स्टीलच्या नळांना - शॉवरला पांढरट डाग पडले? १ उपाय करा, नळ चमकतील नव्यासारखे चकाचक
Updated:May 14, 2024 15:52 IST2024-05-14T15:10:44+5:302024-05-14T15:52:43+5:30

बोअरवेलचं पाणी असेल तर बाथरुममधल्या नळाच्या तोट्या, शॉवर, हॅण्ड स्प्रे यांना लगेच पांढरट, भुरकट डाग पडतात. कारण बोअरवेलच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्याने हा त्रास होतो. यामुळे मग नळ नवे असले तरी काही दिवसांतच अगदी जुनाट दिसू लागतात.
नुसत्या साबणाने घासले तर हे डाग निघत नाहीत. म्हणूनच हे डाग काढून टाकायचे असतील तर या काही खास टिप्स पाहा.. यामुळे तुमचे भुरकट झालेले नळ अगदी नव्यासारखे चकाचक होतील. शिवाय त्यासाठी तुम्हाला खूप घासाघीस करण्याची गरजही नाही.
हे ३ उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो करा.
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कोणतेही टुथपेस्ट वापरणे. यासाठी सगळ्यात आधी पाणी शिंपडून नळाची तोटी ओलसर करून घ्या. यानंतर एका जुन्या झालेल्या टुथब्रशवर थोडं पेस्ट लावा आणि त्याने नळ घासून काढा. ५ मिनिटांनी पाणी टाकून स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर लगेचच कोरड्या फडक्याने पुसून काढा.
दुसरा उपाय करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा यांचा वापर करायचा आहे. यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा टाका. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला. आता नळावर पाणी टाकून तो थोडा ओलसर करून घ्या. यानंतर त्यावर लिंबू आणि बेकिंग सोडा चोळून लावा. नंतर पाण्याने धुवून लगेचच कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नळ चकाचक होतील.
तिसरा उपाय करण्यासाठी व्हिनेगरचा वापर सांगितला आहे. जर नळ खूपच जास्त घाण झाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर वापरा. यासाठी नळावर पेपर नॅपकीन गुंडाळा. त्यावर व्हिनेगर टाकून तो ओलसर करा. नंतर ५ मिनिटांनी घासणीने घासून घ्या.