भारतीय संस्कृतीत तांब्याची भांडी ही केवळ स्वयंपाकघरातील वस्तू नसून परंपरेचा आणि आरोग्याचा एक अविभाज्य भाग आहेत. अनेक वर्षांपासून आपल्या आजी–पणजींच्या काळापासून ही भांडी वापरली जात आहेत. पाणी पिण्यासाठी तांब्याचा लोटा, देवघरातली घागर किंवा सणासुदीला वापरली जाणारी तांब्याची पातेली, ही सर्व आपल्या घरातील पारंपरिक ओळखीचा भाग आहेत. (Copper utensils are good for health only if they are in this way, see how to clean it )वर्षानुवर्षे तांब्याची भांडी टिकून राहतात, फक्त त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. तांबे हवेशी संपर्कात येताच त्यावर काळपट थर साचतो, तांब्यावर वातावरणाचा, हवामानाचा आणि पाणी - पदार्थांचा परिणाम होतो. त्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. हा थर योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यास भांडी पुन्हा नव्यासारखी चमकतात.
भांडी स्वच्छ करताना डिटर्जंटऐवजी लिंबाचा रस आणि मीठ वापरणे सर्वोत्तम. लिंबातील नैसर्गिक आम्ल तांब्यावरील डाग आणि मळ सहज काढून टाकते. तसेच व्हिनेगर आणि तांदळाचे पीठ मिसळून केलेला लेप भांड्यावर चोळल्यास त्याची नैसर्गिक चमक टिकून राहते. फार काळवंडलेली भांडी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस याने स्वच्छ केल्यास तांबे पुन्हा उजळते. भांडी घासल्यानंतर लगेच कोरडी पुसावीत, अन्यथा हिरवट थर येऊ शकतो. घासताना स्टीलचा स्क्रबर न वापरता मऊ कापड किंवा नारळाची शेंडी वापरणे अधिक योग्य ठरते. हाताने स्वच्छ केले तरी हरकत नाही.
तांब्याची भांडी केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर आरोग्यालाही पोषक असतात. तांबे (Copper) या धातुतील घटकांचे प्रमाण शरीरासाठी फायद्याचे असते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अँटी बॅक्टेरियल असते. असे पाणी पिणे काही शारीरिक फायदे देते. पचन सुधारते, विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय तांबे यकृत, हृदय आणि मेंदूच्या कार्यासाठीही फायदेशीर ठरतो. आज आधुनिक काळातही अनेकजण तांब्याच्या भांड्यांचा वापर करत आहेत, कारण त्यातून मिळणारे आरोग्यदायी फायदे आणि नैसर्गिक घटक महत्त्वपूर्ण आहेत. वर्षानुवर्षे टिकणारी ही भांडी म्हणजे केवळ परंपरेचा ठेवा नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीसाठीही गरजेची आहेत.
