Sardov Bread... It is so light! | हलका फुलका सारडोव्ह!
हलका फुलका सारडोव्ह!

-भक्ती सोमण

ब्रेड किंवा पाव आपण अगदी नियमित खातो. पोळी, भाकरी करण्याचा कंटाळा आला की उसळ किंवा रश्शाबरोबर ब्रेड सहज खाल्ला जातो. शिवाय सॅण्डविच, पिझा तर ऑल टाइम फेव्हरिटच असतं आपलं. त्यामुळे इतर महत्त्वाच्या जिन्नससारखंच ब्रेडही घरात स्वयंपाकातला अत्यावश्यक घटक म्हणून आठवणीनं आणला जातो. पण ब्रेड खाऊन छान वाटलंय असं कधी होतं का? मुळात चव लागते म्हणून ब्रेड खाल्ला जातो. पण पोटात गेला की पोट गच्च झाल्यासारखं वाटणं, पोट फुगणं, अस्वस्थ वाटणं असे त्रस सुरू होतात. हल्ली तर ब्रेड म्हणजे आरोग्याचा शत्रूच असं त्याकडे अनेकजण पाहतात. ब्रेडचं नाव अशा पद्धतीनं कुप्रसिद्ध असताना सारडोव्ह ब्रेड मात्र लोकप्रिय होत आहे. सारडोव्ह ब्रेडला रिअल ब्रेड असंही म्हटलं जातं. हा ब्रेड तयार करण्यासाठी कृत्रिम रीतीनं आंबवण्याची प्रक्रिया नसते. किंवा इतर कृत्रिम घटकही नसतात. यातील ग्लुटेनची मात्रही कमी असते. व्हाइट ब्रेड जे आरोग्याच्या दृष्टीनं घातक असतात ते जर नीट पाहिलं तर त्याचं फर्मेटेशन हे एकसारखं आढळतं. त्यामुळे ब्रेडचा आतला पोत हा अगदी एकसारखा असतो. शिवाय त्यात मैदा आणि तो फुलण्यासाठी यीस्ट घालतात. तीन तासात तयार होणारा हा ब्रेड खाल्ल्यानंतर तो  पटकन पोटात बसतो. असं असलं तरी हा ब्रेड आपण खातोच. मात्र, आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर या ब्रेडला पर्याय काय असाही प्रश्न निर्माण झाला. 
त्यामुळेच की काय आता ब्रेड हा प्रकार आवडणा:या बहुतेकांचा कल सारडोव्ह ब्रेडकडे झुकला आहे. सारडोव्ह हा काही कालपरवाचा प्रकार नाही.  तीस हजार र्वष जुना असा हा ब्रेड असून तो नैसर्गिक पद्धतीनं तयार केला जातो.
सारडोव्हची नैसर्गिक प्रक्रिया
हा ब्रेड करताना प्रामुख्यानं मीठ तसेच कणीक हे घटक वापरतात. त्याचबरोबर आजकाल मोहरी, बार्ली, मका, ओट्स, ज्वारी, बाजरीचं पीठ वापरलं जातं. हे पीठ एकत्र केलं जातं; मात्र सारडोव्हबाबतीत ब्रेड फुलविण्याची पद्धत ही अत्यंत वेगळी असते. ज्याप्रमाणो जिलबी करताना खमीर वापरलं जातं अगदी त्याचप्रमाणो हे ब्रेड वापरताना केलं जातं. त्यासाठी दहीही वापरलं जातं. हे सगळं सारण एकत्रित करून 22 ते 24 तास फुलवण्यासाठी ठेवून दिलं जातं. त्यातील वायू पूर्ण काढला जातो. असं ठेवल्यानं मिश्रणात बबल्स अर्थात बुडबुडे निर्माण होतात. त्यामुळे बेक झाल्यानंतर या ब्रेडचा पोत  एकसारखा दिसत नाही. त्याच्या वरचं कोटिंग म्हणजेच पृष्ठभाग हा जाड आणि खरबुडा असतो. खाताना तो कुरकरीत आणि मऊ लागतो. शिवाय पचायलाही अतिशय हलका असतो. ‘यीस्ट, बेकिंग पावडर न वापरता सारडोव्ह ब्रेड हे नैसर्गिक पद्धतीनं तयार केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनंही ते चांगलं आहे. त्यामुळे लोक आता असे ब्रेड खाण्याला पसंती देत आहेत.’ असं सारडोव्ह ब्रेडचे निर्माते उद्योजक दिनेश पोद्दार सांगतात. हा ब्रेड कसा बनवायचा हे आता बहुतेकांना नीट कळल्यानं आता हा ब्रेड आणखी लोकप्रिय झाल्याचं शेफ प्रसाद कुलकर्णी सांगतात.  आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं सारडोव्ह हे पचायलाही सोपं असतं. या ब्रेडमुळे आरोग्यास कोणताही त्रस होत नाही. या सर्व कारणांमुळे सारडोव्ह ब्रेडची लोकप्रियता वाढतेच आहे.

--------------------------------------------------------------------


आर्टिसन ब्रेडमेकर

आर्टिसन ब्रेडमेकर ब्रेडला आपल्या आवडीनुसार रंग आणि आकार देतात.  ब्रेडची ही किमया साधणा-यांना 
आर्टिसन ब्रेडमेकर म्हणतात. साध्या पाव किंवा ब्रेडपेक्षा या ब्रेडमेकर्सकडून लोक ब्रेड घेऊ लागले आहेत. इन्स्टाग्रामवर हे ब्रेड बनविणारे अनेक मेकर्स याबाबत मदत करू शकतात.

(लेखिका ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत  उपसंपादक  आहेत.)

 bhaktisoman@gmail.com

Web Title: Sardov Bread... It is so light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.