'गाडीवाला आया घरसे कचरा निकाल' या गाण्याच्या ओळी संपूर्ण जगभर फारच प्रसिद्ध झाल्या. या गाण्यातील वाक्यानुसार किंवा सर्वसाधारणपणे जर कचऱ्याची गाडी आपल्या दारासमोर आली तर आपण घरातील कचरा थेट या गाडीत नेऊन टाकतो. पण समजा, हेच जर उलट झालं आणि ही कचऱ्याची गाडीच जर एक दिवस आपल्या दारात येऊन उभी राहिली आणि गाडी भरुन कचरा दारात टाकून गेली तर... अशाच काही घटना सध्या बंगळुरूमध्ये घडत आहेत. रस्त्यावर कचरा टाकू नये किंवा कचरा वेचणारे कर्मचारी किंवा गाडी आल्यावर त्यांना घरातील कचरा वेळेवर देणं, शहरी स्वच्छता राखणं यांसारख्या इतर गोष्टींची सवय लागावी यासाठी हे सगळे परिश्रम... (Dump Garbage On Bengaluru Streets, Civic Body Will Toss It Back To You).
बंगळुरु शहर स्वच्छ व रस्ते सुंदर ठेवण्यासाठी, कचरा फेकणाऱ्यांना आता मोठा दंड आणि एक अनोखी शिक्षा होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकताना पकडल्यास, दोषींच्या घराबाहेर कचरा टाकला जाईल. तसेच, २,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडही भरावा लागेल. बंगळुरू शहरातील शहर मार्शल कचरा फेकणाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करतात. वारंवार कचरा फेकणाऱ्यांची नावे सोशल मिडियावरही जाहीर केली जातील. या नव्या नियमांमुळे बंगळुरु स्वच्छ ठेवण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे(Bengaluru’s Bold Clean-Up Drive Those Who Litter Now Face Trash at Their Own Doorsteps).
नागरिकांमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती करूनही शहरात कचरा फेकण्याची समस्या काही कमी झालेली नाही. त्यामुळे आता ग्रेटर बंगळूरु अथॉरिटी (GBA) आणि बंगळूरु सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (BSWML) यांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. ग्रेटर बेंगळुरू प्राधिकरणाने एक अनोखी 'कचरा डंपिंग फेस्टिव्हल' मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, शहर मार्शल सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या लोकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करतात. एकदा ओळख पटल्यानंतर, अशा लोकांचे घर शोधून काढले जाते आणि त्यांच्या दारात पुन्हा ट्रकभर कचरा टाकला जातो. इतकेच नाही, तर वारंवार कचरा फेकणाऱ्यांची नावे सोशल मिडियावरही जाहीर केली जातील. BSWML चे व्यवस्थापकीय संचालक, करी गौडा यांनी सांगितले की, "पुरेशी जनजागृती मोहीम राबवूनही अनेक लोक जिथे मिळेल तिथे कचरा फेकत आहेत, अशा या वाईट सवयीला आळा घालण्यासाठी आम्ही ही खास मोहीम राबवत आहोत."
नागरिकांमध्ये झालेल्या सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे एकेकाळी कचरा टाकण्याची ठिकाणे असलेली ८६९ ठिकाणे कमी होऊन ती केवळ १५० पर्यंत कमी झाली होती. तरीही, काही भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याची समस्या अजूनही कायम असल्याने, प्रशासनाने आता अशा अनोख्या पद्धतीने अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविन्यपूर्ण जागरूकता उपक्रमाद्वारे, २१८ घरांसमोर जाणीवपूर्वक कचरा टाकण्यात आला आणि २.८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला," असे गौडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या नव्या नियमांमुळे बंगळूरुच्या रस्त्यांवरील कचऱ्याची समस्या लवकरच सुटेल अशी अपेक्षा आहे.
