स्वयंपाकघरात झुरळांचा सुसुळाट हा अनेकांच्या घरातला कायमच त्रासदायक विषय असतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचे आणि अन्नपदार्थ तयार करण्याचे ठिकाण असले तरी, अनेकदा तेथे झुरळांचा सुळसुळाट प्रचंड असतो. विशेषत: किचनच्या केबिनेट आणि ड्रॉवरच्या कोपऱ्यात ही झुरळे लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. किचन कॅबिनेट आणि ड्रॉवरमध्ये झुरळे दिसणे हे फक्त किळसवाणेच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत हानिकारक ठरु शकते(How to Get Rid of Cockroaches in Your Kitchen Cabinets – Easy Cleaning Hacks).
झुरळे आपल्या अन्नपदार्थात आणि भांड्यांमध्ये रोगजंतू पसरवतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. झुरळांना घालवण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक औषधे उपलब्ध असली तरी, अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी विषारी रसायने वापरणे अनेकदा धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि ड्रॉवरमधून झुरळांना कायमचे पळवून लावण्यासाठी, काही सोपे, सुरक्षित आणि असरदार घरगुती उपाय अत्यंत उपयुक्त (remove cockroaches from kitchen naturally) ठरतात. झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी आणि किचन पुन्हा स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी खास ३ घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूयात...
किचन कॅबिनेट आणि ड्रॉवरमधून झुरळांना पळवून लावण्यासाठी...
१. कापूर स्प्रे :- कापूर स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला कापूरच्या ४ ते ५ वड्या आणि १ कप पाणी लागेल. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्या. आता त्यात कापूरच्या वड्या बारीक पूड करून घाला आणि ५ ते १० मिनिटे ते पाणी उकळू द्या. आता हे पाणी थंड करा आणि ते कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे आता रात्रीच्या वेळी किचन कॅबिनेट आणि ड्रॉवरच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडा. हा स्प्रे शिंपडल्यानंतर पाणी टाकू नका आणि रात्रभर तो तसाच राहू द्या. कपूरचा वास झुरळांना दूर पळवून लावतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिल्यास तुमच्या किचन कॅबिनेट व ड्रॉवरमधून झुरळे पळून गेलेली दिसतील.
२. तमालपत्र आणि काळीमिरीचा स्प्रे :- तमालपत्र आणि काळीमिरीचा स्प्रे तयार करण्यासाठी आपल्याला १० ते १२ तमालपत्र त्यासोबत १ चमचा काळीमिरीची पावडर आणि १ कप पाणी इतके साहित्य लागेल. आता पाण्यामध्ये तमालपत्र आणि काळीमिरी पूड टाकून १० मिनिटे उकळवा. यामुळे तमालपत्राचा तीव्र वास पाण्यात उतरेल. त्यानंतर हे पाणी थोडे आटवून घ्यावे. थंड झाल्यावर हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि किचन ड्रॉवर तसेच कॅबिनेटच्या आत व कोपऱ्यांमध्ये शिंपडा. तमालपत्र आणि काळीमिरीचा वास झुरळांना पळवून लावतो, त्यामुळे हा उपाय असरदार आहे.
३. कडुलिंब आणि आल्याच्या स्प्रे :- झुरळांना पळवून लावण्यासाठी कडुलिंब आणि आल्याचा स्प्रे तयार करण्यासाठी ५ ते ६ कडुनिंबाची पाने २ ते ३ टेबलस्पून ठेचून घेतलेलं आलं आणि एक कप पाणी इतके साहित्य लागणार आहे. एका भांडयात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने व ठेचून घेतलेलं आलं घालावं मग या पाण्याला हलकीशी उकळी येईपर्यंत ते गरम करुन घ्यावे. जेव्हा पाण्याचा रंग बदलू लागेल, तेव्हा गॅस बंद करून ते पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. किचन कॅबिनेट तसेच ड्रॉवरच्या कोपऱ्यांमध्ये हा स्प्रे शिंपडा. हा उपाय देखील झुरळांना पळवून लावण्यात असरदार ठरतो.