Join us  

रोटी म्हणजे ‘बलून ब्रेड’? ट्विटरकर म्हणाले, भारतीय खाद्यपदार्थांची चेष्टा कराल तर याद राखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2021 11:36 AM

इटालियन फूड चॅनलला ट्रोल करत भारतीय नेटीझन्सने पाडला अक्षरश: कमेंटसचा पाऊस, काय नक्की हे प्रकरण?

ठळक मुद्देआपल्याकडील चपाती किंवा रोटी हा पदार्थही जगात विशेष प्रसिद्ध आहे.भारतीय पदार्थाची थट्टा केल्याने भारतीय नेटीझन्स शांत कसे बसतीललोकांनी त्यावर अतिशय हास्यास्पद तर काहींनी रागीट कमेंटस केल्या आहेत.

भारतातील अनेक पाककृती जगभरात प्रसिद्ध आहेत. या पदार्थांमधील वैविध्य, चव आणि ते करण्याची कला यासाठी भारतीय फूड इंडस्ट्रीची जगात विशेष ओळख असल्याचे पाहायला मिळते. आपल्याकडे वापरले जाणारे मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही इतर देशात बनवल्या जात नाहीत, त्यामुळे अनेकजण भारतातील जेवणाच्या पद्धती शिकतात आणि त्याप्रमाणे पदार्थ करायचा प्रयत्न करतात. आपल्याकडील चपाती किंवा रोटी हा पदार्थही जगात विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या सगळ्यांची आवडती आणि अनेकांचे रोजचे जेवण जिच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी ही रोटी. परदेशात ज्याप्रमाणे ब्रेड खाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याप्रमाणे भारतातील बऱ्याच भागात रोटी हा मुख्य घटक आहे. कधी गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, नाचणी अशा वेगवेगळ्या धान्यांची रोटी बनवली जाते.  

आता या रोटीला कोणी बलून ब्रेड म्हटले तर? वाचून आश्चर्य वाटले ना? पण असे झाले आहे. चपाती किंवा रोटीला एका इटालियन फूड चॅनलवर बलून ब्रेड म्हणून संबोधण्यात आले. अशाप्रकारे भारतीय पदार्थाची थट्टा केल्याने भारतीय नेटीझन्स शांत कसे बसतील. त्यांनी या पोस्टवर कमेंटस करुन असंख्य विनोद केले आहेत. तर काहींनी विनोदाच्या माध्यमातून आपली नाराजीही व्यक्त केल्याचे पाहायला मिळते. या पोस्टमध्ये रोटीचे दोन फोटोही दाखविण्यात आले आहेत. रोटी ही तव्यावर फुग्यासारखी फुगते म्हणून या चॅनलने त्याला अशा अनोख्या नावाने संबोधले असावे. विशेष म्हणजे त्यांनी ही रोटी कशी तयार करायची हे व्हिडिओच्या माध्यमातूनही दाखवले आहे.

कुकीस्ट या इटालियन चॅनेलवर हा घोळ घालण्यात आला आहे. यामध्ये या पदार्थासाठी कोणते घटक आवश्यक असतात, तो कसा तयार करायचा याचेही वर्णन देण्यात आले आहे. पीठ, कोमट पाणी, कोमट दूध, तेल आणि ड्राय यिस्ट या पदार्थांपासून तयार केला जाणारा पदार्थ असे म्हणून त्यांनी ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून लोकांनी त्यावर अतिशय हास्यास्पद तर काहींनी रागीट कमेंटस केल्या आहेत. यामध्ये वॉव मी स्पिचलेस आहे, मी लहानपणापासून बलून ब्रेड खातो हे मला माहितच नव्हते अशा कमेंटसचा समावेश आहे. एकाने तर भाताचा फोटो टाकून त्याला स्नो ग्रेन्स अशी कॅप्शन दिली आहे, तर एकाने हे लोक आता तूपाला गायीचे तेल म्हणतील असे म्हटले आहे. त्यामुळे भारतीयांच्या खाद्यपदार्थांची चेष्टा कराल तर ते ट्रोल केल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा असेच कदाचित नेटीझन्सना यातून सुचवायचे असेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल फोटोज्