Join us  

सोशल मीडियात ‘दोघांचे’ हॅपीवाले सेल्फी, प्रत्यक्षात भांडण; आनंदी आहोत ‘दाखवण्याची’ कोणती चटक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 5:19 PM

ऑनलाइन पीडीए म्हणजेच प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करत अनेकजण आपले सेल्फी टाकतात, मात्र प्रत्यक्षात सेल्फीतून दिसणारं, दाखवलं जाणारं हे जग खरं असतं का?

ठळक मुद्देआपण इतरांना दाखवायला खोटंखोटं जगतोय का, हे सारे प्रश्न मनातही येत नाहीत.

मुक्ता चैतन्य

मध्यंतरी एक व्हीडोओ बघण्यात आला. गमतीशीर असा तो व्हिडीओ नकळत डोळ्यात अंजन घालणारा तर होताच पण त्याच बरोबर सेल्फीच्या जगातल्या वावरा बाबतची मानसिकताही अधोरेखित करणारा होता. एक तरुण प्रेमी युगुल एका रोमांटीक रेस्तोरंटमध्ये बसलेले आहेत. अगदी एकमेकांना बिलगून. त्यांच्या गुलुगुलू गप्पा चालू आहेत. काहीतरी होतं आणि त्यांच्यात खटके उडायला लागतात. खटके वाढत जातात. एकीकडे ते भांडत असतात तर दुसरीकडे त्यातली तरुणी खटाखट तिचे आणि तिच्या मित्राचे सेल्फी घेत असते. बरं, तुम्हाला वाटेल की ती भांडणाचे सेल्फी घेतेय की काय? तर तसं नाहीये, ती त्यांच्या भांडणाचे सेल्फी घेत नाहीये तर, भांडणात मध्ये मध्ये काही सेकंदाचा ब्रेक घेत मित्राच्या जवळ जात, ओठांचा चंबू करत हसत ती सेल्फी घेतेय, मित्रही तेवढ्यापुरता कॅमेऱ्यात बघून असतोय. सेल्फीचा तेवढा सेकंद संपला की पुन्हा दोघं भांडतायेत. लगेच पुढच्या क्षणी पुन्हा तरुणी सेल्फी काढतेय, तेवढ्यापुरती मित्राजवळ जातेय, सेल्फी काढून झाला की पुन्हा लांब होत भांडण कंटिन्यू. असं एकदा दोनदा नाही तर बऱ्याचदा चालू आहे. आणि ती एक दीड मिनिटाची शॉर्ट फिल्म संपते.ते बघत असताना खूप हसायला येत, वास्तवावर अचूक बोट ठेवल्यामुळे ते सगळं बघायला गंमतही वाटते पण त्याचबरोबर न बोलून सेल्फीच्या मानसिकतेवर तो व्हिडीओ अचूक बोट ठेवतो. एकीकडे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. प्रत्यक्षात मूड चांगले नाहीयेत, कदाचित त्याचं नातं ब्रेकअपच्या वाटेवर आहे आणि तरीही आम्ही किती एकमेकांच्या प्रेमात आहोत, आम्ही किती आनंदात आहोत हे दाखवण्याचा तिचा अट्टाहास आहे. प्रत्यक्षात प्रेम आहे की नाही त्यानाही माहित नसताना सोशल मीडियासाठी मात्र त्यांनी स्वतःच्या प्रेमाचं एक अभासी जग निर्माण केलं आहे.

 

सेल्फीचा खेळच मोठा रंजक असतो आणि तो संपूर्णपणे स्तुतीपाठकांवर अवलंबून असतो. सहज निरीक्षण करा, तुम्ही जेवढे म्हणून पोस्ट सोशल मिडीयावर टाकले असतील त्यातल्या सेल्फी आणि इतर फोटोच्या पोस्टला सगळ्यात जास्त लाईक्स मिळाले असतील.काय आहे सेल्फी मागची मानसिकता? हल्ली तर सेल्फिचा इतका अतिरेक झाला आहे की जिवाचीही पर्वा उरलेली नाही. आपण किती भारी आहोत, ‘हिरो’ आहोत हे जगाला दाखवण्याच्या नादात जीव गेल्यानंतरही शुध्द येऊ नये यावरूनच सेल्फी हा प्रकार किती नशा आणणारा आणि आत्मस्तुतीची चटक लावणारा आहे हे लक्षात येतं. यातही काही ट्रेंड्स बघायला मिळतात. सतत आपल्या लव्ह लाईफचे, कुठकुठल्या एक्होटिक डेस्टिनेशनला दिलेल्या भेटींचे, बनवलेल्या ‘हटके’ पदार्थांचे सेल्फी टाकणाऱ्यांचीची संख्या प्रचंड आहे. आणि त्यांच्यात चढाओढ जबरदस्त आहे. या खेळाला फोटोशोपपासून निरनिरळ्या ॲप्सची मदत मिळतच असतेच. त्यामुळे सोशल मीडियात पोस्ट होणारा प्रत्येक फोटो सुंदर असतो, आकर्षक आणि हटके असतो. त्यामुळे अर्थातच त्यांना लाईक्स भरपूर मिळतात. जितके जास्त लाईक्स तितकी पुन्हा पुन्हा सेल्फी टाकण्याची ओढ अधिक. आपण कुल आहोत, आपण हॉट आणि सेक्सी आहोत, आपण हटके आहोत याची पावती घेण्याची धडपड सुरु असते. चेहऱ्यावरचे डाग, काळेपणा, डोळ्यांची चमक, योग्य प्रकाश योजना अशा अनेक युक्त्या करून फोटो ‘पर्फेक्ट’ करण्याची धडपड चालू राहते. या सगळ्याला सोशल मिडीयात आभासीच पण सकारात्मक प्रतिसाद मिळत राहिल्याने अनेक जण यात गुंतून पडतात.

 

 

सेल्फीचा खेळ हा स्वप्रतीमेचा खेळ आहे. चेहऱ्यापेक्षा मनाचा खेळ आहे.

आपण चांगले, वाईट, सुंदर कुरूप कसे दिसतो याची पावती मिळवण्याची धडपड, सेल्फीच्या मागे लागलेल्याला एका विचित्र कोषात घेऊन जाऊ शकते. आणि यासाऱ्यात आपल्या नात्याचं काय होतं, आपलं नातं पिक्चर परफेक्ट आपण दाखवतो पण ते तसं खरंच आहे का? आपण इतरांना दाखवायला खोटंखोटं जगतोय का, हे सारे प्रश्न मनातही येत नाहीत.नाती पोकळ होत आहेत का, हा प्रश्नही स्वत:ला विचारला जात नाही.

टॅग्स :सेल्फीसोशल मीडिया