दिवाळी हा सणांचा राजा. त्यामुळे या सणाची तयारीही आपण कशी दणक्यात करतो. अगदी घराच्या स्वच्छतेपासून ते फराळापर्यंत सगळंकाही मनापासून करतो. भरपूर पैसाही खर्च करतो आणि दिवाळी आनंदात साजरी करतो. दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपुजन (Diwali Laxmi pujan 2025). आता लक्ष्मीपुजनाची तयारी करताना बऱ्याच लहानसहान गोष्टीही पाहून ठेवाव्या लागतात, जेणेकरून मग ऐनवेळी गोंधळ उडत नाही. त्या वस्तूंची तयारी नेमकी कशी करायची, कोणकोणत्या गोष्टी आधीपासूनच आणून ठेवायच्या ते पाहूया..(Laxmi pujan pooja preparation)
लक्ष्मीपुजनाची तयारी कशी करावी?
१. लक्ष्मीपुजन आहे म्हटल्यावर आपल्याला सगळ्यात आधी लागते ती देवी लक्ष्मीची मुर्ती किंवा तिची प्रतिमा. त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मीची मुर्ती असेल तर ती घासून पुसून स्वच्छ करून ठेवा. फोटो असेल तर तो ही पुसून ठेवा. गणपतीची मुर्ती किंवा गणपतीचे प्रतिक म्हणून सुपारीही तुमच्याकडे असू द्या. कुबेर यंत्र किंवा कुबेर मुर्तीही पुजेमध्ये ठेवली जाते. त्याचीही तयारी करून ठेवा.
२. लक्ष्मीपुजनामध्ये पैसे आणि दागिनेही ठेवले जातात. त्यामुळे तुम्हाला किती पैसे ठेवायचे आहेत, पुजेमध्ये कोणते दागिने ठेवायचे आहेत ते सगळंही आधीच पाहून ठेवा.
३. लक्ष्मीपुजन जिथे करणार आहात त्याठिकाणी चौरंग, पाट, लाल कपडा, आंब्याची पानं, पणत्या, पणत्यांमध्ये घालायला तेल, काडेपेटी, फुलवाती, दोरवाती, धूप असं सगळं आणून ठेवा.
गुडघे, टाचा खूप दुखतात? 'या' पद्धतीने तिळाचं तेल लावा, काही दिवसांतच दुखणं थांबेल
४. पुजेसाठी कलश, विड्याची पानं, नारळ, हळद- कुंकू, अक्षदा, फुलं, हार, तांदूळ, गंध, पुजेसाठी नाणी असं सगळं घेतलं आहे का ते देखील पाहून ठेवा.
५. सगळ्यात शेवटी म्हणजे पुजेची जागा छान सुशोभित करून ठेवा. तिथे आधीपासून रांगोळी काढून घ्या आणि फुलांच्या माळा लाावून ती जागा छान सजवा.