Join us   

Sai Pallavi Birthday : फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहिरात नाकारणारी, सुपरस्टार साई पल्लवी- तिच्यासारखी धमक आहे कोणात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 3:54 PM

1 / 8
साऊथकडची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) कायमच तिच्या बोल्ड निर्णयांमुळे चर्चेत असते. तिच्यालेखी केवळ पैसा महत्त्वाचा नसून तिची तत्वही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे २ कोटी रुपयांची फेअरनेस क्रिमची जाहिरात ती अतिशय सहजपणे नाकारु शकते. तुम्ही जसं आहात तसं स्वत:ला स्वीकारा असं म्हणत आपण सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करणार नाही यावर ती ठाम आहे.
2 / 8
केवळ दक्षिणेकडेच नाही तर साई पल्लवीचे जगभरात असंख्य चाहते असून तिचा निरागस चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे चाहते तिच्यावर फिदा असतात. आज तिचा वाढदिवस असून यानिमित्ताने आपण तिच्या एकूण व्यक्तीमत्त्वाचा आढावा घेणार आहोत.
3 / 8
साई पल्लवीचे पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय असून ९ मे १९९२ मध्ये तामिळनाडूमध्ये तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन असून आईचे नाव राधा आहे. तिला पूजा नावाची एक लहान बहिणही आहे. साधेपणासाठी साई पल्लवी विशेष ओळखली जाते.
4 / 8
२०१५ मध्ये साई पल्लवीने प्रेमम या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यावेळी ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. या यशाची हवा डोक्यात जाऊ न देता साईने आपले राहीलेले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे पेशाने ती डॉक्टर असली तरी अभिनयाच्या क्षेत्रात तिने चांगलेच नाव कमावले आहे.
5 / 8
राहणीमान अत्यंत साधे असलेली साई पल्लवी अनेकदा आपल्याला नो मेकअप लूकमध्ये दिसून येते. अनेकदा चित्रपटांत किंवा सामान्य आयुष्यातही तिचे नो मेअप लूकमधले फोटो आपल्यासमोर येतात, यावरुन तिचा साधेपणा लक्षात येतो. तसंच अशाप्रकारे अभनेत्री असून नो मेकअप लूकमध्ये राहणं वाटतं तितकं सोपं नाही, पण तिने आपल्या हिमतीवर हे करुन दाखवले आहे. पहिल्या चित्रपटातच नो मेकअप लूकमध्ये काम केल्याने तिच्याबाबत बरीच चर्चा झाली होती.
6 / 8
चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात एक वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने स्वत:ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट केले आहे. इतकंच नाही तर तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.'फिदा' चित्रपटात एका खेड्यातील मुलीच्या 'पँडोरा'च्या भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवली. हा चित्रपट 'दशकातील 100 ग्रेटेस्ट परफॉर्मन्स'च्या यादीत समाविष्ट करण्यात आला आणि सईने 'पँडोरा' या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून बरीच पारितोषिके पटकावली.
7 / 8
अभिनयाबरोबरच साई पल्लवी ही तिच्या नृत्यकौशल्याबाबतही ओळखली जाते. नृत्यकला जोपासण्यासाठी आईने आपल्याला मदत केल्याचे साई आवर्जून सांगते. साईने आपल्या आईला नृत्यकलेबाबत सांगितल्यावर तिच्या आईने साईला ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दिक्षित यांचे व्हिडिओ दाखवले असे साईने एका मुलाखतीत सांगितले होते. पुढे तिने या कलेकडे योग्यप्रकारे लक्ष देऊन त्यामध्ये स्वत:ला तयार केले.
8 / 8
अतिशय कमी कालावधीत दक्षिण चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या साई पल्लवीला बॉलीवूडमधूनही काही ऑफर्स होत्या. मात्र तिने त्या ऑफर्स नाकारत काही काळ तरी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे ठरवले. आता ती अवघ्या ३० वर्षांची असून आतापर्यंत तिचे १५ सिनेमे प्रसिद्ध झाले आहेत. अशा साईला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
टॅग्स : सोशल व्हायरलसाई पल्लवी