Satya Paul and his designer saris | सत्याची साडी

सत्याची साडी

-प्रसाद माळी

साडी खरेदी करून मिळणारं समाधान शब्दांत व्यक्त होत नाही असं म्हणणारे अनेकजण/ जणी मला माहीत आहेत. सुंदर मोहक, रेशमी साड्या भुरळ घालतात. स्त्रियांनाच कशाला, पुरुषांनाही. त्यातलंच एक नाव म्हणजे सत्या पॉल. जेव्हा भारतात मुंबईमध्ये खटाव साड्या नेसल्या जात होत्या, भारतभरात विकल्या जात होत्या, नल्ली हे दुकान नुकतेच मुंबईत उघडले होते तेव्हा दिल्लीत सत्या पॉल नावाच्ं फक्त साडी विकणारं दुकान सुरू झालं. वर्ष होतं १९८५. ते दुकान आजही आहे. आज जगभरात सत्या पॉल हा एक ब्रँड झाला आहे.

मात्र, त्यांची गोष्ट भारी वेगळी आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्म झालेले सत्या पॉल फाळणीनंतर दिल्लीत आले. प्रथम हॉटेल आणि मग टेक्सटाईल क्षेत्रांत त्यांनी काम सुरू केलं. टेक्स्टाईल एक्सपोर्ट क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी आपल्या आठवीत असणाऱ्या मुलासोबत एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. मुलाला विचारलं शाळेत शिकायचं आहे की काम करायचं आहे? मुलानं कामाचा पर्याय निवडला. सत्या यांनी आपल्या मुलासोबत अनेक देश फिरून अनेक रंग आकृती चित्र याचा देशी मिलाफ साधला आणि सत्या पॉल हा प्रसिद्ध साडी ब्रँड तयार केला. विविध रंग एकाच साडीत इंद्रधनुष्य असावे असे उतरतात ती साडी म्हणजे सत्या पॉल कलेक्शन असं एका वाक्यात सत्या यांचं कौतुक होतं. काळा, पांढरा, केशरी, हळद पिवळा, गुलाबी, लाल, गुलबक्षी फिरोजी, राखी रंग मोरपिशी असे उत्सवी रंग जेव्हा सत्या यांनी एकाचवेळी साडीत आणले आणि अनेक भिन्न भिन्न आकारात या रंगांचा अनोखा खेळ रंगला. फक्त साडी ही स्टाइल स्टेटमेण्ट करण्यात सत्या यांनी प्रयत्न केले. झेब्रा प्रिंट, पानांच्या मोठ्या आकृती, फुलांच्या पाकळ्या या स्वरुपाच्या साड्या होत्या तेव्हा नवीन प्रकारच्या साड्यांची ओळख झाली ती सत्या यांच्याकडून. कॅलिग्राफी, अनेक शब्द, अंक, हिंदी, इंग्रजी अक्षर, पोलका डॉट यांनी या साड्या साजऱ्या झाल्या. टायिंग, डायिंग, ब्लॉक प्रिंटिंग या साऱ्याचा कलात्मक मेळ सत्या यांनी घातला. पूर्वी फक्त शिफॉन, जॉरजेट, क्रेप याच आधुनिक आणि मोहक कपड्यात असणाऱ्या साड्या आज रेशमी धाग्यातही आहेत.

प्रथम मंदिरा बेदी यांनी क्रिकेट समालोचन करताना सत्या पॉल साडी वापरली आणि हा ब्रँड अनेकांनी पाहिला. २०१४ साली मसाबा गुप्ता यांनी सत्यासाठी डिझायनिंगचं काम केलं. २०१५ साली गौरी खान यांनी सत्या ब्रँडला ३० वर्षे झाल्याच्या निमित्तानं साडी डिझायनर सोबत मॉडेल म्हणून काम केलं. उच्चभ्रू, अतीउच्च वर्तुळात, श्रीमंत स्तरात सत्या पॉल यांच्या साड्या पोहोचल्या.

एका परदेशी पत्रकाराने ‘व्हॉट इज युवर् प्रोडक्ट’ असा प्रश्न विचारला असता सत्या यांनी दिलेलं उत्तर म्हणजे, ‘दॅट इज् हिअर देअर अँड एव्हरीवेअर’ हे होतं. सत्या यांचे निकटवर्तीय सांगतात की डूज अँड डोण्टस न फॉलो करणारा माणूस म्हणजे सत्या. ज्याला रंगांचं आकर्षण होतं. मात्र, भारतीय कारागिरी हातमाग बंद पडत असताना पॉल यांनी व्यवसाय म्हणून उभं केलेले कामही वेगळं ठरलं.

२०१० पासून सत्या डिझाईन काम करण्यापासून दूर गेले. आपला सारा कारभार मुलाच्या हातात देऊन सत्या संन्यस्त जगत होते. कोइम्बतूर येथे इशयोग आश्रमात त्यांनी जगाचा निरोप घेतला. साडीच्या दुनियेतला हा आगळा माणूस होता.

prsdmali2018@gmail.com

Web Title: Satya Paul and his designer saris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.