Join us  

म्हणायला नवरा-बायको पण एकमेकांशी बोलणंच होत नाही? तोंड उघडलं की भांडणच, असं होतं तुमचंही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 9:40 AM

How to Maintain good communication with your Partner : मनापासून एकमेकांशी प्रेमानं बोलण्याची खास युक्ती.

मानसी चांदोरकर

साधारण २ वर्षापूर्वी कोरोनाच्या भयंकर काळात जगातल्या प्रत्येकाचं आयुष्य मोठ्या काळासाठी ठप्प झालं होतं. ते सुरळीत व्हायला, नवीन आर्थिक घडी बसवायला प्रत्येकालाच बराच वेळ लागला. गेल्यावर्षी हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर आता मात्र प्रत्येकाचीच प्रचंड धावपळ सुरू झाली. या धावपळीत, गोंधळात, स्पर्धेत सहभागी होताना अनेकांचे "मानसिक स्वास्थ्य" बिघडत असल्याचे प्रकर्षानं जाणवलं. स्वास्थ्य बिघडणे म्हणजे नैराश्य, नकारात्मकता आणि त्यामुळे येणारी संशयी वृत्ती, त्रागा, चिडचिड हे सगळेच गेल्या काही काळात वेगाने वाढले आहे. हे स्वास्थ्य पुन्हा मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे संवाद. आपल्या जोडीदाराशी  हलकाफुलका पण अत्यंत प्रभावशाली संवाद करायची नेमकी युक्ती काय? कसं जमेल ते? भांडण न करता, मुद्द्याचं बोलणं का संपतं? (How to Maintain good communication with your Partner)...

रोज उठून काय बोलायचं, असं का म्हणता?

1) रोज रात्री कितीही दमला असाल, तणावात असाल तरी किमान दहा पंधरा मिनिटे एकमेकांशी बोला.

 2) जोडीदाराची आपुलकीने चौकशी करा. त्याचा संपूर्ण दिवस कसा गेला ते विचारा.

3) या संवादात "आपुलकी" ही अतिशय महत्त्वाची. कोरडी तांत्रिकता येऊ देऊ नका.

4) तुम्हाला असणारे ताणतणाव, धावपळ याबद्दलही मोकळेपणाने बोला. जोडीदाराची ते सोडवण्यासाठी मदत घ्या. मनात काहीही न ठेवता मोकळे व्हा. काही निर्णयाबाबत शांतपणे चर्चा करा.

5) एकटेच समस्यांना, तणावाला सामोरे जाण्यापेक्षा आणि कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही या अपराधी भावनेच्या दडपणाखाली राहण्यापेक्षा रोजच्या रोज दहा-पंधरा मिनिटे तरी नक्की बोला.

6) संवादात चेष्टा, विनोद, कौतुक, शाब्बासकीची थाप यांचा अवश्य सहभाग असू द्या. आनंदी, हसत खेळत झोपी जा. हा दहा-पंधरा मिनिटांचा वेळ दुसऱ्या दिवशीची ताकद असेल हे विसरू नका.

हा संवाद प्रत्येकाच्याच आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या प्रत्येक समस्येचा जालीम उपाय म्हणाना हवं तर. जर जोडीदाराशी रोज असा संवाद साधलात तर रोजचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीच्या मदतीची गरज तुम्हाला कधीच पडणार नाही. तुमच्या नात्यातल्या तणावाचे, वादाचे अनेक मुद्दे देखील आपोआप दूर होतील. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब समाधानी निरोगी राहील. शक्य व आवश्यक असल्यास तुमच्या मुलांना इतर सदस्यांनाही या संवादात अवश्य सहभागी करून घ्या. फक्त हा 'संवाद' "विसंवाद" न बनता 'संवादच' राहील आणि तुमच्या निकोप आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवून तुम्हाला आनंदी ठेवेल ही जबाबदारी मात्र तुम्हा दोघांची. 

(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप