She is Refugee. Her suffering is the same everywhere! | ती रेफ्यूजी. तिची व्यथा सगळीकडे सारखीच!

ती रेफ्यूजी. तिची व्यथा सगळीकडे सारखीच!

  -शुभांगी जगताप गबाले                                                            

सामुहिक हिंसा - कलहात अहोरात्र धुमसणारा घराचा भोवताल, त्यातून सुटका म्हणून निवडलेल्या मार्गावरही रस्ताभर नाडलं, ओरबाडलं जाणं.  जीवाची हमी न देणारा बोटीतला प्रवास अन जिथ पोचायचं तिथं पोचूनदेखील न संपणारी जीवघेणी फरफट, आत-बाहेर दाटलेली अनिश्चितता. जगभरातल्या तमाम विस्थापित, निर्वासित वर्गाच हे जिवंत वास्तव. त्यातल्या अर्धा टक्का लोकसंख्येवर हक्क सांगणा-या  स्त्रियांसाठी  अजूनच भेदक, भेगाळत बनत चाललेल आहे. 
स्त्रियांच्या एकंदर विस्थापनात 40 टक्के विस्थापन हे  केवळ त्यांच्या बाईपणातून होतं आहे. युद्धातून वाट्याला येणारी पडझड याखेरीज घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, फिमेल जनायटल म्युटिलेशन (खतना करणं), अपहरण, फसवणूक, बळजबरीनं लादले जाणारे विवाह, सामाजिक निर्बंधांचा कडेलोट  अशा असंख्य कारणातून बायका घरदार टाकून निर्वासितपण भोगतायेत. मायदेशात अन आसरा देणा-या देशातही. म्हणूनच रेफ्युजी बाईचं हे झगडणं रेफ्युजी पुरूषाच्या तुलनेत कायमच क्लिष्ट अन अवघड होताना दिसतं. अर्थातच रेफ्युजी क्रायसिसचा हा जेंडर रंग  वेगळा काढून बघावा लागतो.  विस्थापणात रूतलेलं जेंडरपण समजून घ्यायचं तर.  
समुहाअंतर्गत द्वेषा-त्वेशातून उद्भवलेली हिंसा असो वा युद्धातून चेतवला जाणारा सशस्त्र हिंसाचार, त्याचे सगळ्यात जास्त ओरखडे उठतात ते तिथल्या बाईजातीवर. शाळा बंद होणं, सार्वजनिक जागांवरच्या वावरावर मर्यादा येणं, मना-शरीराच्या आजारांवर सहजी उपचार न मिळणं, खाण्या-पिण्याची हेळसांड ही त्यांची प्राथमिक हानी तर अटळ असते. पण या सगळ्याशी झगडत राहताना रासवट पुरूषी व्यवस्थेकडून  बाईपणावर  होणारे वार तुलनेनं कितीतरी खोल, जिव्हारी लागणारे ; जगणं विस्कटून  टाकणारे असतात. 
गच्च निळ्या बुरख्यात वरचं आभाळही पाहू न देणारं अफगाणच्या मातीतल तालीबानी रणकंदन बाईला माणूस म्हणून जगणंच नाकारतं. मुली-बायांनी शिक्षण, नृत्य, गाण, संगीत याच्या वाटेला न जाणं,  पैशासाठी बापानं मुलीचं  थोराड पुरूषाशी जबरदस्तीनं लग्न लावून देणं, पुरूषांनी कायदे डावलून अनेक स्त्रियांशी लग्न करणं, नव-यान लग्नाची बायको पैशासाठी दुस-या पुरूषाला विकण, परंपरा मोडणारीला तालीबानी सजा भोगावी लागणं अन घरीदारी उठताबसता पुरूषी धाकात जगत राहणं अशा असंख्य पेचांशी अफगाणी बाई लढते आहे. काबुलमध्ये या महिलांसाठी काम करणारी अन त्याच कारणानं देश सोडावा लागलेली फातिमा सतत यावर बोलत राहते. हळहळत राहते. अफगाणी पुरूषांच्या अशा कडवट अनुभवापायी  लग्नसंस्थेवरचा विश्वासच उडून गेलाय म्हणणा-या या माझ्या  मैत्रिणीनं लग्नच नको अस स्वत:ला बजावून टाकलंय.   
सुदान, इरिट्रिया, कॉन्गो यासारख्या आफ्रिकन राष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून धुमसत असलेल्या नागरी, वांशिक युद्धाची मुख्य झळ तिथल्या बायकाच सोसतायेत. आर्मीचे जवान तथा पोलिसी, सैनिकी सेवेतले रक्षक म्हणवणारेच तिथ स्त्रियांवर राजरोस अत्याचार करतायेत.  वांशिक द्वेषातून इतर समुहातल्या पुरूषांच्या लैंगिक छळवणुकीला  बायका-मुली रोज बळी पडतायेत. या अत्याचारांच्या, अपहरणाच्या भीतीनं बायका घरातून बाहेर पडायलाच धजावत नाहीत. रिपिब्लक ऑफ कॉन्गो हा देश यातूनच  ‘द रेप कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ’  म्हणून गणला जातो आहे.  होती नव्ह्ती ती सगळी कमाई विकून नवरा अन आपल्या दोन लहानग्यांना घेऊन, असंख्य व्यवधानं पार करत कशीबशी युकेला पोहोचू शकलेली सुदानची शिरफा याच भीतीतून आपली हक्काची दुनिया सोडून इथं आली आहे.  
नागरी युद्धानट लहुलुहान झालेल्या सिरियातही सगळ्यात भयाण होरपळ तिथल्या बायकांच्याच वाटयाला येते आहे. सिरियन सरकारकडून होत असलेली मुस्कटदाबी असह्य होऊन सुरू झालेला तिथल्या जनतेचा सशस्त्न उठाव चिरडून टाकण्याकरता असद सरकारनं तिथलं बाईपणच आधी वेठीस धरलं. उठावात तापून उठलेल्या पुरूषत्वाच खच्चीकरण करण्याकरता लैंगिक हिंसेचा या शासनानं अस्त्रासारखा वापर केला. चेकपॉइण्ट्स, तुरूंग, पोलीस स्टेशन्स अशा जागांवर अन छापे टाकण्याच्या निमित्तानं घरात घुसून बायका-मुलींवर अपरिमित अत्याचार सुरू केले.  युनायटेड नेशन्सच्या   ‘ह्युमन राइट्स कौन्सिल’नं तिथल्या शेकडो पिडितांच्या मुलाखती घेऊन हे वास्तव जगासमोर आणलं आहे. 
श्रीलंकन युद्धातही तमिळ टायगर्सचा तथा एलटीटीईचा सशस्त्न लढा निपटून काढताना तमिळ स्त्रियांवर अतोनात अत्याचार केले गेल्याचं वास्तव युएन व इतर अनेक मानवी हक्क संघटनांनी सातत्यानं उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. नुकतंच  इंग्लंडचं  ‘रेफ्युजी स्टेटस’ मिळालेली एक श्रीलंकन तमिळ मैत्रीण सांगते,    ‘श्रीलंकेतला सिंघली - तमिळ संघर्ष जगाच्या नजरेत युद्धासोबतच संपला असला तरी अजूनही तिथला तमिळ माणूस पोलिसी अत्याचाराचा, आर्मी जवानाच्या छळाचा रोज सामना करतो आहे. पोस्ट वॉर छळवणूक भोगतो आहे. यात अधिककरून स्त्रियांचं आयुष्य पणाला लागलं आहे. अपहरण, अत्याचार, टॉर्चर अन सततची विनावॉरण्ट चौकशी, कस्टडी याला स्त्रियाही तोंड देतायेत. यातून सुटण्यासाठीच अनेक कुटुंबं घरं, जमिनी विकून जमेल त्या मार्गानं देश सोडून जातायेत.’ 
  या सगळ्या  भीतीनंच ही मैत्रीणदेखील नवरा नि मुलाला  घेऊन युकेला आली. शांती-समतेचं बौद्ध तत्त्वज्ञान मातीत आरपार मुरलेल्या श्रीलंकन भूमीतलं हे पडद्यामागचं वास्तव असहाय वाटायला लावतं. अधेमधे नजरेखालून जाणारं श्रीलंकन टुरिझमचं नयनरम्य, देखणं ब्रोशर मग आवडेनासं होतं..  
या सगळ्या हिंसक विखारापासून स्वत:ला शाबुत राखायला म्हणून देशोदेशीच्या असंख्य स्त्रिया अशा एकेकटया, कुटुंबासमवेत घर, देश सोडतायेत. आसपासच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये वा हद्दी ओलांडून परक्या देशात आसरा शोधतायेत. पण पुरूषी जगातल्या विकट वास्तवातून तिथंच काय कुठंच त्यांची सुटका नसते. प्रवासात, रेफ्युजी कॅम्पमध्येही  स्मगलर्स, पोलीस, सरकारी ऑफिसर्स, सोबतचे रेफ्युजी पुरूष त्यांच्या बाईपणावर घाला घालायला कायम संधी शोधत असतात. पैशाच्या, सवलतींच्या, वस्तुंच्या बदल्यात शरीर असा तिढा सतत त्यांच्यासमोर टाकला जातो. अन संधी मिळेल तिथं तसं त्याना एकेकटं गाठून अत्याचार साधला जातो. यापलीकडे आयुष्य उखडल्याचे सगळे ताण सोसत, कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी पेलत असताना यातल्या बहुतेकींना तर घरातल्या पुरूषाचाही छळ सहन करावा लागतो. जीव वाचवणारी सुरक्षा अशी नव्या जागेतली नवी दुखणी पुरवत राहते. 
 नायजेरियातल्या आयडीपी ( इंटरनली डिस्प्लेस्ड पर्सन) कॅम्पमधला शेकडो रेफ्युजी स्त्रियांवरचा अमानुष लैंगिक अत्याचार युनिसेफ व अँम्नेस्टी इंटरनॅशनलनं प्रत्यक्ष अभ्यासांतून वेळोवेळी मांडला आहे. लेबेनॉनमधील कॅरिटस या संस्थेचा एक अहवाल सांगतो, तिथल्या रेफ्युजी कॅम्पमधील सिरियन बायका घरी परतायचं म्हणतात. कॅम्पमधल्या छळवणुकीपेक्षा घराकडची परवड बरी असा त्यांचा एकंदर सूर. 
 बाईपणाशी चिकटलेले हिंसा, दडपणुकीचे  तानेबाने असे जगभरात सारखेच असल्याचा हा पुरावा म्हणता येईल. युद्धांच्या आतली छुपी युद्ध जागोजागच्या बायका अशा सोसतायेत. विज्ञानाच्या जोरावर हृदय बदलून माणूस जगवण्याची, आकाशातल्या ग्रहांवर पाऊल टाकण्याची भाषा बोलणारे आपण बाईसाठी एक निर्धास्त अवकाश पुरवायला मात्र  अजुनही सक्षम नाही. कुठल्याच मुलखात, कुठल्याच जागेत बाई अशी सुरक्षित नाही, निश्चिंत नाही हे माणसाच्या जगातल लाजिरवाणं सत्य आणखी कितीदा अधोरेखित करत रहायच ? 


( लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून निर्वासितांसाठीसाठी काम करणा-या संस्थेशी संलग्न आहेत. ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिध्द होईल)

shubhangip.2087@gmail.com 

Web Title: She is Refugee. Her suffering is the same everywhere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.