Join us  

पाडव्याला बायकोला काय गिफ्ट द्यायचं सुचेना? घ्या ३ हटके पर्याय, बायको होईल मनापासून खूश- दिवाळी होईल मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 1:48 PM

Diwali Padva Different Gift Options for wife from husband : साड्या, दागिने नेहमीचेच, त्यापेक्षा थोडं वेगळं काही देता आलं तर...

दिवाळी हा आठवडाभर चालणारा वर्षभरातील मोठा सण. या निमित्ताने आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, गोडाधोडाचे पदार्थ करतो आणि एकमेकांना गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. दिवाळी पाडवा हा नवरा-बायकोचे नाते दृढ करणारा दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी आवर्जून एकमेकांना अभ्यंग स्नान घालणे, गोडाधोडाचे जेवण करणे आणि बायकोने नवऱ्याला ओवाळणे अशी रीत आहे. ओवाळणी म्हणून नवरा आपल्या बायकोला काही ना काही गिफ्ट आवर्जून देतो. नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या या पाडव्याला बायकोला ओवाळणी म्हणून काय द्यावं असा प्रश्न जर नवरे मंडळींना पडला असेल तर त्यासाठी आज आपण काही सोपे पण हटके पर्याय पाहणार आहोत. यामुळे बायको नक्कीच खूश होईल आणि त्यामुळे तुमची दिवाळीही एकदम मस्त होईल. पाहूयात हे हटके पर्याय कोणते (Diwali Padva Different Gift Options for wife from husband)...

(Image : Google )

१. बॉडी मसाज ट्रिटमेंट

दिवाळीत आणि एरवीही बायका घरातली, बाहेरची कामं करुन खूप थकतात. अनेकदा कुटुंबाची काळजी घेताना त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कित्येकदा काम आणि इतर ताण यांमुळे त्यांची नीट झोप होत नाही की त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले जात नाही. या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर आणि शरीरावर एकप्रकारचा ताण आलेला असण्याची शक्यता असते. अनेकदा बायका पायदुखी किंवा पाठदुखीसारख्या तक्रारी करतात. अशावेळी त्यांना पार्लरमध्ये मिळणारा किंवा आयुर्वेदीक पद्धतीचा एखादा चांगला बॉडी मसाज मिळाला तर त्या नक्कीच मनाने आणि शरीरानेही रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकेल. इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर अशाप्रकारच्या सर्व्हीसेसची माहिती नक्की मिळू शकेल.  

२. सरप्राईज शॉर्ट ट्रीप

ट्रीप किंवा रोजच्या रुटीनमधून ब्रेक हा प्रत्येकालाच हवा असतो. महिला तर सकाळी उठल्यापासून घरातले, ऑफीसचे आणि सगळे काम करुन अनेकदा थकून जातात. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना रोजच्या कामातून आणि ताणातून आराम मिळावा यासाठी तुम्ही त्यांना एखाद्या १ डे किंवा २ डे सरप्राईज ट्रीपला नक्की घेऊन जाऊ शकता. यामुळे त्या नक्की खूश होतील आणि रिफ्रेश होऊन कुटुंबासाठी नक्कीच ४ गोष्टी जास्त चांगल्या करतील. पण तुम्ही त्या करत असलेल्या कष्टांची दखल घेत त्यांना वेगळी काहीतरी पाडवा भेट दिल्याने त्यांना जास्त आनंद होईल. 

३. छंदाशी निगडीत काही

महिला रोजच्या गोष्टीत इतक्या अडकून जातात की त्यांना त्यांचा व्यायाम, छंद याकडे लक्ष द्यायलाही अनेकदा वेळ होत नाही. पण आपल्या बायकोची लग्नाआधीची एखादी आवड आपल्याला माहित असेल तर त्याच्याशी निगडीत काही वस्तू किंवा एखादा क्लास तुम्ही तिला आवर्जून लावून देऊ शकता. यामध्ये खेळ, कला अशा कोणत्याही गोष्टींचा समावेश असू शकतो. नेहमीचेच कपडे, वस्तू, पैसे, दागिने असे काही गिफ्ट देण्यापेक्षा हा पर्याय त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गरजेचा असू शकतो.

टॅग्स :दिवाळी 2023रिलेशनशिपरिलेशनशिपगिफ्ट आयडिया