मध्यंतरी सगळीकडे खूपच पाऊस झाला. पावसामुळे सगळीकडेच ओलसर वातावरण आणि दमट हवा होती. याचा परिणाम म्हणजे त्यामुळे अनेक ठिकाणी साठवून ठेवलेल्या धान्यालाही ओल आल्यासारखी वाटू लागली आहे. धान्याला हात लावताच ते हाताला थोडे ओलसर असल्याप्रमाणे जाणवायला लागले आहे. काही ठिकाणी तर गहू, डाळी, तांदूळ अशा धान्यांमध्ये बारीक सोनकिडे दिसत आहेत. तर काही ठिकाणी धान्यामध्ये अळ्याही पडल्या आहेत. असं जर काही तुमच्या घरच्या धान्यामध्ये झालं असेल तर पुढे सांगितलेले काही सोपे उपाय अगदी लगेचच करून पाहा..
गव्हामध्ये सोनकिडे, अळ्या झाल्यास काय उपाय करावा?
१. ऊन देणे
सध्या पावसाला ब्रेक लागला असून जवळपास सगळीकडेच दुपारच्यावेळी अगदी कडक ऊन पडते आहे. अन्नधान्याला कधीही किडे किंवा अळ्या लागल्या तर त्या धान्याला उन्हात वाळवणे हा त्यावरचा एक सोपा पारंपरिक उपाय आहे.
'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू
सध्या ऊन भरपूर असल्याने हा उपाय लगेचच करा. गच्चीवर किंवा मोकळ्या अंगणात कपडा पसरवून टाका आणि त्यावर किड लागलेले गहू पसरवून ठेवा. ऊन कमी झाल्यावर गहू गोळा करून ठेवा. सलग २ ते ३ दिवस गव्हाला या पद्धतीने ऊन द्या. त्यानंतर ते चाळून घ्या आणि मग भरून ठेवा. गव्हातली किड, अळ्या निघून जातील.
२. गहू भरताना काळजी घ्या
आता जेव्हा तुम्ही गव्हाला ऊन द्या आणि ते पुन्हा कोठीमध्ये भरून ठेवाल तेव्हा सगळ्यात आधी कोठीमध्ये कडुलिंबाची काही पाने, लवंग, तेजपान हे पदार्थ घाला.
त्यावर थोडे गहू घाला. पुन्हा कडुलिंबाची पाने, लवंग, तेजपान यांचा थर द्या. असे थरावर थर देत गहू भरा. या पदार्थांमध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे गहू खराब होणार नाहीत.