प्रश्न जेव्हा पोटापाण्याचा, लेकराबाळांच्या भविष्याचा आणि सुखी संसाराचा असतो, तेव्हा माणसाचं स्वतःचं अस्तित्व गौण ठरतं. "नोकरी आहे म्हणून घर चालतंय, नोकरी आहे म्हणून मुलांचं शिक्षण होतंय..." हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर ते प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जगण्याचा कणा आहेत. पण याच नोकरीच्या सुरक्षिततेसाठी एका सामान्य माणसाला नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागते, याचा अंदाज एसी केबिनमध्ये बसून आदेश सोडणाऱ्यांना कधीच येऊ शकत नाही. (Premlata Hembram Anganwadi worker Katihar news)अचानक शरीर साथ देईनासं झालं की रजा मागतानाही आजचा नोकरदार दहा वेळा विचार करतो. पण बिहारच्या कटिहारमध्ये जे घडलं, ते पाहून 'माणसाचं आयुष्य मोठं की नोकरीची हजेरी?' हा प्रश्न समाजाच्या काळजाला घरं पाडून गेला आहे.(Insensitive administration Bihar Anganwadi worker case) अंगात कडाक्याचा ताप, डोळ्यांत मृत्यूची भीती आणि नसांमध्ये सलाईनची ड्रिप असतानाही, केवळ 'साहेबांना' आपला आजार खोटा वाटू नये म्हणून एका अंगणवाडी सेविकेला भर रस्त्यातून पायपीट करावी लागली. आपल्या बायकोच्या एका हाताला सावरत आणि दुसऱ्या हातात सलाईनची बाटली उंचावून तो नवरा रस्त्यावरून चालत होता. हे विदारक चित्र केवळ बिहारचं नाही, तर संवेदनशून्य व्यवस्थेसमोर गुडघे टेकलेल्या प्रत्येक हतबल नोकरदाराचं आहे.
कटिहार जिल्ह्यातील मनिहारी तालुक्यातील प्रेमलता हेंब्रम यांची ही कहाणी अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आणि पुन्हा प्रश्नासनाला जाब विचारु लागली आहे. गंभीर आजारपणामुळे त्या घरीच उपचार घेत होत्या. पण, निरीक्षणासाठी आलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी वीणा भारती यांना त्या महिलेच्या वेदना दिसल्या नाहीत, दिसली ती फक्त 'अनुपस्थिती'. अधिकाऱ्यांच्या एका अविश्वासाने त्यांना मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर आणलं. 'जर हजर झाला नाहीत, तर नोकरी जाईल' या सुप्त भीतीने प्रेमलता यांना सलाईनच्या बाटलीसह केंद्रावर धाव घ्यावी लागली. हा व्हिडीओ Brut india या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
सामान्य माणसासाठी 'नोकरी जाणं' म्हणजे केवळ पगार थांबणं नसतं; तर तो त्याच्या जीवन-मरणाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न असतो. याच भीतीचा फायदा जेव्हा व्यवस्था घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकीचा मृत्यू होतो. एका कर्मचाऱ्याच्या प्रकृतीपेक्षा त्याची कागदावरची हजेरी महत्त्वाची मानणारी ही मानसिकता आजच्या प्रगत समाजासाठी खरंतर लाजीरवाणी आहे.
पाहायला गेलं तर नियम हे माणसासाठी असतात, माणूस नियमांसाठी नसतो. कर्तव्य बजावणं गरजेचं तर आहेच पण त्या कर्तव्याच्या ओझ्याखाली माणुसकी मात्र चिरडली जाता कामा नये. प्रेमलता यांची ही विवशता पाहून आज पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची ही संवेदनशून्यता पाहायला मिळली आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी आवाज उठवला. भविष्यात कोणत्याही 'प्रेमलता'ला आपल्या आजारपणाचा पुरावा सलाईनच्या बाटलीसह द्यावा लागू नये, यासाठी नियमांमध्ये मानवी मूल्यांची पेरणी होणं अनिवार्य आहे. पण, जेव्हा अधिकारी कर्मचाऱ्याला 'मशीन' न समजता 'माणूस' म्हणून पाहतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासाची कामे आणि समाज प्रगत होईल. माणुसकी जपली तरच कर्तव्य सार्थ ठरेल!
Web Summary : A Bihar Anganwadi worker, forced to prove her illness to her superiors, attended work with a saline drip. Fear of job loss drove her to this extreme measure, highlighting the insensitivity of the system towards struggling employees.
Web Summary : बिहार की एक आंगनवाड़ी कार्यकर्ता, जिसे अपने वरिष्ठों को अपनी बीमारी साबित करने के लिए मजबूर किया गया, सलाइन ड्रिप के साथ काम पर आई। नौकरी छूटने के डर ने उसे यह चरम कदम उठाने के लिए प्रेरित किया, जो संघर्षरत कर्मचारियों के प्रति व्यवस्था की असंवेदनशीलता को उजागर करता है।