Join us  

सेक्स करण्याची इच्छाच न होणं हा आजार की लाइफस्टाइल स्ट्रेस? तज्ज्ञ सांगतात ७ महत्त्वाची सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:37 PM

लग्नानंतर नात्यातला रोमांसच संपला, कित्येक महिने शरीरसंबंध करायची इच्छाच होत नाही असं घडणं वैवाहिक जीवनासाठी धोक्याचं आहे.

ठळक मुद्देजोडीदारासोबत शारीरिक संबंध चांगले नसतील तर जीवनात विविध समस्या निर्माण होतात. दोघांनीही काही गोष्टी पाळल्या तर नाते सर्वच पातळ्यांवर फुलू शकते, मात्र त्यासाठी प्रयत्न करायला हवेत

लग्न होतं, पण दोन्ही जोडीदार नोकऱ्या करतात. करिअर आहे, कामाचे ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरकाम यातून शरीराचा थकवा वाढतो तसा मनाचा थकवाही वाढतो. त्यात सर्वच स्तरावर स्पर्धा वाढली असल्याने या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक जण जीवाचा आटापिटा करतो. पण यामध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे मात्र  पूर्णपणे दुलर्क्ष होत जाते. जे वैयक्तिक आयुष्यात होतं तेच वैवाहिक आयुष्यातही. आपल्या नात्यात प्रेम, आपुलकी, शारीरिक सुखकर संबंध, आदर, काळजी अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. मात्र यातील एक जरी गोष्ट नीट नसेल तर नात्यात अंतर पडायला सुरुवात होते आणि आपण जोडीदारापासून नकळत दूर जातो. हल्ली हेक्टीक लाईफस्टाईलमुळे अनेक जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांमध्ये अडचणी येतात, थकवा आल्याने शारीरिक संबंध करण्याची मनाची आणि शरीराची तयारी नसते. मात्र असे होऊ नये यासाठी काय करायला हवे याविषयी प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के सांगतात...

(Image : Google)

नको, इच्छाच नाही, यावर उपाय काय?

१. शारीरिक संबंध चांगले असतील तर ते नक्कीच आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक आनंद देणारे असतात. तसेच यामुळे आपले नाते सुधारण्यास मदत होते. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

२. नात्यांतील विविध समस्या हे सेक्स करताना थकवा येण्याचे किंवा शीण येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. सतत संताप, राग, चिडचिड या गोष्टींचा नात्यावर आणि पर्यायाने शारीरिक संबंधांवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक संबंध चांगल्या रितीने प्रस्थापित करायचे असतील तर आपला मूड चांगला ठेवणे आवश्यक आहे.

३. दिवसभर बाहेरची आणि घरातील कामे झाल्यानंतर अनेकदा आपण मानसिकरित्या थकलेलो असतो. अशावेळी हा शीण घालवण्यासाठी आपण टीव्ही किंवा मोबाईल यांच्यावर वेळ घालवतो. आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी हे आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवे. कारण यामुळे आपल्या लैंगिक जीवनावर निश्चितच चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बेडरुममधून टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप हद्दपार करा आणि बेडरुमची वेळ फक्त जोडीदारासाठी असू द्या.

४. आपण थकलेलो असू तर दरवेळी संपूर्ण शारीरिक संबंध व्हायलाच पाहिजेत असे नाही. तर अशावेळी एकमेकांच्या केवळ जवळीकीनेही आपल्याला मानसिक आणि भावनिक सुख मिळू शकते. यामुळे नात्यातील जवळीक वाढण्यास, एकमेकांना समजून घेण्यास निश्चितच मदत होते. त्यामुळे बेडरुममधला वेळ हा अवश्य वेगळा ठेवायला हवा.

(Image : Google)

५. थकवा किंवा शीण आल्याने तुमच्या शारीरिक संबंध नियमितपणे येत नसतील तर यामुळे नैराश्य येणे, नकारात्मकता वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, सतत उदास वाटणे अशा समस्या जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांना भेडसावू शकतात.

६. महिलांनी घरात प्रमाणापेक्षा जास्त कामे करुन थकणे किंवा पुरुषांनी प्रमाणापेक्षा जास्त ऑफीसचे काम करुन थकणे यांमुळेही लैंगिक संबंधांसाठी अंगात ताकद राहत नाही. अनेकदा एकाच प्रकारे सेक्स करत असल्यासही ते कंटाळवाणे होऊ शकते. तेव्हा अशा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

७. आपली नियमित झोप कमी होत असेल तरीही आपल्याला सेक्सची इच्छा होत नाही. त्यामुळे रोजच्या रोज पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक असून त्याचा सेक्सवर परिणाम होऊ देऊ नये. नियमित व्यायाम केल्यानेही आपली काही संप्रेरके उत्तेजित होतात आणि सेक्स करण्यासाठी उत्साह वाढण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक जीवन