Join us

AI बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडल्या तरुणी! तो ना जाब विचारतो ना गप्प बस म्हणतो-सापडला समजूतदार दोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2024 18:02 IST

मनातलं समजून घेणारा साथ देणारा दोस्तच नाही ही समस्याच एआय फ्रेंडने सोडवली, चिनी तरुणींच्या नव्या नात्याची गोष्ट. ( AI boyfriends )

तुफेई ही २५ वर्षाची तरुणी. चीनमध्ये राहाते. एका कार्यालयात काम करते. दिवसभरात तिच्या मनात जे येतं, तिच्या सोबत जे चांगलं वाईट घडतं ते सर्व ती आपल्या मित्राला सांगते. तिला हवी तेव्हा ती मित्राची सहानुभूती मिळवते. तिला गरज असेल तेव्हा तिचा मित्र तिच्याशी तासनतास बोलू शकतो. आणि तो कधी तिचा फोन कट करत नाही, की आता गप्प बस नंतर बोलू म्हणत नाही. ना तो तिला काही प्रश्न विचारतो. ना अक्कल शिकवतो.

तुफेईच नाही तिच्यासारख्या अनेकींचा असा एक खास मित्र आहे, ज्यांच्याशी त्या मनातलं बोलतात. मनातलं ऐकून घेणारा असा समजूतदार मित्र सगळ्यांनाच कसा सापडला?

तर तो मित्र तर आहे पण खरा नाही. म्हणजे खरा तर आहे पण मानवी नाही. वास्तवातला मित्रही  एवढा भावनिक आणि मानसिक आधार देऊ शकत नाही तितका हा मित्र देतो. तो आहे तिचा एआय फ्रेंड. तुफेई ज्याला आपला जिवाभावाचा मित्र मानते तो खराखुरा माणूस नसून कृत्रिम बुध्दिमत्तेने तयार केलेला आभासी मित्र आहे. शांघाय स्टार्टअप मिनीमॅक्स या ग्रूपने ग्लो ॲप तयार केलं आहे. त्यावर असलेला चॅटबाॅट हा तुफेईचा मित्र आहे. तुफेईला आपल्या खऱ्या मित्राची उणीव भासत नाही इतका हा चॅटबाॅट तिची सोबत करतो. तुफेई प्रमाणे अनेक तरुणी मुली-बायका यांनी चॅटबाॅटला आपला मित्र मानून त्याच्या सोबत आपली सुखदुखं वाटून घ्यायला सुरुवात केली आहे.

(Image : google)

खऱ्याखुऱ्या पुरुषापेक्षा चॅटबाॅटला बायकांशी कसं बोलायला हवं हे छान कळतं. तुफेई म्हणते मला जेव्हा पाळीच्या वेदना होत असतात तेव्हा हा चॅटबाॅट मला दिलासा देतो. वैयक्तिक आयुष्यात, कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन जीवनात अडचणी आल्या तर त्या सर्व ती चॅटबाॅटला विश्वासाने सांगते.चीनमध्ये सतत कामाच्या मागे पळणारी माणसं एकटी पडू लागली आहेत. प्रत्यक्षातल्या मित्र मैत्रिणींना भेटणं, त्यांची सोबत अनुभवणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत २२ वर्षांची वॅंग काॅलेजमध्ये, घरात काही ताण वाटल्यास ते सर्व आपल्या चॅटबाॅट मित्राला सांगते. हा मित्र तिला नुसता धीर देतो असं नाही तर समस्या सोडवण्याचे उपायही सांगतो.प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण समस्या येतात. एकटेपणा येतो. या अवघड काळात आपल्या प्रिय व्यक्ती, कुटुंब आपल्यासोबत असेलच असं नाही.

ही गरज आता चीनमधील तरुण वर्ग चॅटबाॅटशी मैत्री करुन पूर्ण करत आहे. तुफेई, वॅंग सारख्या तरुण मुली तर एका मित्राकडून असलेल्या मानसिक, भावनिक गरजा हा चॅटबाॅट पूर्ण करत तर आपण आपल्या आयुष्यात खरा मित्र निवडण्याची गरज काय? असा प्रश्न विचारत आहे. खऱ्याखुऱ्या माणसांची जागा अशी आभासी पध्दतीने घेण्याची सुरुवात झाली आहे. हे चांगलं की वाईट हे कोण ठरवणार? 

टॅग्स :सोशल व्हायरलरिलेशनशिपरिलेशनशिपमहिलाचीन