निरोगी राहण्यासाठी आपण काय नाही करत? जिम, कडक डाएट, वेळेवर झोपणे आणि तेलकट पदार्थांपासून लांब राहणं हे सध्याच्या काळातील आरोग्याचे गोल्डन रुल्स मानले जातात.(101 year old woman fitness) पण जर कोणी या सगळ्याच्या अगदी उलट जगत असेल आणि तरीही १०१ व्या वर्षी तंदुरुस्त, हसतमुख आणि सक्रिय असेल, तर..? सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीची दिनचर्या तुफान व्हायरल होत आहे.(healthy lifestyle at old age)
द साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, चीनमधील एका १०१ वर्षीय महिलेची जीवनशैली ऐकून डॉक्टरही थक्क झाले आहेत. दिवसभर झोपणं, रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं, मध्यरात्री नाश्ता करणं. ज्या सवयी आपण अनहेल्दी म्हणतो, त्याच सवयी तिच्या आयुष्याचा भाग आहेत. विशेष म्हणजे, तिचे दात आजही अगदी मजबूत आहेत, कधीही दंत उपचारांची गरज भासलेली नाही.
जियांग युएकिन असं या आजीचं नाव आहे. आग्नेय चीनमधील झेजियांग प्रांतातील वेन्झोउ येथे ती राहते. सात मुलांची आई असलेली जियांग तिच्या शांत स्वभावामुळे आणि अनोख्या दिनक्रमामुळे चर्चेत आली आहे. कुटुंबीयांच्या मते, ती रात्री २ वाजेपर्यंत टेलिव्हिजन पाहत जागी असते आणि सकाळी थेट १० वाजता उठते. उठल्यानंतर दिवसाची सुरुवात ती ग्रीन टी पिते. तिची मुलगी, याओ सॉन्गपिंग म्हणाली की तिची आई रात्री उशिरा असूनही लवकर झोपी जाते आणि गाढ झोप घेते.
दोन वर्षांपूर्वी तिच्या हाताला पडल्यामुळे दुखापत झाली होती. ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा दिनचर्येची सुरुवात झाली. बरं होण्यासाठी कुटुंबाने तिला घरकाम करण्यासही नकार दिला. दिवसा कमी काम असल्यामुळे ती दिवसा जास्त झोपू लागली आणि रात्री उशिरापर्यंत जागी राहू लागली. हा तिचा नवा रुटीन बनला. मात्र याचा तिच्या तब्येतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही.
जियांग आता ब्रंच करते. संध्याकाळी ६ वाजता जेवण करते आणि भूक लागल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास ती पुन्हा नाश्ता करते. तिचा आवडता नाश्ता म्हणजे मॅटिसॉन्ग नावाचा स्थानिक वेन्झोउ पेस्ट्री. तिला बिस्किटे, कुरकुरीत, शाकीमा आणि सुक्या रताळ्याचे स्नॅक्स असे पदार्थ जास्त आवडतात. वय असूनही, जियांगला कधीही दातांच्या किंवा दंत उपचारांची आवश्यकता भासली नाही. तिच्या मुलीने सांगितले की ती सर्वकाही हळूहळू आणि आरामात खाते.
तिच्या कुटुंबाने तिच्या दीर्घ आयुष्याचे सर्व श्रेय हे चांगली झोप, रोज ग्रीन टी पिणं आणि मानसिक ताण न घेणं याला दिलं आहे. जियांग फार रागवत नाही आणि राग मनातही ठेवत नाही. शांतपणे जगणं तिला फार आवडतं. तिच्या जगण्याला अनेकांनी दुजोरा दिला आहे. आयुष्याचा आनंद घेणं, हेच तिचं खरं फिटनेस सीक्रेट आहे.
