हर्षदा भिरवंडेकर
सेलिब्रिटी असो, वा सामान्य माणूस अगदी इंटरनेटवर एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडला तरी समोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे 'लाबुबू डॉल'. इतकंच काय तर, ही साधीशी बाहुली खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या बाहुल्यांचे वेड अगदी भारतापर्यंत आले. या वेडाला हवा देण्याचं काम ही सेलिब्रिटींनीच केलं. बॅग असो वा मोबाईल ते अगदी छोटी पर्स गळीकडेच लाबुबू लटकलेली दिसते. अनन्या पांडे ते रश्मिका मंदाना यांच्या बॅगला लाबुबू डॉल्स दिसल्या, व्हायरल झाल्या. अनेक तरुण मुलींच्या बॅगला आता या डॉल्स दिसतात. त्यासाठी भरभक्कम पैसेही मोजले जातात. तुम्हाला वाटत असेल की, हे काय नवीनच खूळ? पण हे प्रकरण काही नवीन नाही. तब्बल १० वर्षांपूर्वीच 'लाबुबू'चा जन्म झाला होता.
काय आहे ही लाबुबू बाहुली?
हाँगकाँगमध्ये जन्मलेले कलाकार केसिंग लंग यांनी २०१५ मध्ये नॉर्डिक परीकथांपासून प्रेरित होऊन लाबुबू बाहुल्या तयार केल्या. अर्थात हे एका कार्टूनमधील एक पात्र होतं. मात्र, तब्बल एका दशकभरानंतर त्यांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. लंग यांनी अनेक कार्टून पात्र तयार केली. लाबुबू देखील त्यापैकीच एक आहे. 'द मॉन्स्टर्स' या सीरिजसाठी त्यांनी काही पात्र निर्माण केली होती. यामध्ये लाबुबूसोबतच झिमोमो, टायकोको, स्पूकी आणि पाटो सारखी इतर पात्र देखील होती.
कार्टून पात्राची बाहुली कधी झाली?
या पात्राचं बाहुलीत रूपांतर पहिल्यांदा २०१५मध्ये झालं. 'हाऊ-टू-वर्क' या कंपनीने त्यांच्या कलेक्टेबल फिगर्ससाठी लाबुबू बाहुल्या बनवल्या. नंतर २०१९मध्ये 'पॉप मार्ट' या कंपनीने लंग यांच्याशी कोलॅब करून, त्यांच्या 'द मॉनस्टर्स'मधील पात्रांच्या बाहुल्या बनवल्या, ज्यात लाबुबूचा समावेश होता. या बाहुल्या त्यांनी 'ब्लाईंड पॅकेजेस' अर्थात खरेदी करून उघडेपर्यंत कळणार नाहीत अशा पॅकेजिंगमध्ये विकायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी काही सेलिब्रिटींची आणि ब्रँड्सची मदतही घेतली होती.
म्हणजेच लाबुबू बाहुल्या २०१९पासून बाजारात आहेत. मग, त्यांची प्रसिद्धी अचानक कशी वाढली? असा प्रश्न उपस्थित होतो. याचंही उत्तर सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया आहे. के-पॉप बॅन्ड 'ब्लॅक पिंक'ची सदस्य लिसा हिने तिच्या बॅगवर लाबुबू बाहुली लटकवली होती. बस्स! ही बाहुली व्हायरल होण्यासाठी इतकंच कारण पुरेसं होतं. हाहा म्हणता या बाहुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला. एकटी लिसाच नाही तर, रेहाना आणि किम कर्दाशियन आणि 'बीटीएस'च्या वीने देखील आपल्याकडील लाबुबू बाहुल्या चाहत्यांना दाखवल्या आणि मग काय सगळ्यांनाच या बाहुल्या हव्याहव्याशा वाटू लागल्या.
काय आहे या 'बुबू डॉल'ची किंमत?
भले मोठे, थोडीशी धडकी भरवतील असे डोळे, विचकलेले नऊ टोकेरी दात आणि उभे टोकेरी कान अशी आकृती असणारी ही 'लाबुबू डॉल' मूळची चीनी आहे. आता हिच्या किमतीविषयी बोलायचं झालं तर, अगदी पावणेतीन लाखांपासून ते अगदी ४०० रुपयांपर्यंत ही बाहुली विकत मिळते. परदेशात तर ही बाहुली खरेदी करण्यासाठी तब्बल १.५-२ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या वर्षी ही बाहुली विकून कंपनीने खूप मोठा नफा कमावला होता. या वर्षी देखील ही कंपनी अशीच मालामाल होणार आहे, हे नक्की!