वैष्णवी हगवणेच्या दुर्देवी आत्महत्येनंतर चर्चा आहे हुंड्याची. किती वर्षे झाले भारतात हुंडाबंदी कायदा होऊन पण हुंड्यासाठी मोडणारी लग्न आणि लग्नानंतरचा छळ हे काही बदलत नाही. (How many more Vaishnavis will be killed for dowry? )हूंडा घेणे हे पाप आहे पण हूंडा देणेही चूकच. पण तरीही लोक हुंडा असे न म्हणता लेकीच्या खुशीसाठी म्हणून हुंडा देतातही, घेतातही. जितका मुलगा जास्त शिकलेला तितका हुंडा जास्त आणि तितकी मुलीकडच्यांवरची सक्ती जास्त. हे सारं सर्रास घडतं. लोक बोलतात खूप पण लेक जन्माला आली की त्यांना हुंडा आणि लग्नासाठीचा खर्च दिसू लागतो. याला जबाबदार कोण?
जन्मापासून लाडाने वाढवलेली पोर पैशासाठी हपापलेल्या लोकांना देऊन टाकताना मायबापाला काहीच वाटत नसेल का हा मोठा प्रश्न आहे. वडिलांची आयुष्याची कमाई ही मुलीच्या लग्नासाठी असते असे आपल्याकडे अभिमानाने सांगितले जाते. यात अभिमान वाटण्याजोगे काहीही नाही. (How many more Vaishnavis will be killed for dowry? )हूंडा एकदा दिला की झाले असे होत नाही. सासरच्यांच्या मागण्या वाढतच राहतात. मुलीच्या खुशीसाठी, संसारासाठी आणि समाजात आपली बदनामी नको म्हणून माहेरचे लोक मागण्या पूर्ण करतात. तर कधी आपली ऐपत आहे म्हणून मुलीच्या सासरी वाट्टेल तेवढे पैसे देतात. जबाबदार कोण हुंडा पद्धत बंद न व्हायला?
ॲडव्होकेट रमा सरोदे सांगतात, "हुंडा घेणे जेवढे चुकीचे तेवढेच हुंडा देणेही. एका पुरुषाला हुंडा देऊन स्वत:चा जावई करुन घेता म्हणजे तुम्ही स्वत:ची लाडाने वाढवलेली मुलगी विकता. असेच झाले. वडिलांसाठी तर मुलगी म्हणजे जीव की प्राण. मात्र तिलाच असे विकल्यासारखे देऊन टाकणे योग्य कसे काय वाटू शकते? हुंडा प्रथा बंद करायची असेल तर हुंडा घेणे बंद करण्याआधी हुंडा देणे बंद करायला हवे. हुंडा मागणाऱ्याला खडसावून सांगा मुलगी विकायला नाही ठेवली. हुंडा देणाऱ्या वडिलांबद्दल समाजाला आपुलकी वाटते. तो अगदी बिचारा वाटतो. मात्र मुलीच्या सासरचे जेवढे दोषी आहेत तेवढेच तिच्या माहेरचेही आहेत. जे हुंडा द्यायला तयार झाले. नाही म्हणा. पोरीची किंमत ठरवू नका."
गेली अनेक वर्षे समाजसुधारक हे सांगत आहेत की हुंडा देऊ नका, हुंडा मागू नका पण शिक्षणाचे प्रमाण वाढूनही हुंडा दिला घेतला जातो आणि शिकलीसवरलेली मुलं त्याचं समर्थन करतात. वैष्णवीसारख्या किती बळी जातात आणि किती खितपत त्रास सहन करत जगतात. वडिलांची बेअब्रू नको, मुलांचं कसं होईल म्हणत सहन करतात. याला जबाबदार कोण?