Purument in Goa .. Everyone love this market before mansoon | प्रेमात पाडणारा आणि हवं ते देणारा गोव्यातला पुरूमेंत 

प्रेमात पाडणारा आणि हवं ते देणारा गोव्यातला पुरूमेंत 

- नीता कनयाळकर

 पुरुमेंत’ या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेत झालेला आहे. पुरुमेंत म्हणजेच तरतूद. अर्थात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या खाद्योपयोगी जिन्नसांची साठवण.
गोव्यासारख्या समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या राज्यात जिथं सर्वाधिक काळ पावसाचा हंगाम चालू असतो तिथे पुरुमेंतची पोर्तुगीजच्या काळापासून वर्षानुवर्षे पारंपरिकतेनं चालत आलेली पद्धत आहे; जी आजर्पयत टिकून आहे. या साठवणुकीच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी इथली लोकं  पुरुमेंत बाजारासाठी आतुर असतात.  
वाडवडिलांकडून  ऐकलेली  गोष्ट ही की,  पूर्वीच्या काळात बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा.  किराणा दुकान पण गावागावांत नसायचं. स्वत:साठी स्वत:च पिकवा आणि खा हा नियम असायचा. अतिवृष्टीमुळे सगळ्या नद्या, नाले, झरे दुथडी भरून वाहायचे. आजूबाजूच्या गावात जायला रस्ता किंवा पूलपण नसायचा.  ये-जा करण्यासाठी असलेल्या होडय़ा पावसाळ्यात बंद असायच्या आणि त्यामुळे पावसाळ्यात लागणा-या खाद्योपयोगी जिन्नसांची  बेगमी केल्याशिवाय पर्याय नसायचा.
कालांतरानं दुचाकी, चारचाकी वाहनं दिसायला लागली. आठवडय़ातून एखादाच सार्वजनिक वाहन शहरात जाण्या-येण्याकरता असायचं. अगदी हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्याच चारचाकी गाडय़ा श्रीमंतांकडे असायच्या. परंतु सर्वसामान्य जनतेला वाट बघायला लागायची ती आठवडय़ातून येणा:या वाहनाची. जेणोकरून शहरात जाऊन सामान खरेदी करता यायचं आणि पावसाळ्यापूर्वी लागणा-या सगळ्या खाद्योपयोगी जिन्नासांची साठवण शक्य व्हायची. आदिवासी पाडय़ावरचे पुरुष जेव्हा शेतात कामावर जायचे तेव्हा महिलावर्ग फावल्या वेळात पावसाळ्यात लागणा-या खाद्योपयोगी जिन्नसांची  बेगमीची कामं करायचा. 
हळूहळू घरात साठवण करून राहिलेला जास्तीचा माल आठवडय़ाच्या बाजारात विक्रीसाठी जाऊ लागला. मालाला अपेक्षेबाहेर येणारी किंमत आणि मागणी आणि  त्या उत्पन्नातून होणारी आर्थिक मदत, रोजगारनिर्मितीसाठी एक खूप मोठा आधार बनून राहिला. स्वत:च्या  स्वावलंबीपणाचा  अभिमान, जोशानं काम करण्यासाठीचा उत्साह दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ  लागला.  कळत-नकळत आत्मविश्वास दृढ होऊ लागला आणि याच उपक्रमात नवनवीन बदल होऊ लागले. पूर्वीच्या पिढीतील पुरुमेंत आणि सध्याच्या पिढीतील पुरुमेंत यात जमीन-आस्मानचा फरक दिसून येतो.
वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेल्या जिन्नसांची यादी तशी भली मोठी आहे.
रानावनातून भटकून गोळा केलेल्या  कोकमाच्या गरापासून बनवलेले कोकम आगळ (रस); सालीपासून बनवलेली सुकी कोकम तर बियांपासून बनवलेलं  तेल. कच्च्या कैरीपासून बनवलेली आमसुलं, लोणची, मिठात मुरलेल्या अख्ख्या बाळ कै-या. पिकलेल्या आंब्यापासून बनवलेली आंबापोळी, कच्च्या फणसापासून बनवलेले वेफर्स, पिकलेल्या फणसापासून बनवलेली फणसपोळी, सुकवलेल्या आठळ्या. नारळापासून बनवलेलं तेल, सुकं खोबरं, सुकवलेल्या नारळाच्या पानापासून बनवलेले झाडू.
गोडय़ा रताळ्यापासून बनवलेले घोस (शेवया), कोहळापासून बनवलेल्या वडय़ा. लोणच्याचे प्रकार तर अनेक. कैरी, लिंबू, मिरची, ओली हळद , ओलं आलं, गाजर, भोकरं, करवंद. 
काजूच्या बिया आणि  कोळशावर भाजलेले खरपूस काजुगर. याव्यतिरिक्त गावठी (उकडा) तांदूळ, चिंच, विविध प्रकारच्या मिरच्या, कडधान्यं, मसाले, सांडगे, पापड, शेणाच्या गोव-या. आणि त्याशिवाय कुंडलं (मातीचं पसरट भांडं), बुडकुलं (मातीचं गोल भांडं)  हे सर्व या पुरुमेंत बाजारात असतं. मांसाहारी लोकांसाठीही भरपूर वैविध्य या बाजारात असतं.  
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार जरी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असली, पूर्वीसारखी पावसाळ्यात आबाळ होत नसली तरीही पुरुमेंतची मज्जा औरच आहे. ती कधीच ओसरणार नाही हेच खरं.  आजही गोव्यातल्या प्रत्येक गावागावांत पावसाळ्याअगोदर पुरुमेंत बाजार भरला जातो. त्या मागचा उद्देश हाच की चांगल्या प्रतीच्या उत्तम आणि ताज्या मालाची बेगमी करता यावी. महिलांच्या वैयक्तिक प्रगतीनुसार वाळवण प्रकारातसुद्धा कौतुकास्पद बदल होत चालला आहे. आतातर घरोघरी आंबावडी, जाम, मुरंबा, सॉसेस. असे अनेक प्रकार तयार व्हायला लागले आहेत. पुरुमेंत बाजारात हे जिन्नसही असतंच.
शेवटी पुरुमेंत, वाळवण, सुकवण हे सर्व एकाच माळेचे मणी. त्या मागचा उद्देश मात्र एकच. फक्त पद्धत आणि प्रकार तेवढे बदलतात.  पावसाळा तोंडावर आला की जगात कुठेही असलं तरी गोव्यातल्या माणसाला पुरुमेंत बाजाराची आठवणही होतेच, त्याला मीही अपवाद कशी असेल!

(लेखिका मूळ गोव्याच्या असून, उद्योजिका आहेत)

nitakanyalkar@hotmail.com

 


 

Web Title: Purument in Goa .. Everyone love this market before mansoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.