'सुगी'. समृद्धीसह स्वास्थ्य घेऊन येणारा हा शब्द. सुगी शब्द ऐकताच शेतातली सगळी समृद्धी डोळ्यासमोर दिसायला लागते. गावोगावी होणाऱ्या हुरडा पार्ट्या, खान्देशातली भरीत कळण्याच्या भाकरी, विदर्भात सांभारवडीचा घाट, गाजरहलव्यासह सगळ्या स्नेहल वस्तूंचं आदानप्रदान आणि आनंदाची लूट म्हणजे सुगी! म्हणूनच 'मुंबई स्वयंपाकघर' फेसबुक ग्रुप आणि मुलुंडचा 'महाराष्ट्र सेवा संघा’ने आयोजित केला आहे सुगी महोत्सव. 6, 7, 8 फेब्रुवारी २०२६ असे तीन दिवस चालणारा हा सुगी महोत्सव, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम इथे साजरा होत आहे. लोकमतसखीडॉटकॉम (Lokmatsakhi.com) या सोहळ्याचे डिजिटल पार्टनर आहे.
खाद्य संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक मोहसिना मुकादम आणि सगळ्यांसाठी हुरडा घेऊन येणारे सोलापूरचे शेतकरी मोहन अनपट यांच्या हस्ते या तिन्ही दिवसात कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या महाेत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ७ फेब्रुवारीला ख्रिसमस केक्ससंदर्भात फ्रुट सोकिंग सेरीमनी प्रिया वाडकर घेत आहेत. सोलापूरच्या पद्मशाली समाजाच्या पाककृती शिकवण्यासाठी शोभा बोल्ली येत आहेत. आणि संध्याकाळी 6 वाजता चंद्रकांत कुलकर्णी, नंदू माधव, चिन्मयी सुमित, प्रतीक्षा लोणकर, सायली राजाध्यक्ष, शुभांगी गोखले आणि भक्ती चपळगावकर यांच्या उपस्थितीत हुरडा पार्टी रंगणार आहे. रविवारी 8 फेब्रुवारी रोजी क्रिस्प अँड क्रंच ही कार्यशाळा दुपारी १२ वाजता भक्ती चपळगावकर घेत आहेत. संध्याकाळी ५.३०वाजता खाद्यसंस्कृती वरच्या खमंग गप्पा रंगणार आहेत - इब्राहिम अफगाण, साधना तिप्पनाकजे, वैभव भाल्डे, मकरंद जोशी, मंजिरी जोशी वैद्य आणि सागर दामले यांच्यासोबत.
अर्थातच या सगळ्यांसोबत खाद्य महोत्सव चालणार आहे तो महाराष्ट्र सेवा संघाच्या टेरेसवर- जिथे राज्यभरातून उत्तमोत्तम गृहउद्योग सहभागी झालेले आहेत. याशिवाय विविध वस्तूही या प्रदर्शनात मिळतील. मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर सांगतात, हा सुगी महोत्सव म्हणजे खाणं खरेदी गप्पा आणि स्नेहसोहळा आहे.
Web Summary : Mumbai is hosting 'Sugi,' a festival celebrating food, culture, and home businesses. From February 6-8, 2026, the event features food stalls, workshops, and talks by experts. Enjoy Hurda parties, regional cuisine, and support local entrepreneurs at Maharashtra Seva Sangh, Mulund.
Web Summary : मुंबई 'सुगी' की मेजबानी कर रहा है, जो भोजन, संस्कृति और गृह व्यवसायों का उत्सव है। 6-8 फरवरी, 2026 तक चलने वाले इस कार्यक्रम में खाद्य स्टॉल, कार्यशालाएं और विशेषज्ञों के वार्तालाप शामिल हैं। महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड में हुरडा पार्टियों, क्षेत्रीय व्यंजनों का आनंद लें और स्थानीय उद्यमियों का समर्थन करें।