Join us

पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेण्ड नक्की आहे कोण? खरंच ती गायब झाली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 15:46 IST

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांची कथित गर्लफ्रेण्ड यासंदर्भात गॉसिप खूप होते, पण त्यांची गर्लफ्रेण्ड ही तिची एकमेव ओळख नाही..

ठळक मुद्देमात्र तिच्या खेळापेक्षाही जास्त चर्चेत राहिलं ते तिचं आणि पुतीन यांचं नातं.

अलिना काबएवा. ( Alina Kabaeva ) पुतीन यांची ती सिक्रेट मैत्रीण असल्याचे ओपन सिक्रेट आहे अशी जगभर चर्चा आहे. त्या दोघांनी काही आपल्या नात्याची जाहीर कबूली दिलेली नाही. तर ही अलिना, वय ३८, ती सध्या स्वित्झर्लण्डमध्ये आपल्या मुलांना घेऊन एका आलिशान घरात राहतेय अशी बातमी मिरर वृत्तपत्राने प्रसिध्द केली. युक्रेनसह युरोपिअन लोकांची मागणी आहे की अलिनाला स्वित्झर्लण्डमधून हाकलून द्या.  अर्थात दुसरी एक चर्चा अशीही आहे की अलिना स्वित्झर्लण्डमध्ये नाहीच तर ती सैबेरियाच्या डोंगररांगांत कुडे बंकरमध्ये भूमिगत आहे. तर अलिना काबएवा नेमकी आहे कोण? सत्तरीच्या उंबरठ्यावर उभ्या पुतीन यांच्याशी तिचं नातं काय?

(Image : Google)

अलिना ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेती खेळाडू आहे. एक नव्हे तर दोन ऑलिम्पिक पदकं, १४ विश्वविजेती पदकं आणि २१ वेळा तिनं युरोपिअन चॅम्पिअनशिप जिंकलेली आहे. रिदमिक जिमनॅस्ट आहे. उत्कृष्ट क्रीडा मॅनेजर आहे. सहा वर्षे ती रशियाच्या संसदेची सदस्यही होती. रशियाची ‘सर्वात लवचिक खेळाडू’ म्हणून तिचा लौकिक आहे. मात्र यासाऱ्याहून कायम चर्चेत राहिलं ते तिचं आणि पुतीन यांचं रहस्यमय नातं. २००१ मध्ये ते पहिल्यांदा भेटल्याची चर्चा आहे. मात्र त्याकाळीच अलिना डेव्हीड मुसेलिनी नावाच्या राजकारणाच्या प्रेमात होती. पुढे २००५ मध्ये ते वेगळे झाले. २००८ मध्ये मॉस्कोव्हस्की नावाच्या वृत्तपत्राने अलिनाचा आणि पुतीन यांचा साखरपूडा झाल्याचे वृत्त प्रसिध्द केले. त्या वृत्ताची अधिकृत पुष्टी तर कुणी केलीच नाही पण ते वृत्तपत्र  बंद झाले.मार्च २०१५मध्ये स्वित्झर्लण्डमध्ये एका व्हिआयपी हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिल्याचे वृत्त पसरले होते. पुढे २०१९ मध्ये मॉस्कोमध्ये तिनं जुळ्यांना जन्म दिल्याचे, दोन्ही मुलगेच असल्याचेही वृत्त प्रसिध्द झाले. 

(Image : Google)

२००२ पर्यंत आपण सश्रद्ध मुस्लिम असल्याचे ती सांगत असे मात्र २००३ मध्ये तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. अलिनाचे वडील मुस्लीम तर आई रशियन. ताश्कंदमध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील फुटबॉल खेळाडू होते. त्यांचं कुटुंब उझबेकिस्तान, कझाकस्थान, रशिया याभागात वास्तव्यास होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी अलिनाचे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरु झाले. आपल्या मुलीला अधिक उत्तम प्रशिक्षण मिळावे म्हणून तिची आई तिला मॉस्कोला घेऊन गेली. १५ व्या वर्षी तिनं युरोपिअन चॅम्पिअनशिप जिंकली. १९९६ ते २००८ तिचं खेळाडू म्हणून उत्तम करिअर झालं. मात्र तिच्या खेळापेक्षाही जास्त चर्चेत राहिलं ते तिचं आणि पुतीन यांचं नातं. जे त्या दोघांनीही अधिकृतपणे कधीच स्वीकारलं नाही. 

(Image : Google)

२०१४ नंतर राजकारणातूनही निवृत्ती स्वीकारत अलिना रशियाच्या नॅशनल मीडीया ग्रूपची प्रमूख झाली. ती सरकारी वृत्तवाहिनी आहे. त्यापदासाठी तिला घसघशीत पगार मिळतो अशी माहिती ब्रिटिश टॅबलॉइड्सने प्रसिध्दही केली. आता युध्द सुरु असताना ती रशियात आहे, सैबेरियात आहे की स्वित्झर्लण्डमध्ये आहे हे खात्रीने कुणीही सांगत नाही. चर्चा आहे ती स्वित्झर्लण्डमध्येच असण्याची, मात्र त्याचीही अधिकृत खातरजमा कुणी केलेली नाही.

टॅग्स :रशिया