Join us  

नीना गुप्ता आणि डॉली ठाकूर; दोघी जेव्हा आपल्या वादळी आयुष्याची गोष्ट सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 5:52 PM

सच कहूँ तो आणि रिग्रेट्स, नन ही अनुक्रमे नीना गुप्ता आणि डॉली ठाकूर यांची आत्मचरित्रं. ती गोष्टी सांगतात, नात्यांच्या, माणसांच्या आणि दोन सेल्फ मेड बाईच्या जगण्याच्याही!

ठळक मुद्देदोन्ही पुस्तकं वाचून, नीना आणि डाॅली यांचे संघर्ष, आव्हानं पेलणं, येईल त्या प्रसंगाला सामोरं जाणं, रडत कुढत न राहता आनंदात जगणं, स्फूर्ती देत राहातं एवढं निश्चित. 

मृण्मयी रानडे

गेल्या महिन्यात अमेझाॅनच्या सेलमध्ये दोन पुस्तकं घेतली विकत. पुस्तकं ठेवायला आता घरात जागा नाही अशी परिस्थिती आहे पण कधीकधी मोहात पडायला होतंच.  योगायोगाने दोन्ही पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी समान होत्या. दोन्ही आत्मचरित्रं. दोन्हीच्या लेखिका चित्रपट/नाटक/टेलिव्हिजन/जाहिरात अशा क्षेत्रांतल्या सेलिब्रिटी. दोघी मूळ उत्तरेतल्या, पण मुंबईत स्थायिक झालेल्या. आणि दोघींनी जाणूनबुजून किंवा ठरवून, लग्न झालेलं नसताना मूल होऊ दिलेलं. दोघींनी त्या मुला/लीच्या जन्मदात्याशी लग्न केलेलं नाही. एक साठी नुकतीच ओलांडलेली नीना गुप्ता आणि दुसरी ऐंशीच्या जवळ पोचलेली डाॅली ठाकूर. दोघी अजूनही नाटक/सिनेमे करत आहेत, निवृत्त झालेल्या नाहीत.मी आधी डाॅलीचं पुस्तक वाचायला घेतलं कारण मी डाॅलीला थोडीफार ओळखते. मी ज्या संस्थेत गेलं दीड वर्ष काम करत होते तिच्याशी डाॅली जोडलेली आहे, संस्थेच्या कामाच्या निमित्ताने आमची पूर्वी प्रत्यक्ष भेट झालेली आहे, मागच्या वर्षी अर्थात भेटी ऑनलाइन झाल्या. तिची या वयातली ऊर्जा थक्क करून सोडते. ती मोठ्या प्रयत्नांनी, कोणाकोणाच्या मदतीने झूम, क्लबहाउस वगैरे ॲप्स वापरायला शिकली आहे, आणि त्याचा उत्तम वापर करते आहे. ती एका नवीन नाटकात काम करते आहे, त्याच्या तालमी तिने घरात बसून ऑनलाइन केल्या आहेत.

डाॅलीच्या पुस्तकाचं नाव Regrets, none. (रिग्रेट्स ,नन. - म्हणजे कसलाही पश्चात्ताप नाही) अनेक वर्षांनंतर हे पुस्तक रात्री जागून  वाचलं असेल. भन्नाट आयुष्य जगली आहे ही बाई, पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही जगते आहे तसंच अफलातून. कधीही न केलेली कामं हातात घेण्याचा उत्साह, ती निभावून नेण्याचा आत्मविश्वास आणि ती प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवणं याबद्दल वाचून अचंबित व्हायला होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही ती मोकळेपणाने बोलली आहे, त्यात किंचित उद्धटपणा जाणवला तरी त्यातला खरेपणाही लपून राहात नाही. तिच्या या आयुष्याबद्दल वाचताना अनेकांच्या भुवया उंचावू शकतात पण मला तिच्या लिखाणातला, त्यामागे लपलेल्या वेदना, खंत, खेद, यातला खरेपणा भिडला. तिचं व्यावसायिक जीवन तर शब्दश: ऐतिहासिक म्हणावं असं. इतकी वेगवेगळी कामं तिने केली आहेत, तेही इंटरनेट आणि मोबाइल नसलेल्या जमान्यात, की वाचूनच दमछाक व्हावी. ती अनेक सामाजिक संस्थांशीही जोडलेली आहे बऱ्याच वर्षांपासून. 

डाॅलीचा मुलगा कासार. तो ठाकूर पदमसी आडनाव लावतो. दिलीप ठाकूर हा डाॅलीचा पहिला नवरा, त्यांचं लग्न जेमतेम काही वर्षं टिकलं. परंतु तिने ठाकूर आडनाव कायम ठेवलं कारण तोवर ती मुंबईतल्या चित्रपट/नाटक/टेलिव्हिजन/जाहिरात क्षेत्रांत डाॅली ठाकूर या नावाने प्रसिद्ध झालेली होती. भारतीय जाहिरात क्षेत्रातलं एक नावाजलेलं अलेक पदमसी, हा कासारचा जन्मदाता. डाॅली आणि अलेक अनेक वर्षं एकत्र होते, अलेकची बायको आणि इतर कुटुंबीयांशी तिचे संबंध होते, अलेकच्या मृत्यूनंतरही ते कायम आहेत. अलेक यांना मूल नको होतं परंतु डाॅलीला हवं होतं आणि तिने निग्रहाने मुलाला जन्म दिला, काम करून त्याला सुखात ठेवता येईल इतका पैसा कमावला. डाॅलीचं बालपण, तरुणपण सुखात गेलेलं, पण श्रीमंती नव्हती. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे ती अनेक शहरांत वाढली, काही काळ तर तिच्या आजी आणि मावशीबरोबर राहात होती. शंभरीच्या जवळ पोचलेल्या या मावशीचा अजूनही डाॅलीवर प्रभाव आहे. डाॅली बरंच शिकलेली, इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व असलेली. हिंदीचं श्रेय ती या मावशीला देते.डाॅलीने चित्रपट/नाटक/टेलिव्हिजन/जाहिरात क्षेत्रांत तर कामं केलीच पण इतरही अनेक इवेंट सांभाळले, अनेक मोठ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं. फेमिना मिस इंडिया स्पर्धा सुरू झाली तेव्हा पहिली काही वर्षं ती मुलींच्या मुलाखतींपासून अंतिम फेरीपर्यंतचं सगळं हाताळायची. त्या निमित्ताने भारतभर फिरलेली आहे.डाॅलीचं पुस्तक वाचताना ते चित्रपट/नाटक/टेलिव्हिजन/जाहिरात क्षेत्रांतलं 'हूज हू' वाटावं इतकी नावं समोर येतात. या तिच्या प्रिविलेजबद्दल मला तिचा प्रचंड हेवा वाटला हे कबूल करायलाच हवं. अनेक जण तिच्याबरोबर शाळेत, काॅलेजात होते जे पुढे तिला अचानकपणे भेटत राहिले. कधी तिने त्यांच्यासोबत कामही केलं. त्यांच्या सोबतीने ती पुढे जात राहिली, मोठी झाली.हे पुस्तक अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे. इंग्रजी कठीण नाही पण शैली अतिशय आवडली मला. पुस्तकामुळे आपलीही ५० वर्षं मागच्या दुनियेत चक्कर होते, तीही रंजक आहे.

'सच कहूँ तो'...नीना गुप्ता यांच्या पुस्तकाचं नाव आहे 'सच कहूँ तो'. त्यांनी संस्कृतमध्ये एमए आणि त्यानंतर 'संस्कृत नाटकांमधील रंगमंचीय तंत्र' या विषयात एमफिल केलंय हे वाचून वासलेला आ अजून बंद व्हायचाय! एमफिलनंतर त्या एनएसडीत गेल्या आणि पुढचा अभिनयाचा प्रवास आपल्याला माहीत आहेच. अभिनेत्री म्हणून त्या आवडतातच, पण त्या ज्या पद्धतीने आयुष्य जगल्यात, जगत आहेत, त्यामुळे अधिक आवडू लागल्यात. पण...पुढे पुस्तक पार ढेपाळलंय. मला विविअन रिचर्ड्सबद्दल किंवा त्यांच्या नात्याबद्दल अधिक खोलात जाऊन लिहिलेलं वाचायला आवडलं असतं. त्या काळातलं, १९८९-९० मधलं ते गाजलेलं प्रकरण होतं. पण त्याच्याबरोबरचे सगळे प्रसंग, जे काही मोजके आहेत, ते इतके वरवर आहेत की नक्की काय असेल त्यांचं नातं, तिला त्याच्यापासून होणारं मूल का हवं असेल, असा प्रश्न मनात राहिलाच. या पुस्तकात इतरही गडबडी आहेत. अनेक धागे अर्धवट सोडलेत, काहींचे उल्लेख पुढे येतात पण मग मागचं नव्याने वाचावं लागतं. संपादन करताना किंवा पुस्तकातल्या प्रकरणांचं नियोजन करताना फारसा विचार झालेला नाही की काय, असं वाटत राहातं. लेखिकेने अनेक ठिकाणी व्यक्तींची नावं बदलून लिहिली आहेत, तेही काहीसं खटकतंच.नीना गुप्ताची मुलगी मसाबा. आज ती एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. या दोघींवर एक माहितीपट सदृश फिल्मही नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.नीना आणि डाॅली या दोघींचं सुदैव म्हणायला हवं की दोघींना त्यांच्या आईवडलांचा मोठा आधार होता. अन्यथा, १९७०च्या किंवा ८०च्या दशकात, मुंबईतल्या तथाकथित पुढारलेल्या वर्तुळात वावरणाऱ्या स्वावलंबी स्त्रियांनाही विवाहित पुरुषाशी संबंध ठेवून त्याचं मूल जन्माला घालणं, यात कुठेही लपवाछपवी न करणं, हे कितपत शक्य झालं असतं? डाॅलीला काही काळ 'The other woman' असं हिणवलं गेलंही. नीनाला तो अनुभव आलाच असेल पण रिचर्ड्स भारतीय नाही की भारतात राहात नाही, त्यामुळे त्यातली तीव्रता कदाचित कमी असेल. आजही अशा स्त्रिया आपल्या आजूबाजूला कमीच दिसतात, किमान मला तरी माहीत नाहीत.

दोन्ही पुस्तकं वाचून, नीना आणि डाॅली यांचे संघर्ष, आव्हानं पेलणं, येईल त्या प्रसंगाला सामोरं जाणं, रडत कुढत न राहता आनंदात जगणं, मुलांबरोबर जे काही थोडेसे क्षण मिळाले ते (थोडेसे कारण दोघी मुलं लहान असतानाही पूर्ण वेळ काम करत होत्या) पूर्णपणे अनुभवणं हे सगळं लक्षात राहातं. एक नवी उमेद जागी करतं, स्फूर्ती देत राहातं एवढं निश्चित. 

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

टॅग्स :नीना गुप्तारिलेशनशिप