Join us  

‘तिला’माझ्या परवानगीची मुळात गरजच काय? फुकट सल्ले देणाऱ्या अभिषेक बच्चन म्हणाला, विचार करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 5:51 PM

Abhishek Bachchan Reacts to Fan Asking him Letting Aishwarya Work More : नवऱ्यानं बायकोला परवानगी देणं, स्वातंत्र्य देणे याचे कौतुक किती सहज केले जाते? पण ही मानसिकता काय सांगते, तेच जे अभिषेक बच्चन म्हणतोय..

दिल धडकने दो सिनेमात एक प्रसंग आहे. आयेशा अर्थात प्रियांका चोप्राचा नवरा म्हणत असतो आमच्या खानदानात आजवर कुणी बाईने घराबाहेर पाऊल नाही ठेवलं पण मी आयेशाला ‘अलाऊ’ केलं, परवानगी दिली बिझनेस करायला. त्यावर सनी अर्थात फरहान अख्तर म्हणतो ‘तुमने अलाऊ किया?’ तिला तुझ्या परवानगीची गरज काय? जेव्हा एक माणूस दुसऱ्याला काही करण्याची परवानगी देतो तेव्हा त्यात अभिप्रेत आहे की एकजण उच्च पदावर आहे दुसरा नाही. ही सिच्युएशन फिल्मी असली तरी प्रत्यक्षात असंच घडतं. अनेक यशस्वी पुरुषांचं कौतुक करताना कुणी सहज म्हणतं की त्यानं बायकोला किती स्वातंत्र्य दिलं आहे. याच मानसिकतेला सडतोड उत्तर अभिषेक बच्चनने नुकतंच दिलं. गोष्ट छोटी असली तरी पुरेशी बोलकी आहे (Abhishek Bachchan Reacts to Fan Asking him Letting Aishwarya Work More)..

(Image : Google)

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अभिषेक बच्चन. ऐश्वर्या रॉय ही विश्वसुंदरी अभिषेकची पत्नी, नुकताच तिचा पोन्नियन सेल्वन २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पोन्नियन सेल्वन ही अतिशय बीग बजेट फिल्म असून आता पहिल्या भागासाठी २५० कोटींचे बजेट होते.  ऐश्वर्याच्या अभिनयाची अनेकांनी तारीफही केली. त्यानिमित्त अभिषेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने या चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन करत ऐश्वर्याचेही विशेष कौतुक केले आहे.  त्याच्या या ट्विटवर नेटीझन्सनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एकानं अभिषेकला सल्ला दिला की, ऐश्वर्याला जरा अजून जास्त सिनेमे साइन करु दे..

त्यावर अभिषेकने दिलेलं उत्तर मोठं बोलकं आणि आपल्या सामाजिक वास्तवावर अचूक बोट ठेवणारं आहे.  तो म्हणतो, तिला मुळात माझ्या परवानगीची गरजच काय? मी कशाला काही सांगू? तिचं ज्या गोष्टीवर प्रेम आहे, जे तिला आवडतं ते करण्यासाठी ती समर्थ आहे. तिला आवडेल ते ती करेल..’ नवऱ्यानं बायकोला अमूक करायला परवानगी देणं, तिनं मागणं.. हे आपल्याकडे इतकं गृहित धरलं जातं की असं काही डोळ्यासमोर आलं की कळतं की खरंच आहे, कुणी कुणाची परवानगी का घ्यावी? जोडीदारांनी चर्चा करुन काही गोष्टी ठरवणं, करणं, सल्ला मागणं वेगळं पण दुसऱ्याच्या वतीने काही निर्णय घेणं उचित कसं असेल?

निमित्त अभिषेकच्या उत्तराचं असलं तरी ते पुरेसं बोलकं आहे, ज्यानं त्यानं आपल्या नात्यात तपासून पाहावं असं, इतकं धारदार.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन