतर वस्तू यांची दिशा बदलून ठेवल्यास वेगळे चांगले वाटू शकते. 

३. शो पीसमध्ये बदल 

आपण घरातील भिंतीवर काही फ्रेम लावलेल्या असतात. किंवा शोकेसमध्ये काही चांगले शो पीस ठेवलेले असतात. हे शो पीस आणि फ्रेम आपण वर्षानुवर्षे पाहत असतो. अनेकदा या गोष्टी इतक्या जुन्या झालेल्या असतात की आपले त्याकडे लक्षही जात नाही. अशावेळी त्यामध्ये एखाद्या नव्या शोपीसची किंवा एखाद्या वेगळ्या फ्रेमची भर घातल्यास ते आपल्या डोळ्यांना थोडे सुखावणारे वाटू शकते. 

४. लँप किंवा लाईटस लावा

काही वेळा आपल्याला घरात वेगळ्या प्रकारचे लँप किंवा लाईटस लावले तरी थोडे वेगळ वाटू शकते. संध्याकाळी घरात आल्यावर एखादा छानसा पिवळ्या रंगाचा वेगळ्या आकाराचा लँप लागलेला असल्यास आपले लक्ष नकळत त्याठिकाणी जाते आणि घरातील इतर त्याच त्या गोष्टी नजरअंदाज होऊ शकतात. सध्या बाजारात वेगवेगळ्याप्रकारचे दिवे, लँप मिळतात. त्यातले तुमच्या आवडीचे साधे असे दोन ते तीन लँप आणून ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यास छान वाटू शकते. 

(Image : Google)

५. झाडे लावा 

शोभेची रोपे किंवा शोभेच्या फुलांची रोपे आपला मूड फ्रेश करु शकतात. बाजारात इनडोअर अशी बरीच रोपे अगदी सहज मिळतात. ही रोपे काही आकर्षक कुंड्यांमध्ये घरात ठेवल्यास तुमचा मूड फ्रेश होण्यास मदत होते. या रोपांना छान फुले आली असतील किंवा अगदी ती हिरवीगार झाली असतील तरी आपला दिवसभराचा थकवा त्यांना पाहून दूर पळून जाऊ शकतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजन