Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना काय गिफ्ट द्यायचं? महागडी खेळणी, कपडे सोडून ऑप्शन काय? ही घ्या पैसा वसूल लिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 16:35 IST

या दिवाळीत लहान मुलांना काय बरं गिफ्ट द्यावं? हा प्रश्न अनेकदा पडतो. म्हणूनच या काही वस्तू एकदा नक्की बघून घ्या.  नक्कीच या गोष्टी लहान मुलांसाठी ठरतील एक पैसा वसूल गिफ्ट. 

ठळक मुद्देलहान मुलांना गिफ्ट देताना थोडा वेगळा विचार करा आणि हे काही पर्याय त्यांना उपयुक्त ठरतील का याचा विचार करा. 

दिवाळी म्हणजे एका अर्थाने भेटवस्तूंची देवाणघेवाण. त्यामुळे दिवाळी येताच खूप सारी शॉपिंग करावी लागते. दिवाळी आली की घरातल्या मंडळींसाठी तर आपण नक्कीच काहीतरी घेतो. पण त्यासोबतच इतर नातलगांना, मित्रमंडळींनाही काही ना काही भेटवस्तू आवर्जून दिली जाते. मोठ्या मंडळींना गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण लहान मुलांना काय गिफ्ट द्यावं हे अनेकदा कळतच नाही. कपडे घेतले तर त्याचं माप हुकतं किंवा आवडीनिवडी जुळत नाहीत. त्यामुळेच लहान मुलांना गिफ्ट देताना थोडा वेगळा विचार करा आणि हे काही पर्याय त्यांना उपयुक्त ठरतील का याचा विचार करा. 

 

लहान मुलांसाठी गिफ्ट खरेदी करताना.....- लहान मुलांसाठी गिफ्ट खेदी करताना ती गोष्ट खरोखरंच मुलांच्या कितपत उपयोगी पडणार आहे याचा नक्की विचार करा. अनेकदा खेळणी घेतली जातात. मुलं एक- दोनदा तो खेळ खेळतात आणि त्यानंतर मात्र ती खेळणी खेळण्यांच्या बॉक्समध्ये पडून राहतात. त्यामुळे आपण दिलेली भेटवस्तू उपयोगी ठरेल का, याचा विचार जरूर केला पाहिजे.- गिफ्ट द्यायचं म्हणजे ते महागडंच असावं, असं काही नाही. कमी किमतीचं पण क्रियेटिव्ह गिफ्ट मुलांना अधिक आवडतं. - लहान मुलांना जर खेळणी देण्याचा विचार करत असाल, तर ती खेळणी मुलांचा बौद्धिक विकास करणारी हवीत.- खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना ज्ञानच मिळालं पाहिजे असं काही नाही. पण ती खेळणी मुलांना नक्कीच वेगळा विचार करायला लावणारी, गुंतवून ठेवणारी हवीत.

 लहान मुलांना देऊ शकता या काही गोष्टी१. मॅजिक प्लॅन्टमुलांना झाडांची, फुलांची आवड लावण्यासाठी हे एक छान गिफ्ट आहे. यासाठी फक्त एवढंच करा. एक छान कुंडी विकत घ्या. त्या कुंडीला छान रंग देऊन आकर्षक बनवा. ज्याला कुणाला ही कुंडी गिफ्ट करणार आहात, त्या छोट्या मुलाचं- मुलीचं नाव या कुंडीवर लिहा. या कुंडीत एक छान रोप लावा आणि हे गिफ्ट तुम्ही मुलांना द्या. हे एक मॅजिक प्लॅन्ट आहे आणि तुला त्याची काळजी घ्यायची आहे, असं सांगून जर एक आकर्षक कुंडी मुलांना भेट दिली, तर मुलं ती कुंडी आणि त्यातलं झाडं नक्कीच जिवापाड जपतात. मुलांना झाडांची, फुलांची आवड लावण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

 

२. मुलांना ॲक्टीव्ह बनवणारे खेळ द्यालहान मुलं एकाच जागी बसून असतात, सारखं मोबाईल बघतात, ही बहुसंख्य पालकांची तक्रार. त्यामुळे मुलांची ही सवय जर थोडीफार कमी करायची असेल तर मुलांना ॲक्टीव्ह बनविणारे खेळ द्या. कॅरम, बॅडमिंटन, टेनिस रॅकेट, स्केटींग, चेस असे काही गिफ्ट तुम्ही मुलांना देऊ शकता.

 

३. गोष्टींच्या ऑडियो कॅसेट्ससध्या लहान मुलांना गोष्टी सांगायला त्यांची आजी त्यांच्याजवळ नसते. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं लहान असतील तर त्यांना गोष्टींची पुस्तकं वाचणं जमत नाही. म्हणूनच तर मग गोष्टींची ऑडियो कॅसेट मुलांना तुम्ही देऊ शकता. बाजारात जर अशा कॅसेट्स शोधायला वेळ मिळाला नाही, तर सरळ एक पेन ड्राईव्ह घ्या. या पेनड्राईव्हमध्ये मुलांच्या आवडीनुसार गोष्टींच्या ऑडियो फाईल्स टाका आणि त्या पेन ड्राईव्हवर मुलांचं नाव लिहून ते त्यांना गिफ्ट करा. मुलांना जर गोष्टी ऐकायची सवय लागली तर आपोआपच त्यांची अभ्यासातली एकाग्रता वाढू लागते. चंचल मुलांना तर या गोष्टींचा खूपच फायदा होतो. 

 

४. एखादं वाद्य देऊन बघालहान मुलांना कशाची आवड आहे, हे जाणून घेण्यासाठी अशा गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. इलेक्ट्रिक माईक, छोटा पियानो, कॅसियो, गिटार, डफली, बासरी अशी वाद्ये खूप महाग नसतात. अशी वाद्ये जर आपण मुलांना दिली तर कदाचित त्यांना ती आवडू शकतात. यातून मुलांचा कल खरोखरंच संगीताकडे आहे का, असेल तर कोणते वाद्य त्याला आवडते आहे, हे आपण जाणून घेऊ शकतो आणि भविष्यात त्या दृष्टीने त्याला घडवू शकतो. 

 

टॅग्स :खरेदीगिफ्ट आयडियादिवाळी 2021