Join us  

वैवाहिक आनंदातले चढ-उतार आणि गैरसमज यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 3:32 PM

वय, बाळांतपण यासारख्या गोष्टींनी कामजीवनातल्या आनंदात चढ उतार येतातच. ते समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर कामजीवन आनंदाचं न राहाता मनावर आघात करणारं ठरेल!

डॉ. उर्जिता कुलकर्णी

वर्ष भरापूर्वी एक मध्यमवयीन जोडपं भेटायला आलं, तेव्हा पत्नीच्या योनीमार्गाचे सैल झालेले स्नायू ही त्यांची समस्या, आणि त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचलेला उपाय म्हणजे, योनीमार्गाची एक प्रकारची शस्त्रक्रिया करून त्यातले स्नायू पुन्हा बळकट करून घेणं किंवा वेगळ्या म्हणजे वैद्यक शास्त्र आणि सौंदर्यशास्त्र मिळून उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींतून हाच परिणाम साधून घेणं. यावर त्यांना सल्ला हवा होता.

योनीमार्गाचे स्नायू ढिले का पडतात?

१. योनी ही स्नायूंनी बनलेली आहे. त्यातही या स्नायूत काही अंशी इलॅक्टिसिटी म्हणजे लवचिकता असते. ही लवचिकता विशेषत: मूल जन्माला येताना उपयुक्त ठरते. तशीच ती संबंधांच्या वेळेस योनीचं आकुंचन- प्रसारण पावताना देखील उपयुक्त ठरते.२. सर्वसाधारण स्त्रीचं असणारं वयोमान, तिचं एकंदरीत सक्रीय कामजीवन, काही आजार, किंवा हार्मोनल उपचार, तसेच योनिमार्गाद्वारे झालेल्या प्रसूतीची संख्या, या साऱ्याच बाबींवर स्त्रीच्या योनीमार्गातील स्नायूंचं आरोग्य ,लवचिकता इत्यादी अवलंबून असते.३. लैंगिकदृष्ट्या परिपक्व, तरूण स्त्रीच्या योनीतील स्नायू अर्थातच घट्ट, आणि संबंधांच्या वेळेस स्त्री-पुरु ष दोघांसाठीही संबंध जास्त आनंददायक करणारे असे असतात. अगदीच साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, जसे पुरुषांच्या लिंगाची ताठरता ही अनेक बाबींवर आणि त्यातही वयोमान, त्यानुसार असणारे हार्मोन्स , कामेच्छा इत्यादींवर अवलंबून असते, ते आणि तसेच स्त्रियांच्या योनीच्या स्नायूंबाबत! स्त्रियांसाठी यात भरीस भर म्हणून योनिमार्गाद्वारे प्रसूती हाही एक भाग असतोच. त्यामुळे, हे स्नायू कमकुवत होऊ शकतात. यातून संबंधामधील आनंदात दोघांसाठीही काही अंशी फरक पडू शकतो. पण इथे मानसिकता फार महत्वाची असते. शिवाय संबंध ठेवताना त्यात वैविध्य आणल्यास, त्याबाबत योग्य मार्गदर्शन घेतल्यास यातील निराशा कमी होऊ शकते.

यावर उपाय काय?

१. शरीरातील इतर स्नायूंसारखीच या स्नायूंची काळजी देखील महत्वाची.२. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर, काही जोडपी ताबडतोब संबंध ठेवू इच्छितात. तिथे योनीतील स्नायूंना पूर्ववत होण्यासाठी आवश्यक तो वेळ दिलाच जात नाही. साधं उदाहरण, आपल्याला चालण्याची माफक सवय असताना; आपण जर अचानक एक दिवस दहा किलोमीटर चालत राहिलो, तर आपल्या पायाच्या स्नायूंमध्ये थकवा तर जाणवतोच परंतु जडत्वही येतं, काही काळ कसलीही हालचाल करता येत नाही. तिथे त्यांना योग्य तो अराम देऊन, काळजीपूर्वक पूर्वस्थितीला आणणं गरजेचं असतं. तसेच योनीच्या स्नायूंबाबत. प्रसूतीनंतर, काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करणं आत्यंतिक गरजेचं असतं. त्यातून प्रसूतीच्या वेळेस ताणले गेलेले स्नायू पुन्हा पूर्ववत होतात. हे व्यायाम सातत्यानं करावे लागतात.३. तज्ज्ञांच्या परवानगीनेच प्रसूतीनंतर संबंध ठेवण्यास सुरुवात करावी. ती हळूवार असावी. शिवाय या मध्ये कुठेही वेदना जाणवल्यास, किंवा कोणत्याही प्रकारे काही स्त्राव योनीतून येतायत असं जाणवल्यास त्यावर ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.४. योनीमार्गाचा असणारे व्यायाम, हे केवळ प्रसूतीनंतरच करावेत असं नाही. ते कायमच सर्व वयात करता येतील. त्यातून स्नायूंची लवचिकता व्यवस्थित राहील. याचसोबत आपलं एकंदरीत आरोग्य यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित केल्यास, शरीरातील हार्मोन्स प्रमाणही संतुलित राहून त्याचेही दुष्परिणाम टाळता येतील.५. स्त्रियांनी नियमित कामजीवनात रस घेऊन सक्रीय असणं, हे देखील योनीतील स्नायूंसाठी अत्यंत फायद्याचं. कारण रती निष्पत्तीत, किंवा मिलनाच्या सर्वोच्च पातळीवर हे स्नायू आपसूकच अधिकाधिक, बळकट होत राहतात. इथे प्रमाणापेक्षा अधिक संबंध ठेवल्यास स्नायूंना थकवा येतो, किंवा त्यांचं कार्य मंदावतं हेही लक्षात घेणं गरजेचं, हीच गोष्ट  हस्तमैथुनाबाबत लक्षात ठेवणंही गरजेचं.

शस्त्रक्रिया आणि इतर सौंदर्योपचार.

हे अर्थातच ज्या त्या जोडप्याच्या, स्त्रीच्या, त्या विशिष्ट व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते. अनेकदा वयानं प्रौढ असलेल्या स्त्रिया केवळ जोडीदाराला अपेक्षितआहे, किंवा उशिरा लग्न घडत आहे, म्हणून,योनीसमोरील पडदा- हायमेन हे देखील पुन्हा तयार करून घेतात. यातून संभोग करताना, जोडीदाराला, स्त्रीच्या कौमार्याची अनुभूती मिळते.इथे हायमेन किंवा हा पडदा, हा कालांतरानं, वयानुसार, शिवाय शरीराच्या घडणाऱ्या क्रि यांवर जसे खेळ, इतर कामं, यातून आपसूक नाहीसा होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाय स्त्रीचं कौमार्य हे केवळ या एका पडद्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून नाही हेही. कोणत्याही स्त्री-पुरुषानं लग्नापूर्वी, एकत्र राहण्यापूर्वी एकमेकांकडून कौमार्याची अपेक्षा ठेवणं, अर्थातच या आधी शारीरिक संबंध आलेले नसावेत ही अपेक्षा ठेवणं हे खरोखरच इतकं रास्त आहे का, याचाही विचार घडला पाहिजे. विशेषत: आजकाल, जेव्हा सहजीवन हे कोवळ्या वयात सुरु न होता, अनेकदा तिशी किंवा चाळिशीच्याही पुढे सुरु होतं तोपर्यंत आपल्या भावी जोडीदाराने सेक्स अनुभवलं नसेलच हे कशावरून?त्यामुळे स्त्रीच्या कौमार्याशी उगाचच जोडला गेलेला तिच्या योनीसमोरचा पडदा अर्थात हायमेन पहिला संबंध येण्यापूर्वी तिथे असलाच पाहिजे यासाठी स्त्री-पुरु ष दोघांनीही आग्रही राहू नये. अगदी तसेच योनीतील स्नायूंच्या बाबत. त्यातही त्यात आलेली शिथिलता काढून टाकण्यासाठी आपण काय प्रकारचे उपचार घेत आहोत, त्याची परिणामकारकता किती हे देखील तपासणं गरजेचं. मुळात त्याची आवश्यकता आपणाला का भासते याचेही उत्तर वैयक्तिक पातळीवर नक्कीच शोधात येईल.योनीतील स्नायूंचे किंवा एकंदरीत हे सर्वच उपचार याबाबत व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थान, याहीपेक्षा मानसिकता फार महत्वाची. स्त्री-पुरु ष संबंध याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन महत्वाचा. त्यातील नैसर्गिक चढ-उतार समजून घेण्याची आणि त्यातून सहजतेनं मार्ग काढण्याची, आनंद घेण्याची इच्छाही तितकीच महत्वाची. अन्यथा सेक्स , कामजीवन हा आनंदाचा भाग न राहाता, त्रसदायक बळजबरीचा, किंवा मनावर आघात करणारा भागही होऊ शकतो!वर म्हटल्या प्रमाणो उपचार उपलब्ध आहेतच. मात्र त्यासाठी कोणत्याही जाहिराती, प्रलोभनांना बळी न पडता, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जावं हे नक्की.

 (लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ असून मानसोपचार , लैंगिक समस्या या विषयात समुपदेशन करतात.) 

टॅग्स :महिलाआरोग्यलैंगिक जीवन