A powerful image of a volleyball player breastfeeding her baby on the field @ Mizoram | सात महिन्याच्या बाळासाठी ‘तिने’ केलं असं काही की, लोक म्हणाले मॉँ तुझे सलाम!
सात महिन्याच्या बाळासाठी ‘तिने’ केलं असं काही की, लोक म्हणाले मॉँ तुझे सलाम!

ठळक मुद्देइच्छा तिथे मार्ग हेच खरं.

माधुरी पेठकर

एक आठ दिवसापूर्वी लालवेंटलुआंगी नावानं इंटरनेटवर काही सर्च केलं असतं तर फार काही माहिती मिळाली नसती. पण चार दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक पोस्ट व्हायरल झाली आणि लावेंटलुआंगी हिची चर्चा जगभर सुरू झाली. 
असं काय केलं लालवेंटलुआंगीनं..?
खरंतर तिनं जे केलं ते पाहून कोणीही  तिच्यातल्या ममतेचं कौतुक करेल.  एक आईची जबाबदारी तिनं ज्या पध्दतीनं पार पाडली ते पाहून कोणाही नवख्या आईला प्रेरणाच मिळेल.!
लालवेंटलुआंगी ही मिझोरोममधली व्हॉलीबॉलपटू.  सोमवारी मिझोरोमच्या ऐझवाल या राजधानीच्या शहरात  ‘मिझोरोम राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा 2019 सुरू झाल्या. सोमवारी व्हॉलीबॉलचा सामना सुरू होता. लालवेंटलुआंगी ही मिझोरोममधील टुईकुम व्हॉलीबॉल संघाकडून खेळत होती.   अतिशय आक्रमकपणे  खेळत होती. प्रेक्षकांचं लक्ष त्यादिवशी लावेंटलुआंगीनं आपल्या खेळानं तिच्याकडे आकर्षून घेतलं होतं. सामन्याचा मध्यंतर झाला. खेळाडू विश्रांतीसाठी थांबले. तेव्हा लावेंटलुआंगी मैदानावरच्या खुर्चीत बसली.  आपल्या सात महिन्याच्या बाळाला तिनं मांडीत घेतलं आणि स्तनपान करू लागली.  तिच्या या कृतीनं पाहाणारे आवाकच झाले. 
निनग्लून हंघल नावाच्या व्यक्तीनं हा फोटो काढला. आणि फेसबुकवर  ‘स्टोलन मोमेंट टू फीड हर सेवन मंथ ओल्ड बेबी ’ या कॅप्शनसह पोस्ट केला.   ‘व्हॉलीबालपटू असलेल्या एका आईनं आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी खेळादरम्यानच्या वेळात चोरलेले काही क्षण’ असं म्हणत त्यानं या फोटोखाली मोठा  संदेशही लिहिला. काही क्षणातच ही पोस्ट व्हायरल झाली.  या पोस्टवर लाइक्सआणि कमेण्टचा पाऊस पडू लागला. 
लालवेंटलुआंगीनं लोकं काय म्हणतील याचा जराही विचार न करता खेळादरम्यान आपली आई म्हणून बाळाप्रती असलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. सात महिन्याचं बाळ घेऊन लालवेंटलुआंगीनं  संघात पुनरागमन केलं होतं.  ती मैदानावर असताना तिचं बाळ खेळाडूंच्या कॅम्पमध्ये होतं. बाळाला दूध वेळेवर पाजता यावं आणि खेळही मन लावून खेळता यावा यासाठी लालवेंटलुआंगीनं हा मार्ग काढला होता.
कोणत्याही खेळाडू, कलाकार, बिझनेसवुमन, नोकरदार महिलेस बाळ झालं की संपलं आता तिचं करिअर किंवा आता तिला काम थांबवावं लागेल, नोकरी सोडावी लागेल अशा चर्चा सुरू होतात. पण बाळ हे आमच्या कामात अडथळा नसतं हे अनेकींनी सिध्द केलं आहे. सानिया मिर्झा, सेरेना विल्यम्स , सोहा अली खान, नेहा  धुपिया या स्टार्स आयांनी एक  आई आणि आपलं करिअर यांच्यात उत्तम मेळ  घालून  आई होणार्‍या आणि आई झालेल्या  प्रत्येक स्त्रीपुढे आणि समाजापुढेही  उदाहरण ठेवलं आहे. लालवेंटलुआंगीसारख्या  खेळाडू महिला तर एक  खेळाडू आणि जबाबदार आई ही आपली भूमिका पार पाडताना  आपल्या  काही महिन्यांच्या बाळाला मैदानार्पयत  घेऊन येत आहेत.  त्यांच्या या कृतीनं बाळाच्या जन्मानंतर करिअर करू  इच्छिणार्‍या   महिलांना प्रेरणाच  मिळेल. शिवाय   आयांच्या मनातला  सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजण्यातला संकोच अन लाजही गळून पडेल. 
बाळ झाल्यानंतर आईनं काही महिन्यातच जर  घराबाहेर पडून आपलं काम सुरू केलं तर तिला स्वार्थी, निष्काळजी वगैरे दूषणं दिली जातात. पण आई झालेल्या बाईचं करिअरस्टिक असणं म्हणजे तिच्यात ममत्त्वं, बाळाबद्दलचं प्रेम नसणं असं नाही. एक आई आपलं प्रत्येक काम नीट करू शकते, आपली प्रत्येक भूमिका जबाबदारीनं पार पाडू शकतं हा त्याचा अर्थ आणि हाच अर्थ लालवेंटलुआंगीच्या मैदानावर बाळाला दूध पाजण्याच्या कृतीतूनही व्यक्त होतो. 

 


सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणार्‍या  महिलांसाठी व्यवस्था असली पाहिजे ही आज आपल्या देशातल्या प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या स्त्रीची अपेक्षा आहे आणि मागणीही. पण अशी जागा उपलब्ध नाही म्हणून केवळ लाज आणि संकोचामुळे बाळाची उपासमार करणं योग्य नाही याची जाणीव आता महिलांना होत आहे. 
लालवेंटुलुआंगीच्या बाळाला दूध पाजत असतानाच्या फोटोचं समाज माध्यमावर कौतुक होत आहे.  ‘ मॉं तुझे सलाम’,  ‘ग्रेट मदर अ‍ॅण्ड रिमार्केबल प्लेयर’,  ‘ सो केअरिंग, परफेक्ट मदर’ ,  ‘दॅटस व्हाय वू आर नॉट मदर्स, ओन्ली मदर्स आर मदर्स’ अशा शब्दात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.  समाजमाध्यमांवर व्हायरल होणार्‍या या फोटोची दखल मिझोरोमच्या क्रीडामंत्र्यानीही घेतली. तिच्या या कृतीचं कौतुक करत त्यांनी लालवेंटुलुआंगीला दहा हजार रूपयांचं बक्षिस जाहीर केलं.
गोष्ट छोटीच, कृती अगदी नैसर्गिक.. पण काय, कोणी, कुठे, कसं या प्रश्नांची उत्तरं लालवेंटुलुआंगीच्या मैदानात बाळाला दूध पाजण्याच्या संदर्भात बघता विशेष ठरतात. म्हणूनच लावेंटुलुआंगीचं कौतुक वाटतं आणि तिच्यापासून आईच्या जबाबदारीचा धडाही घ्यावासा वाटतो!

Web Title: A powerful image of a volleyball player breastfeeding her baby on the field @ Mizoram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.