The silence about difficult diseases can be dangerous for women! | अवघड आजारांबद्दलचं मौन स्त्रियांसाठी घातक ठरू शकतं!
अवघड आजारांबद्दलचं मौन स्त्रियांसाठी घातक ठरू शकतं!

-डॉ. गीता वडनप

गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढावं लागणं किंवा स्तनांच्या कर्करोगात स्तन काढावे लागणं यासारख्या अनुभवांना सामोरं जाणं कोणत्याही स्रीसाठी अवघडच असतं. पण एवढय़ा अवघड गोष्टींबद्दल स्त्रिया मोकळेपणाने बोलत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेत बोलत नाहीत.
त्रास मग तो मासिक पाळीचा असो, की समागमाच्या वेळेस होणा-या रक्तस्त्रावाचा, स्वत:ला होणारा प्रत्येक त्रास स्त्रियांसाठी संकोच आणणारा, लाज वाटणारा आणि कोणालाही न सांगण्यासारखाच असतो. गप्प सहन करणं, दुखणं अंगावर काढणं हा एक मार्ग कायम शोधला जातो. पण यामुळे कोणत्याही स्त्रीचा फायदा होत नाही हेच वास्तव आहे.

खरं तर स्त्री म्हणजे सृजननिर्मितीची क्षमता असणारा एक महत्त्वाचा स्त्रोत. स्त्री म्हणजे खंबीरता.  सहनशीलतेनं परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता म्हणजे स्त्री. अनेक सार्मथ्यांची बेरीज म्हणजे स्त्री. अशा या स्त्रिला तिच्या आयुष्यात कशाकशाला सामोरं जावं लागतं नाही? पण कित्येकदा दुखरे कोपरे हळुवार बंद करत ती स्वत:ला त्यात अलगद मिटून घेते.

मला माझी पेशंट वेदिका आठवते. नुकताच चाळिशीचा उंबरठा ओलांडलेली. दहावीत शिकणा-या  एका मुलीची आई असलेली वेदिका. हसरी, चपळ आणि घरगुती केटरिंगचा उद्योग सर्मथपणे चालवणारी वेदिका त्यादिवशी मात्र ओढलेली, फिकुटलेली दिसत होती. दहा दिवसांपूर्वी आलेली मासिक पाळी आणि तेव्हापासून होत असलेला रक्तस्राव थांबावा यासाठी तिला औषध हवं होतं. घरातल्या गौरी-गणपतीत अडचण नको म्हणून तिला रक्तस्त्राव थांबावा असं वाटत होतं. स्वत:ला त्रास होतोय म्हणून नाही हे विशेष.

तिच्याशी बोलताना कळलं की, गेले कित्येक महिने  वेदिकाची मासिक पाळी अनियमित झाली होतीच; पण पाळीच्या प्रत्येक वेळेस खूप दिवस आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होत होता. या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे गेलं तर नाना तपासण्यांचं चक्र, रिपोर्ट्स, उपचार, शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढणं यातलं वेदिकाला काहीही नको होतं. म्हणून होता होईल तेवढं तिनं अंगावर काढलं. पण देवा-धर्माचं कारण पुढे आलं म्हणून तिचा नाइलाज झाला आणि तिला माझ्याकडे यावं लागलं. वेदिकाचं म्हणणं होतं की रजोनिवृत्तीच्या आसपास प्रत्येक स्त्रीला थोडाफारत्रास होतोच. काही तपासण्या करायला गेलो आणि त्यातून काही भलतंच निदान निघालं तर डॉक्टरांनी सुचवलेली गर्भाशय काढायची शस्त्रक्रिया अटळ असेल. 

वेदिकेच्या म्हणण्याप्रमाणे गर्भाशय म्हणजे  स्त्रीत्वाची एक प्रकारची ओळखच आणि तेच जर काढलं तर तिच्यातील बाईपणात कुठेतरी कमतरता नक्कीच येईल. समागमाच्या वेळेस ती तिच्या नव-याला पुरेसा आनंद देऊ शकणार नाही. त्याचबरोबर शस्त्रक्रिया म्हणजे काही दिवसांचा सक्तीचा आराम आणि त्यामुळे मुलीच्या अभ्यासावर आणि स्वत:च्या उद्योगावर होणारा परिणामांना ती घाबरत होती; पण वेदिकेसारख्या अनेक स्त्रियांना स्वत:बद्दलच्या विचारांना बदलण्याची गरज आहे. बाईपणाची आंतरिक ओढ आणि शरीरधर्माच्या बदलातून निर्माण होणा-या  समस्यांचा सामना करण्याची हुशारी याचा समन्वय साधता यायला हवा.

काही स्त्रियांमध्ये त्यागाची भावना इतकी प्रबळ असते की, एखाद्या सन्मानासाठी किंवा कर्तव्यासाठी  स्वत:चं अस्तित्व विसरायची त्यांची तयारी असते.
त्रास म्हणजे उणीव नव्हे !
स्त्रियांमध्ये  प्रामुख्यानं जननेंद्रियांचे काही आजार सर्वसाधारणपणे दिसून येतात. पण हे आजार स्त्रिया अंगावरच काढतात. खरं तर  त्यावर न संकोचता, न लाजता डॉक्टरांनाकडे जाऊन तपासणी करून घेणं ही आवश्यक गोष्ट आहे. 
योनिमार्गातून स्राव जाणं (व्हजायनल इन्फेक्शन), गर्भाशयातील फायब्रॉइड्स, एण्डोमेट्रिओसीस, अँडिनोमायोसीस, गर्भाशयाचा प्रोलॅप्स, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, बीजांडाला आलेली सूज/गाठ, तसेच स्तनामध्ये गाठ येणं, संप्रेरकांची (हार्मोन्सची) कमतरता अथवा त्यांचं अतिप्रमाण यानंसुद्धा मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशावेळी माझ्यात काही उणीव आहे अथवा उणीव निर्माण होईल यासारख्या निर्थक विचारांना स्रियांनी हद्दपार करून स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.
 

 धोक्याचे इशारे ओळखा ! 

जननेंद्रियांसंबंधित असणारे आजार जर शरम, संकोच आणि भीतीनं दडवून ठेवले तर पुढे जाऊन या समस्या, त्रास उग्र आजाराचं रूप धारण करतात. उदा. मासिक पाळीच्या तक्रारी, स्तनामधील गाठ, योनिमार्गातील  स्त्राव, ओटीपोटावरील सूज, पोट दुखणं, कंबर दुखणं, समागमाच्या वेळेस रक्तस्त्राव होणं, अतिशय वेदना होणं या गोष्टी लाजून दडवून ठेवण्याच्या नाहीत. उलट संभाव्य धोक्यांची ही प्राथमिक लक्षणं असतात. कित्येक आजार प्राथमिक अवस्थेत स्रियांना जाणवतात; पण आजाराकडे दुर्लक्ष करण्याच्या, स्वत:च्या आरोग्य प्रश्नांना दुय्यम समजण्याच्या सवयीमुळे छोटी लक्षणं गंभीर आजाराचं रूप धारण करतात.

 


 

सांगितले तर प्रश्न सुटतात !

गर्भाशयातील गाठींमुळे स्रीला योनिमार्गातून अनियमित रक्तस्त्राव होणं, ओटीपोटात दुखणं, अँनिमिया किंवा कंबर दुखणं यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. पण हाच त्नास अंगावर काढला तर वाईट आणि नकारात्मक विचारांनी स्री स्वत: खचून जाते. सोबत आपलं आणि आपल्या कुटुंबाच भावविश्व पूर्णपणे अस्थिर करते.

आतल्या आत कुढत राहून ती स्वत:चं मानसिक आरोग्यही बिघडवते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासंकोची वृत्तीमुळे प्राथमिक पायरीवरचा हा आजार पुढची गुंतागुंत निर्माण करतो. पण हा होणारा त्रास त्या स्त्रीनं आपल्या नव-या जवळ, आईजवळ किंवा मैत्रिणींजवळ बोलून दाखविला तर तिला नक्कीच भावनिक मदत आणि डॉक्टरांकडे जाण्याचा योग्य सल्ला मिळेल.

गंभीर आजारही त्यांच्या प्राथमिक टप्प्यात लक्षात आले तर त्यावरची उपचार प्रक्रिया कमीत कमी कटकटीची आणि किमान त्रासाची ठरते. त्याचबरोबर आजारातून पूर्ण बरं होण्याचा कालावधीही लक्षणीय कमी ठरतो. उदा. गर्भाशयातील एखादी छोटीशी फायब्रॉइडची गाठ वेळीच उपचारांच्या अभावी वाढत जाऊन पूर्ण गर्भाशय काढण्याची गरज निर्माण करू शकते. पण हे टाळता येणं शक्य आहे.

समागमाच्या वेळेस होणारा रक्तस्राव कधी कधी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची लक्षणं दर्शवतो. या ठिकाणी त्या स्त्रीनं लाज बाळगली तर गंभीर ठरू शकते.  याबाबतीत आपल्या जोडीदाराशी अथवा जवळच्या मैत्रिणींशी बोलून आपलं मन मोकळं केलं तर पुढील गुंतागुंत टळू शकते. आजारपणाच्या प्राथमिक स्तरावर स्रीला भावनिक मदत मिळाली तर मोठे वाटणारे आजारसुद्धा वेळीच तपासणी आणि औषधोपचारानं पूर्णपणे बरे होतात असा निष्कर्ष एका वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आला आहे.  बाईपण, स्त्रीत्व हे स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे.  त्याला जोखड बनविण्याची गरज नाही. खरी गरज स्त्रीनं स्वत:ला एक माणूस म्हणून बघायला शिकण्याची आहे.

(लेखिका फॅमिली फिजिशिअन आहेत)

geetawadnap@gmail.com

Web Title: The silence about difficult diseases can be dangerous for women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.