Join us  

शहरातल्या स्त्रिया स्मार्ट दिसतात आणि पुरुष खांदे पाडून चालणारे- बुजल्यासारखे, असे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 6:02 PM

पुरुषांच्या आयुष्यातली सिक्रेटस : वाचा यावर्षीच्या 'लोकमत दीपोत्सव' मध्ये!

ठळक मुद्दे बँकेचे हप्ते भरणे ही तुझीही समान जबाबदारी आहे, आपले स्वतःचे घर जर आपल्याला विकत घेता आले नाही, तर तूपण त्याला माझ्याइतकीच जबाबदार आहेस’, असे कुणी पुरुष उघडपणे सांगतो का?

काही दिवसांपूर्वी मेट्रोने प्रवास केला. सगळे डबे आतून एकमेकांशी जोडलेले होते. पहिले दोन डबे महिलांसाठी राखीव होते. त्या डब्यांत बहुतांश गरोदर, छोटी मुले बरोबर असलेल्या किंवा वयस्क महिला बसल्या होत्या. बाकी सर्व मुली ह्या धिटाईने इतर डब्यांमध्ये विखुरलेल्या होत्या. ‘राखीव डबे तर आमचे आहेतच तिथे तुम्हांला प्रवेश नाहीच पण उरलेल्या डब्यांतही आमचा हिस्सा आहे तो आम्ही सोडणार नाही’, असा सगळा एकूण मामला . राखीव डब्यात हक्क म्हणून महिलांना जागा मिळत होती आणि जनरल डब्यात स्त्रीदाक्षिण्य म्हणून बऱ्याच जणांनी आपल्या खुर्च्या खाली करून दिल्या होत्या. एकूण काय तर ती संपूर्ण मेट्रोच स्त्रियांसाठी राखीव झाली होती.

 धिटाई हा एकूणच सध्याच्या महानगरी स्त्री वर्गाचा एक अगदी लक्षात येणारा गुण आहे आणि ह्याच गुणाचा बहुतांश महानगरी पुरुष वर्गात अभाव आढळून येतो. एक प्रयोग करून पाहा. मोठे-मोठे मॉल्स, आयटी कंपन्यांची ऑफिसेस, विमानतळ अशा ठिकाणी कपडे, जोडे, केसांची स्टाईल, वापरायच्या वस्तू ह्या निकषांवर स्त्रिया आणि पुरुष ह्यांना तपासून बघा. तुमच्या असे लक्षात येईल की आहे त्या उपलब्ध पैशात जास्त उत्तम स्टाईल केलेल्या मुली तुम्हांला मोठ्या संख्येने आढळून येतील. कोणत्याही समान वयोगटातील स्त्री आणि पुरुष ह्यांची तुलना केली तर स्त्रिया जास्त स्मार्ट दिसताहेत असे आढळून येईल (पुरुष व्यापक बावळट दिसताहेत हे म्हणायचा मोह मी टाळला आहे) गेल्या पाच-पन्नास वर्षांत स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम काय करायला लागल्या; आणि पुरुष खांदे पाडूनच चालायला लागले!- हे असे का झाले असेल?

(Image : google)

हजारो वर्षांतला पुरुषी अहंकार आणि त्याने मिळालेली ओळख जेव्हा पुरुष वर्गाने सोडायची ठरवली, तेव्हा ‘आपली आता नेमकी ओळख तरी काय?’ ह्या प्रश्नाला पुरुष वर्ग तोंड देतो आहे आणि त्यांच्या अस्तित्वापुढचे हे मोठे आव्हान आहे. सहज आजूबाजूला पाहिले तर आपल्या लक्षात येईल की बेरोजगारांचे तांडे असा जेव्हा आपण उल्लेख करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त पुरुषच येतात. मुली काहीतरी खटपट-लटपट करून काहीतरी काम मिळवतातच आणि मिळवलेले काम टिकवतातदेखील. रिक्रुटमेंटचे काम करणाऱ्या एका मैत्रिणीला विचारले, तर तिने सांगितले की बऱ्याच कंपन्यांना प्राधान्याने स्त्रियांना नोकरी देण्यात स्वारस्य असते. कारण, एकदा काम मिळाले की स्त्रिया त्या कामात टिकून राहतात आणि सांगितलेले काम वेळेवर आणि जिद्दीने करतात. पुरुष कर्मचारी गांभीर्याने काम करीत नाहीत. त्यामुळे अंगमेहनतीची कामे सोडली तर बहुतांश ठिकाणी नोकरी देणारे स्त्रियांना प्राधान्य देतात. ह्याचा अर्थ असा की आता फक्त अंगमेहनतीची कामेच पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. अक्कलेच्या किंवा बुद्धीच्या कामांत कंपन्यांना त्यांची गरज वाटत नाही. थोडक्यात, जर अंगमेहनतीच्या कामातही भविष्यात रोबोट आले, तर तिथूनही पुरुष घरी जातील.

वर्षानुवर्षे ‘मुले जन्माला घालणारे एक मशीन’ अशी स्त्रियांची ओळख होती. पुरुषाने आर्थिक कर्तृत्व गाजवावे, कुटुंबाची ओळख बनवावी आणि स्त्रियांनी मुलांना जन्माला घालवावे असा सोपा मामला. आता स्त्रिया पैसेही कमवायला लागल्या, ओळखही बनवायला लागल्या, त्यांच्या कामाला आणि त्याच्या गुणवत्तेला मागणीही आली आणि त्याभोवती व्यवसायाचे लॉजीकही बनायला लागले… मग पुरुषाने काय करायचे ? बहुतेक मुले जन्माला घालण्यासाठी एक आवश्यक घटक ह्यापलीकडे पुरुषांना अजून काही वर्षांनी काहीही ओळख उरणार नाही आणि मग त्यांच्यातल्याही सर्वोत्तम नरांचा स्वीकार स्त्रिया करतील… उरलेले बहुतांश तिथेही बेरोजगारच राहतील.

आर्थिक समानतेच्या बाबतीत बहुतांश घरातल्या शहरी पुरुषांचा स्त्रियांनी मोरू केलाय. घर आर्थिक दृष्ट्या सांभाळणे आणि घराची संपन्नता वाढवत नेणे ही वर्षानुवर्षे पुरुषांची जबाबदारी असत आली आहे. आता स्त्रियाही कमावतात पण अजूनही बहुतांश ठिकाणी बँकेचे हप्ते आणि एकूण कुटुंबाची आर्थिक संपन्नता ही पुरुषांचीच जबाबदारी मानली जाते. ह्यांपैकी कशात जर कमतरता आली तर त्यालाच कमीपणा येतो. अजूनही आपल्या पुरुषी अहंकाराला जोजवण्यासाठी त्या अहंकाराच्या पिंजऱ्यात कैद असलेले पुरुषही काही गोष्टी उघडपणे बोलत नाहीत. बोलू शकत नाहीत. ‘आपण आता समानता मानतो ना?- मग घराच्या आर्थिक प्रतिष्ठेतही तुझा अर्धा वाटा आहे आणि अप्रतिष्ठेचीही तू समान वाटेकरी आहेस. बँकेचे हप्ते भरणे ही तुझीही समान जबाबदारी आहे, आपले स्वतःचे घर जर आपल्याला विकत घेता आले नाही, तर तूपण त्याला माझ्याइतकीच जबाबदार आहेस’, असे कुणी पुरुष उघडपणे सांगतो का? निदान स्वत:शी तरी मान्य करतो का? त्यामुळे घरात संपत्ती लक्ष्मीच्या पायगुणांनी येते आणि कडकी घरातल्या नारायणाच्या नाकर्तेपणाने! अशी अगदी अन्याय्य श्रेयविभागणी पुरुषांच्या वाट्याला आली आहे.(लोकमत दीपोत्सव मध्ये प्रकाशित झालेल्या मंदार भारदे यांच्या लेखातील अंश.)लोकमत दीपोत्सव अंक मागवण्यासाठी संपर्कऑनलाईन बुकिंग deepotsav.lokmat.comसवलतीच्या दरात ग्रुप बुकिंगसाठी संपर्क फोन– 1800-233-8000 आणि 960-700-6087 (सकाळी ११ ते संध्याकाळी ५) 

टॅग्स :दिवाळी 2023रिलेशनशिप