Join us  

१० सोप्या गोष्टी करा, थोडी स्मार्ट अदलाबदल; दिवाळीत घराचा लूकच बदलून जाईल! दिसेल एकदम पॉश..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 11:22 AM

तेच ते घर बोअर झालंय? दिवाळीच्या निमित्ताने करा ‘हे’ चेंजेस आणि बदला घराचा लूक

ठळक मुद्देसहज सोप्या गोष्टी करुन तुम्ही देऊ शकता घराला नवीन लूकतेच ते घर कंटाळवाणे झाले असेल तर छोटे बदल करुन तर पाहा

कोरोनामुळे मागच्या जवळपास २ वर्षांपासून आपण सगळे घरात आहोत. मुलांचे शाळा, कॉलेज घरातून, आपले ऑफीस घरातून यामुळे सतत त्याच त्या जागेत बसून आपल्याला नक्कीच कंटाळा आला असेल. आता कोरोनाचे सावट काहीसे कमी झाले आहे आणि आपण आधीसारखे बाहेर पडायलाही सुरुवात झाली आहे. तरी घरात आले की तेच ते घर, त्याच त्या वस्तू बघणे अनेकदा कंटाळवाणे होऊ शकते. ४ दिवस बदल म्हणून आपण ट्रीपला जाऊन येतो, कधी कोणा नातेवाईकांकडे राहायला जातो पण पुन्हा आपल्याच घरी आल्यावर आपल्याला घरातील रचनेचा आणि वस्तू नकोशा होऊ शकतात. अशावेळी काही सोप्या युक्त्या वापरल्या तर आहे त्या घरात तुम्हाला नवीन काहीतरी केल्याचा फिल नक्की येऊ शकेल. दिवाळीच्या निमित्ताने तसेही आपण घर आवरायला काढतो, घराची साफसफाई करतो. मग याचवेळी काही सहज करता येतील अशा गोष्टी करुन तर बघुया. न जाणो आपलेच घर आपल्याला नवे भासेल. पाहूयात अशाच काही सोप्या टिप्स...

१. घराच्या हॉलमध्ये सोफासेट, सेटी, खुर्च्या, टिपॉय एखादा कॉर्नर पिस असे फर्निचर असते. हे फर्निचर वर्षानुवर्षे त्याच जागेवर असते. अशावेळी या फर्निचरची जागा आदलाबदल केल्यास जरा वेगळे वाटू शकते. 

२. अनेकदा आपल्या घरात भिंतीवर काही फ्रेम्स असतात. यात देवाच्या, निसर्गचित्रे कधी अॅबस्ट्रॅक्ट पेंटींग असे असते. या फ्रेम्सच्या जागांची अदलाबदल करुन बघा. बेडरुममधील एखादी फ्रेम हॉलमध्ये लावा. यामुळे तुम्हालाच तुमचे घर नवे वाटू शकते. 

( Image : Google)

३. काही वेळा आपल्याला गिफ्ट मिळालेल्या काही फ्रेम आपण कुठेतरी ठेऊन दिलेल्या असतात. ते आपल्याही लक्षात नसते. घराची आवराआवर करताना अशा फ्रेम्स सापडल्या तर जुन्या फ्रेम्स काढून त्याठिकाणी या फ्रेम्स लावा.

४. हॉलमध्ये किंवा किचनमध्ये एखाद्या भिंतीवर घड्याळ असते. सध्या बाजारात स्टीकरची किंवा पारंपरिक पद्धतीची घड्याळे अगदी कमी किमतीत मिळतात. दिवाळीच्या निमित्ताने घरातील व्यक्तींनाच असे एखादे घड्याळ भेट म्हणून देऊ शकता. जेणेकरुन ते घरातील एखाद्या भिंतीवर छान दिसेल. काही दिवसांनी जुने घड्याळ पुन्हा वापरु शकता.

५. घरातील खिडक्यांच्या पडद्यांचा आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. तोच रंग, तेच कापड पाहून आपण कंटाळतो. अशावेळी आतमध्ये जुने पण चांगले पडदे असतील तर ते काढून लावा. किंवा खिडक्यांचा आकार सारखा असेल तर आतल्या खोलीतील पडदे बाहेर आणि बाहेरचे आत असेही करु शकता.  सध्या भाड्यानेही पडदे मिळतात. काही दिवसांसाठी अशाप्रकारे भाड्याने पडदे घेऊन लावल्यास तुम्हालाही तुमच्या घरात वेगळा बदल झाल्यासारखे वाटेल. 

६. बेडरुममध्ये बेड, कपाट या गोष्टींची जागा हलवणे अनेकदा शक्य नसते. अशावेळी त्याठिकाणच्या भिंतीला एखादा वॉलपेपर लावल्यास खर्चही कमी होतो आणि खोली नव्यासारखी वाटते. हल्ली ऑनलाइनही अनेक प्रकारचे स्टीकर डिझाइन्स मिळतात. यामध्ये कार्टून, निसर्गचित्रे पुस्तकांची चित्रे असे बरेच पर्याय असतात. त्यातले आपल्या किंवा मुलांच्या आवडीचे पर्याय निवडून तुम्ही एखाद्या भिंतीला लावू शकता. 

( Image : Google)

७. हॉलमध्ये असलेल्या सोफ्याचे कव्हर्स, पिलो कव्हर्स दिवाळीच्या निमित्ताने बदला. जुने कव्हर्स ठेऊन देऊन तुम्ही ते पुन्हा वापरु शकता. घरातील जुने झालेल्या पडद्यांपासून तुम्ही नव्यासारखे पिलो कव्हर्स शिवू शकता. त्यांची थोडी वेगळ्या पद्धतीने रंगसंगती केल्यास ते नव्यासारखेच वाटतात आणि घराचा लूकही बदलतो. 

८. सोफा किंवा इतर फर्निचर महागडे असल्याने तसेच फार जुने न झाल्याने बदलणे शक्य नसते. पण या लाकडाच्या फर्निचरला पॉलिश करुन घेणे शक्य असते. तसेच पावडर कोटींगलाही कलर करुन मिळते. या रंगाची शेड थोडी बदलून घेतल्यास फर्निचर नव्यासारखे दिसू शकते. तेव्हा या पर्यायाचा नक्की विचार करा. 

९. सर्वात महत्त्वाचे घराच्या कोपऱ्यांमध्ये, गॅलरीमध्ये, लॉफ्टवर न लागणारे सामान वर्षानुवर्षे जपून ठेवले जाते. ते सामान काढून खरंच लागत नसेल तर टाकून द्या. त्यामुळे खूपशी जागा मोकळी होऊन तुम्हाला फ्रेश वाटू शकते. 

१०. एखादी लॅम्पशेड, कॉर्नरचा दिवा किंवा साधेसे झुंबर घेऊन ते घरातील एखाद्या कॉर्नरला किंवा भिंतीला लावल्यास त्याचा मंद प्रकाश घरात वेगळे वातावरण निर्माण करु शकेल. त्यादृष्टीने छोटीशी खरेदी तुमचा मूड बदलायला नक्की उपयोगी पडेल. 

टॅग्स :घरदिवाळी 2021