lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > Friendship Day : अब मर, मैने बोला था मत कर! -असं म्हणून झापणारी मैत्री आहे ना आयुष्यात..?

Friendship Day : अब मर, मैने बोला था मत कर! -असं म्हणून झापणारी मैत्री आहे ना आयुष्यात..?

Frindship Day : जगण्याच्या वाटेवर दोस्त बदलतीलही, पण आपण बदलत नाही, कारण आपल्यातला दोस्त आपल्याला बदलू देत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 01:10 PM2021-08-01T13:10:38+5:302021-08-01T13:23:35+5:30

Frindship Day : जगण्याच्या वाटेवर दोस्त बदलतीलही, पण आपण बदलत नाही, कारण आपल्यातला दोस्त आपल्याला बदलू देत नाही!

Friendship Day: life is all about friends, what is friendship, answer is life is all about it.. | Friendship Day : अब मर, मैने बोला था मत कर! -असं म्हणून झापणारी मैत्री आहे ना आयुष्यात..?

Friendship Day : अब मर, मैने बोला था मत कर! -असं म्हणून झापणारी मैत्री आहे ना आयुष्यात..?

Highlightsदोस्ती क्या है? क्या है दोस्ती? -या प्रश्नाचं उत्तर दोस्तहो, कुणाला देता आलंय, एका वाक्यात बरोबर?

निशांत महाजन

दोस्ती क्या है? क्या है दोस्ती?
-या प्रश्नाचं उत्तर दोस्तहो, कुणाला देता आलंय, एका वाक्यात बरोबर?
गाळलेल्या जागा भरा किंवा संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असं म्हणत तरी कुठं येते दोस्ती आयुष्यात?
तिला ना कुठले प्रमेय, ना कुठली गृहितकं.
पुस्तकातल्या कुठल्याच चौकटीत बसू नये आणि तरी जगण्याचं पुस्तक व्यापून उरावी अशी ही जादू आहे.
ती जादू भेटते कशी? कुणाला? का?
याची काही उत्तरं नाहीत, आहेत त्या फक्त जाणीवा, हिंदीत म्हणतात ना, सिर्फ एहसास!
ये बतानेवाली, समझानेवाली चीज नहीं, ये सिर्फ महसूस की जा सकती है!
खरं सांगायचं तर ती महसूसही नाही होत, किंवा महसूस करुनही नाही भागत, ती ‘निभवावी’ लागते, आणि जिथं मित्रंचा संकटात निभाव लागतो तिथंच ती निभतेही, टिकतेही!
आणि म्हणून हा फ्रेण्डशिप डे!
ज्यानं त्यानं आपणच आपल्याला विचारावा हा प्रश्न की, खरंच आपण अशी दोस्ती निभावतोय का? दोस्त म्हटलं की फक्त विश्वास, स्वत:पेक्षाही जास्त त्याच्यावर जास्त भरवसा असा कुणी चेहरा येतो का डोळ्यासमोर?
आपल्याआधी आपला विचार करणारा, आपले कान धरणारा, आपल्याला लागेल असं बोलणारा, आपला मनसोक्त अपमान करणारा, पाठीत चार फटके मारणारा आणि सारं जग आपल्याकडेच पाठ करुन उभं राहिलं तरी आपलं साथ न सोडणारा.
असा कुणी मित्र असेलच आपला.
तर आपण नशिबवान आहोत!


आपण कधी हरतो, थकतो कधी जगण्याच्या वाटेवर
त्या वाटेवर आपल्याला हात देतो तो दोस्त.
आपल्याला उभारी देतो, समजावतो, उमेद दाखवतो,
पायाखालच्या वाटेवर नाही तर स्वत:च्या पावलावर विश्वास ठेव म्हणतो, तो असतो मित्र.
असा कुणी असेलच आपला मित्र.
तर आपण नशिबवान आहोत!
*****
शाळेत, आपल्याच बेंचवर बसून मोठा झालेला असतो तो,
कुणी आपल्या शेजारी आपल्या ऑफिसच्या डेस्कशेजारीच डेस्क लावून बसतो,
कुणी आपल्या बसमध्ये रोज असतो,
कुणी येतो शेजारी अवचित राहायला
आणि मग प्रश्न पडतो की, इतकी वर्षे याच्याशिवाय कसं काय आपण जगत होतो आयुष्य? किती सहज आपण आपलं जगणं वाटून घेतलं त्याच्यासोबत? किती सहज आजवरचा प्रवास त्याच्यासह केल्यासारखंच जगतोय आपण आता.
असा कुणी असेलच आपला मित्र.
तर नशिबवान आहोत आपण!
***
मित्र मित्र म्हणता, मैत्रीण नसते का अशी कुणी?
मुळात मित्र हा शब्द वाटत असला पुल्लींगी तरी अपेक्षित असतं त्यात निरपेक्ष मैत्र.
त्यामुळे मित्र काय नी मैत्रीण काय, त्यांना कुठं कळतात जगाची नाती?
त्यांना कुठं समजतात तीच ती जुनी वेढी, ज्यात मित्रला लिंगभाव जोडला जातो,
ज्यात मुलामुलींच्या मैत्रीला लावले जातात नियम,
त्यापलिकडे असतं मैत्र.
शारीर काही नसतं त्यात, असतं निखळ-अवखळ असं दोस्तीचं जिंदादील रुप.
ते रुप विसरुन जातं, कोण मुलगा नी कोण मुलगी.
त्यांना दिसतो फक्त आपला मित्र, दोस्त, आपलं मैत्र.
असं निखळ नजरेचं आणि नितळ मनाचं असेल कुणी आपल्या आयुष्यात.
तर खरंच समजा, नशिबवान आहोत आपण!


मग ऑनलाइन मैत्रीचं काय?
की ऑनलाइन नसतात का मित्र? की ते नुस्ते लाइक्स आणि अंगठय़ांपुरते.
तेवढयापुरतेच नसतात तिथंही काहीजण.
तिथंही भेटते, निखळ मैत्री.
होतात नव्या ओळखी.
जुळतात मनाचे धागे आणि दोस्ती तिथंही दाखवतेच आपले रंग.
फक्त तसा मित्र त्या आभासी जगात आपल्याला शोधता आला पाहिजे.
त्यासाठी आपलीही नजर हवी स्पष्ट.
त्या नजरेला सापडलंच असं मैत्र
तर खरंच समजा, नशिबवान आहोत आपण!
***
सगळ्यात महत्वाचं. नसेलही आपल्या आयुष्यात असा कुणी मित्र
तर आपण तसं होऊ!
विश्वासानं मित्र जोडू, जीवाला जीव देऊ,
मदतीला हात देऊ,
निभावू दोस्ती.
खरं सांगतो, तेवढं जरी जमलं.
तरी नशिबवान आहोत आपण!
 

Web Title: Friendship Day: life is all about friends, what is friendship, answer is life is all about it..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.