Join us
Daily Top 2Weekly Top 5

Galentine's Day : तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही! तुम्ही सांगितलंय कधी असं तुमच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 17:14 IST

Galentine's Day : celebrate 13 february with your friends, it's a special day : Galentine's Day २०२६: मैत्रिणींसाठी खास दिवस, आयुष्यभर साथ देणाऱ्या मैत्रीचं सेलिब्रेशन

प्रेमात पडणं, रोमान्स, ब्रेकअप किंवा लग्न संसार हे सारं कितीही रोमॅण्टिक असलं तरी जगणं सुसह्य आणि आनंदी करतात त्या मैत्रिणी. त्यांच्याशिवाय रोजचं आयुष्यच एकदम बेमतलब, फिकं होऊन जाईल. (Galentine's Day : celebrate 13 february with your friends, it's a special day )आपल्या मैत्रिणी आपल्यासाठी काय नाही करत, त्यांच्याशी चार घटका मारलेल्या गप्पाही थेरपी वाटतात. म्हणून व्हॅलेण्टाइन्स डेच्याआधी साजरा होतो गॅलेण्टाइन्स डे! म्हणजे मैत्रिणींनी एकमेकींसाठी साजरा केलेला दिवस.

व्हॅलेंटाइन्स डे जसा प्रेमींसाठी असतो, तसाच गॅलेंटाइन्स डे हा आपल्या जिवलग मैत्रिणींसाठी असतो. आयुष्यात जोडीदार महत्त्वाचा असतोच, पण त्याही आधी आपल्या सुख-दुःखात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आपल्या मैत्रिणी असतात. त्यांच्या सोबतीनेच अनेक आठवणी तयार होतात, सिक्रेट शेअर केले जातात आणि आयुष्य हलकं-फुलकं वाटतं. आयुष्यात एखादी तरी खास जिवलग मैत्रिण असणे फार गरजेचे. आणि अख्खा ग्रुपच भेटला तर मग तुमच्यासारख्या नशीबवान तुम्हीच. 

गॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात एका अमेरिकन मालिकेतून झाली. "Parks and Recreation" या मालिकेतल्या लेस्ली नोप या पात्राने १३ फेब्रुवारीला आपल्या मैत्रिणींना एकत्र बोलवले आणि गर्ल्स डेटचा प्लॅन केला. जोडीदार नसेल तर काय झालं मा‍झ्या मैत्रिणी तर आहेत. असं म्हणत त्यांनी तो दिवस साजरा केला. दिवसाला Galentine’s Day असं नाव दिलं. हा प्रसंग प्रेक्षकांना इतका आवडला की तो दिवस प्रत्यक्षातही साजरा केला जाऊ लागला. आज अनेक देशांमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

गॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी काही मोठी तयारी लागते असं नाही. मैत्रिणींना भेटून मनमोकळ्या गप्पा मारणे, एकत्र जेवायला जाणे, छोटंसं गेट-टुगेदर ठेवणे, एकमेकींना छोटेखानी गिफ्ट देणे किंवा फक्त एकत्र वेळ घालवणे इतकंच पुरेसं असतं. काही जणी खास फोटोशूट करतात, तर काही सोशल मीडियावर मैत्रिणींसाठी भावूक पोस्ट लिहितात. या दिवसाचा खरा अर्थ म्हणजे मैत्रीचा सन्मान. अनेकदा आपण प्रेमसंबंधांना जास्त महत्त्व देतो, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी मैत्री तितकीच अनमोल असते हे विसरुन जातो. गॅलेंटाइन्स डे आपल्याला याची जाणीव करुन देतो की, "सखी" ही नात्यांमधली एक ताकद असते. म्हणूनच १३ फेब्रुवारीला जर तुम्ही तुमच्या जिवलग मैत्रिणींना भेटलात, त्यांना 'तू माझ्यासाठी खूप खास आहेस" असं नक्की सांगा..

English
हिंदी सारांश
Web Title : Galentine's Day: Celebrate the Power of Female Friendship Before Valentine's!

Web Summary : Galentine's Day, celebrated on February 13th, honors female friendships. Inspired by a TV show, it's a day for celebrating the invaluable support and joy that friends bring to life. Forget romantic pressures; cherish your 'sakhis'!
टॅग्स :सोशल व्हायरलफ्रेंडशिप डेमहिलाव्हॅलेंटाईन्स डेव्हॅलेंटाईन वीक