Join us  

अनुराग कश्यप डेन्मार्कच्या न्यूड बीचवर गेले , आणि..! ते सांगतात, तिथे पाहिलेले दृश्य अजब होते कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:19 PM

पुरुषांच्या आयुष्यातली  सिक्रेट्स: वाचा यावर्षीच्या 'लोकमत दीपोत्सव' मध्ये!

मी मुलांच्या वसतिगृहात लहानाचा मोठा झालो. वडिलांनी मला दोन वर्षे आधीच शाळेत घातले. त्यामुळे मी दिसायला, वागायला इतरांपेक्षा लहान होतो. पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये वेगळीच क्रूरता असते. कोणाला तरी धक्का दिल्याशिवाय, तुडवल्याशिवाय त्यांना आपण 'मर्द' होत चाललोय, असे वाटत नाही.

त्यासाठी ते कमजोर निवडतात. मी तसा होतो. मग मी अनेकांचा मार खात होतो. शेवटी लायब्ररी माझी मैत्रीण झाली. तिथे मला सुरक्षित वाटायला लागले. हळूहळू काही मुली मला भेटल्या. त्या सेक्श्युअली धीट होत्या. आपल्या लैंगिक प्रेरणा सांगणा-या मुलींशी बोलणे खूप छान असते. कारण त्या स्पष्ट असतात. ढोंगी नसतात.

अशा मुलींना बाकी लोक 'बदतमीज' समजत असल्याने त्यांना कोणी मित्र नसतात. मैत्रिणी तर नाहीच. अशा मुली माझ्या आयुष्यात आल्या. त्या मला अधिक 'सेफ' वाटू लागल्या. त्यांच्या सहवासात मी वाढत गेलो. मग अशी मैत्री होते की 'जेंडर' गळून पडते. अशा मुली आणि स्त्रियांनीच मला वाढवले.

त्यामुळे जेंडरशिवाय मुलींकडे पाहाणे मला शक्य झाले. त्यातून मुलींशी माझे वेगळेच नाते तयार होत गेले. मी स्क्रीनवर दाखवतो, तशाच स्त्रिया  प्रत्यक्षात असतात. पुरूषांनी तयार केलेल्या सुशील, सुंदर  स्त्रीच्या  प्रतिमा ख-या नाहीत.'अशा' स्त्रिया  पुरुषांना हव्या असतात; प्रत्यक्षात स्त्रिया  त्यापेक्षा वेगळे जगू पाहातात.

 'गॅंग्ज'मध्ये नवाजुद्दीन म्हणतो, "सब का बदला लेगा तेरा फैजल', तो डायलॉग लोकप्रिय झाला. पण, त्यापूर्वी रिचा त्याला म्हणते की 'तेरा खून क्यों नही खौलता?' याचा अर्थ बदल्याची भावना स्त्रीमध्येही असते. फक्त पुरूषात नाही. पण पुरुष अधिक हिंसक असतात,असा एक सर्वसाधारण समज का आहे..?

हिंसा, बदला हे सगळ्यांच्याच मनात असते. असू शकते. पण स्त्री आणि पुरूष यात फरक आहे. बाईमध्ये वेदना सहन करण्याची क्षमता जास्त आहे आणि भावनिकदृष्ट्या ती अधिक श्रीमंत आहे. तिच्यात अधिक करूणा आहे. मुख्य म्हणजे तिच्यात असुरक्षितता कमी असते. पाच बायका एका बाथरूममध्ये एकत्र नग्न आंघोळ करू शकतात. पुरूषासमोर 'मर्दानगी' हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे दोन पुरूष एकमेकांसमोर नग्न उभे राहायला घाबरतात. मी डेन्मार्कला गेलो होतो. तिथे न्यूड बीचवर मोकळ्या जागेतच सगळ्यांना कपडे काढायचे होते. माझ्यासोबतचे बाकी देशातले पुरूष फटाफट कपडे काढत होते.

मी मात्र इतरांनाच न्याहाळत बसलो.. आपल्यात इतरांपेक्षा काही कमी तर नाही ना, अशी भीती होती. नंतर मला कळले की मीच इतरांकडे बघतो आहे. बाकी कोणी कोणाकडे बघत नाही. माझी अंडरवेअर काढायला मला अर्धा तास लागला, त्यातून मला भारतीय पुरूषांची असुरक्षितता समजली. ही असली असुरक्षितता स्त्रीमध्ये नाही. तिची प्रिय व्यक्ती, तिचे कुटुंब धोक्यात येते, तेव्हाच ती चिडते.

याउलट पुरूषाची सर्वाधिक असुरक्षितता स्त्रीमुळेच तर आहे. त्याला 'सेक्शुअल परफॉर्मन्स'चे दडपण असते. त्याला कायम स्खलनाचे भय आहे! स्त्रीची लैंगिक प्रेरणा अफाट आहे. 'बायॉलॉजिकली' तिच्या गरजा वेगळ्या आहेत. तिला आपण खुश करू शकतो की नाही, या दडपणात पुरुषाचा लैंगिक व्यवहार असतो. तो वखवखलेला असतो. स्त्री मात्र त्याकडे फार वेगळ्या स्तरावर पाहात असते. त्यामुळे ती शांत असते.  

(लोकमत दीपोत्सव २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखातील अंश )

लोकमत दीपोत्सव अंक मागवण्यासाठी  संपर्क

ऑनलाईन बुकिंग deepotsav.lokmat.com

सवलतीच्या दरात ग्रुप बुकिंगसाठी संपर्क फोन– 1800-233-8000 आणि 960-700-6087 (सकाळी ११ ते संध्याकाळी ५)

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपदिवाळी 2023