Join us  

फ्रेंडशिप डेचा काहीच प्लॅन नाही? सेलिब्रेशनसाठी ४ हटके आयडीया; मित्रमंडळी होतील एकदम खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 11:18 AM

Friendship Day Celebration Gift Ideas : आपल्या मनातील मैत्रीची भावना आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी व्यक्त केली तर?

फ्रेंडशिप डे आपण लहानपणी शाळेत असताना आवर्जून साजरा केलेला असतो. त्यानंतर कॉलेजमध्येही आपण उत्साहाने हा दिवस साजरा करतो. पण जसजसे मोठे होत जातो तसे हे दिवस साजरे करण्याचे महत्त्व काहीसे कमी होत जाते. मात्र आपल्या मनातील मैत्रीची भावना, मित्रमंडळींवर असणारे प्रेम, बॉंडींग मात्र कायम असते. आपले मित्रमैत्रीणी काही ना काही कारणाने शहर, राज्य आणि अगदी देशही सोडतात. त्यामुळे आपण सोबत असतोच असे नाही. पण या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मनातील मैत्रीची भावना आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी व्यक्त केली तर ही मैत्री नक्कीच बहरण्यास मदत होते. या दिवसासाठी काहीच खास प्लॅन केला नसेल तर आज आपण अशाच काही हटके आय़डीया पाहूयात ज्यामुळे दूरवर असलेल्या आपल्या खास मित्राचा किंवा मैत्रीणीचा मूड आपल्याला फ्रेश करता येईल (Friendship Day Celebration Gift Ideas). 

१. केक किंवा गिफ्ट पाठवा

आपली मैत्रीण आपल्यापासून दूर राहत असेल तरी आजचा दिवस खास असल्याने या दिवसाच्या निमित्ताने आपण या मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या घरी, रुमवर एखादे लहानसे गिफ्ट, फुलांचा गुच्छ, केक किंवा अगदी चॉकलेटसही पाठवू शकतो. मित्रमैत्रीणीची आवड लक्षात घेऊन आपण हे पाठवले तर तो किंवा ती आणखीनच खूश होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

२. फूड ऑर्डर

आपल्या मित्र मैत्रीणीला काय आवडते हे साधारणपणे आपल्याला माहित असते. शाळेत किंवा कॉलेजला असताना आपण अनेकदा एखादा पदार्थ सोबत खाल्लेला असतो. या पदार्थासोबतच्या बऱ्याच आठवणी आपल्या मनात कायम असतात. असाच एखादा पदार्थ किंवा त्याला/ तिला आवडणारे काहीही आपण ऑर्डर करुन त्यांच्या पत्त्यावर पाठवू शकतो. शक्य असेल तर हा पदार्थ आपण हाताने करुनही त्यांच्या घरी पाठवू शकतो. 

३. सरप्राईज भेट

अनेकदा आपल्या खूप जवळचे मित्र मैत्रीणी असतील तरी आपण संसारात किंवा नोकरीत अडकल्याने आपला त्यांच्याशी संपर्क कमी झालेला असण्याची शक्यता असते. फ्रेंडशिप डे चे निमित्त साधून आपण या मित्राला किंवा मैत्रीणीला सरप्राईज भेटण्याचा प्लॅन करु शकतो. यामुळे मित्रमैत्रीणींना अचानक भेटल्याने आनंदही होईल.

(Image : Google)

४. नाटक किंवा चित्रपटाचे तिकीट

अनेकदा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात इतके बिझी होऊन जातो की आपल्याला कितीही ठरवून मित्रमैत्रीणींसाठी वेळ होतोच असे नाही. अशावेळी आपल्या मित्रमैत्रीणीने कामातून थोडा ब्रेक घ्यावा यासाठी आपण त्यांना सरप्राईज एखादे नाटकाचे किंवा चित्रपटाचे नाहीतर एखाद्या गाण्याच्या कॉन्सर्टचे तिकीट नक्कीच गिफ्ट करु शकतो. त्यामुळे त्यांना स्वत:साठीही थोडा वेळ मिळेल. शक्य असेल तर आपल्यासोबत नाहीतर त्यांच्या जोडीदारासोबत किंवा अन्य कोणासोबत ते याचा आनंद घेऊ शकतात.   

टॅग्स :सोशल व्हायरलरिलेशनशिपफ्रेंडशिप डेगिफ्ट आयडिया