आपल्या प्रत्येकाच्याच कपाटात असा एक कोपरा असतो, जिथे जुन्या कपड्यांचा ढीग साचलेला असतो. यातला एखादा टी-शर्ट आता लहान झालेला असतो, तर एखाद्या महागड्या सिल्कच्या दुपट्ट्याला कोठेतरी थोडासा डाग पडलेला असतो. कधी ती आपली पहिली जीन्स असते, तर कधी खास प्रसंगी घेतलेला एखादा ड्रेस. हे कपडे आता आपण वापरत नाही, पण त्यातील 'आठवणीं'मुळे ते फेकून देण्याचं मनही होत नाही. पण हे कपडे कपाटात जागा अडवून ठेवण्यापेक्षा जर तुमच्या घराची शोभा वाढवू लागले तर? हो, हे शक्य आहे! अनेकदा आपल्या वॉर्डरोबमध्ये असे जुने कपडे असतात, जे ना आपण पुन्हा घालतो ना ते फेकून द्यायची इच्छा होते. अशा कपड्यांना कचर्यात टाकण्याऐवजी त्यांचा वापर करून आपण स्टायलिश कुशन कव्हर तयार करू शकता. यामुळे तुमच्या घराला किंवा खोलीला नवीन आणि युनिक लूक मिळतोच, शिवाय अनावश्यक खर्चही वाचतो. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला प्रोफेशनल टेलर असण्याची किंवा खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी शिलाई मशीन न वापरता सुद्धा तुम्ही सुंदर डिझाइन्स तयार करू शकता(best DIY cushion cover ideas using waste clothes).
आजकाल 'अपसायकलिंग' आणि 'डीआयवाय' (DIY) होम डेकोरची प्रचंड क्रेज आहे. कपाटात पडून राहणाऱ्या याच जुन्या कपड्यांपासून आपण अतिशय स्टायलिश आणि युनिक 'कुशन कव्हर्स' तयार करू शकता. बाजारात मिळणारी कुशन कव्हर्स तर आपण नेहमीच पाहतो, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या कव्हर्सचा आनंद आणि (how to make cushion cover at home) त्यातील आपलेपणा काही वेगळाच असतो.
१. जुन्या शर्टपासून कुशन कव्हर कसे तयार करायचे ?
विशेषतः चेक्स किंवा प्लेन फॉर्मल शर्ट उशी कव्हरसाठी खूपच 'क्लासी' दिसतात. या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे शर्टची बटणे कुशनच्या मध्यभागी येतात, ज्यामुळे त्याला एक वेगळाच लूक मिळतो. जर तुम्हाला शिलाई येते, तर शर्टचा वापर करून 'बटण स्टाईल' कव्हर बनवणे खूप सोपे आहे. सर्वात आधी शर्टची सर्व बटणे लावून घ्या. कुशन शर्टच्या मध्यभागी ठेवा. कुशनच्या आकारापेक्षा चहूबाजूंनी सुमारे १-१ इंच जास्त कापड सोडून खडूने चौकोनी खूण करा. खडूने केलेल्या खुणेनुसार कापड कापून घ्या. कापडाचे दोन्ही भाग उलटे करा (बटण असलेली बाजू आत ठेवा) आणि चारही बाजूंनी शिलाई मारून घ्या. आता मधली बटणे उघडून कव्हर सुलट करा आणि त्यामध्ये उशी टाका. तुमचे स्टायलिश कव्हर तयार...
लग्नसोहळ्यात लहान चिमुकली लेक दिसेल परी, पाहा छोट्या 'करवली'साठी कस्टमाइज्ड नऊवारी साडी...
२. न शिवता जुन्या टी - शर्ट पासून कुशन कव्हर कसे करायचे ?
टी-शर्टला सपाट जागेवर नीट पसरवून ठेवा आणि कुशन त्याच्या मध्यभागी ठेवा. उशीच्या चारही बाजूंनी सुमारे ३ ते ४ इंच कापड अतिरिक्त सोडून एक मोठा चौकोनी भाग कापून घ्या. आता या ३ ते ४ इंचाच्या कडेवर कात्रीने जवळ-जवळ बारीक पट्ट्या (Strips) कापून घ्या. कुशन मधोमध ठेवा आणि टी-शर्टच्या वरच्या आणि खालच्या बाजूच्या पट्ट्यांची एकमेकांशी घट्ट गाठ बांधत जा. अशा प्रकारे चारही बाजू बंद केल्या की तुमचे न शिवताही उशी कव्हर तयार!
३. जुनी साडी किंवा ओढणीपासून कुशन कव्हर कसे करायचे ?
तुमच्याकडे एखादी जुनी बनारसी साडी, पैठणी किंवा भरतकाम केलेला हेव्ही दुपट्टा असेल, तर तो टाकून देऊ नका. त्यापासून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमसाठी महागड्या ब्रँड्ससारखे दिसणारे 'लक्झरी' कुशन कव्हर्स तयार करू शकता. साडी किंवा दुपट्ट्याचा जो भाग सर्वात जास्त नक्षीकाम असलेला (पदराचा भाग किंवा बॉर्डर) आहे, तो कुशनच्या वरच्या बाजूसाठी निवडा. उशी साडीवर ठेवा आणि त्याच्या आकारापेक्षा चहूबाजूंनी १ ते १.५ इंच जास्त कापड सोडून दोन चौकोनी तुकडे कापून घ्या.
कापडाच्या दोन्ही तुकड्यांच्या सुलट बाजू एकमेकांवर ठेवून (उलट बाजूने) तीन बाजूंनी शिलाई मारून घ्या. आता कव्हर सुलट करा आणि त्यात उशी भरा. चौथी उघडी बाजू तुम्ही सुई-दोऱ्याने शिवू शकता किंवा तिथे आकर्षक बटणे लावू शकता. जर साडी खूप पातळ असेल, तर आतल्या बाजूने जुन्या सुती कपड्याचे 'अस्तर' लावा, ज्यामुळे उशी कव्हर दीर्घकाळ टिकेल आणि त्याला चांगला आकार मिळेल.
