Join us  

छळणारं नातं तोडून टाकण्याची ‘हीच’ योग्य वेळ, आता नको ‘सहन’ करायला हे कसं ओळखाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 3:52 PM

नातं नकोसं होतं, छळतं, विखारी होतं, त्यात आनंदच उरत नाही तरी त्या नात्यातून बाहेर पडण्याची भीती वाटते, असं का?

ठळक मुद्देतुम्ही सतत दु:खी असता, निराश वाटतं किंवा तुम्ही अस्वस्थ असता. रागराग होतो?

संयोगिता ढमढेरे

नाती प्रत्येक व्यक्तीसाठीच खूप महत्वाची असतात. परंतु ती जोडण्याची, जपण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने स्त्रियांची असते. कारण कोणतही नातं टिकवून ठेवण्यासाठी जे कष्ट,सरबराई, सेवा, सुश्रुषा करावी लागते ती आजही स्त्रियांकडूनच अपेक्षित असते. नात्यांमधून मिळणारा विश्वास, आदर, प्रेम यातून घरात, कुटुंबात एकोपा निर्माण होतो. परंतु सगळ्या नात्यात हे शक्य होत नाही. अगदी जवळची वाटणारी नातीच सर्वात जास्त दु:ख देतात हे इतरवेळी ही खरं असलं तरी कोरोनाकाळात अनेक महिलांना आपल्या जोडीदाराबरोबरच्या नात्याचा काच सहन करावा लागला. जीवनात सगळ्यात कळीचं असलेलं जोडीदाराचं नातंच विखारी झालं की जगणंच नरक होतं. असं होण्यापूर्वी आपल्या नात्यात विखार येतोय हे वेळीच ओळखता यायला हवं. आपलं नातं विखारी झालं आहे का? असेल तर काय करावं याबद्दल माहिती सांगत आहेत आय कॉल संस्थेच्या समुपदेशक सिंधुरा तमन्ना.

 

(Image : Google)

जोडीदाराबरोबरचं नातं विखारी झालं आहे हे कसं ओळखावं?

अशा नात्यात एका व्यक्तीचं वर्तनाने दुसऱ्या व्यक्तीला भावनिक हानी होत असते, त्या नात्यात अनादर, असुरक्षितता, संघर्ष, सतत भय असतं किंवा एकाचा दुसऱ्याला पाठींबा नसतो.

अशा नात्याचे धोक्याचे इशारे कसे ओळखावेत?

तुम्ही सतत दु:खी असता, निराश वाटतं किंवा तुम्ही अस्वस्थ असता. रागराग होतो. बरेचवेळा थकायला होतं,हे सारखं होतं का?अशी नकारात्मक लक्षणं सुदृढ नात्यातही आढळतात पण ती तात्पुरती असतात. ही लक्षण कायम किंवा सतत जाणवत असतील तर तुमचं नातं विखारी झालं आहे हे समजावं. या नकारात्मकतेचा परिणाम म्हणून मानसिक आरोग्य ढळतं. आपण काही कामाचे नाही किंवा आपलं शरीर सुंदर नाही असं वाटून तुम्ही स्वत:च्या शरीराचा तिरस्कार करू लागता. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करणं सोडून देता. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाही. इतर कपल्सला आनंदी पाहिल्यावर तुम्हाला त्रास होतो. हा बदल तुमच्यावर प्रेम करणाऱ्या इतर व्यक्तींना जाणवतो ते तुम्हाला तसं बोलूनही दाखवतात. तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराची बाजू घेता.तुमच्या जोडीदाराबरोबर ही लक्षणं आणखी तीव्रतेने जाणवतात. तुम्ही कधी साधा सरळ संवाद साधू शकत नाही. नेहमी रागाने, जोराने बोलता, आदळआपट होते. दोषारोप केले जातात. तुमच्यावर सतत टीका, उपहास केला जातो किंवा लांबचलांब अबोला धरला जातो. जोडीदार तुमचं जगणं नियंत्रित करतो पैसे कुठे खर्च करायचे, तुम्ही काय कपडे घालायचे, कोणाशी बोलायचं हे ठरवतो. तुमचा मोबाईल, तुमचं बँक खातं तो बघू शकतो. तुमचं जगणं सगळीकडून नियंत्रित होत असल्याने तुम्हाला गुदमरायला होतं. तो स्वत: मात्र खोटं बोलतो, गोष्टी लपवतो. तुमच्या यशावर, कौशल्यावर जळतो. कधीही तुमचं कौतुक करत नाही किंवा कमी लेखतो. त्यामुळे तुम्हाला मनातलं काही बोलता येत नाही. काहीही बोललं की एव्हढा हंगामा होतो कि शेवटी तुम्हालाच जोडीदाराला समजवण्याची वेळ येते. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा त्यांच्यावर विसंबू शकत नाही.अनेकदा अशा नात्यात शारीरिक, लैंगिक हिंसा होत असते किंवा जोडीदारच स्वत:ला हानी पोहोचवण्याची धमकी देत असतो. कोणत्याही कारणासाठी तुम्ही हे सहन करण्याची गरज नसते.

(Image : Google)

तरीही हे नातं का टिकवलं जातं?

जोडीदारावर भावनिकदृष्ट्या अवलंबून असल्याने किंवा नात्यातून बाहेर पडण्याची भीतीमुळे हे नातं निभावलं जातं. या नात्यात सहन कराव्या लागणाऱ्या त्रासापेक्षा त्यातून बाहेर पडण्याची भीती जास्त असल्याने हे नातं चालू राहत. आपल्याला याहून जास्त काही मिळू शकत नाही. आपण एकाकी पडू अशा भीतीमुळे हे नातं टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो.

अशा नात्याला कसं सामोरं जावं?

नात्यात हिंसा असेल तर हे नातं ताबडतोब थांबवायला हवं. कोणत्याही कारणाने हिंसा करणं हे मान्य केलं जाऊ नये. हे थांबल पाहिजे, तुम्हाला आवडत नाही हे स्पष्ट बोललं पाहिजे. तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला या नात्याकडून काय अपेक्षा आहेत हे सांगायला हवं. त्याने काही बदल होतो का हे पहावं नाहीतर त्या नात्यातून बाहेर पडावं.परंतु तुम्ही अशा विखारी नात्यातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्याला पाठींबा देणाऱ्या, प्रेम करणाऱ्या काही व्यक्ती बरोबर आहेत याची तयारी करून घ्यावी. अशा नात्यात राहिल्याबद्दल स्वत:ला दोष देऊ नये. तसेच कधीतरी त्या व्यक्तीला उपरती होईल, ती माफी मागेल अशा भ्रमात राहू नये. धीर धरावा. आणि आयुष्य सामान्यपणे जगायला सुरुवात करावी. आणि पुन्हा अशा नात्यात गुंतले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)

आयकॉलविषयी..आयकॉल ही एक सर्व वय, भाषा, लिंग, लैंगिकतेच्या व्यक्तींच्या भावनिक आणि मानसिक प्रश्नावर फोन आणि इमेलवरून मोफत समुपदेशन देणारी टाटा सामाजिक शास्त्र संस्था (टीस)ची सेवा आहे. ९१५२९८७८२१ या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे.

टॅग्स :रिलेशनशिपघरगुती हिंसा