Navratri 2022 : नवरात्रीसाठी कुमारीकांना काय द्यायचं प्रश्न पडलाय? घ्या एक से एक पर्याय, तुमचं काम होईल सोपं...
Updated:September 21, 2022 18:45 IST2022-09-21T18:31:17+5:302022-09-21T18:45:59+5:30

नवरात्री आली की आपण देवीची अतिशय मनोभावे पूजा करतो. त्याचप्रमाणे सवाष्ण महिलांना वाण आणि कुमारीकांना ओवाळून काहीतरी भेटवस्तू दिली जाते. दान करणे आणि स्त्रियांना मान देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो (Navratri 2022).
नवरात्र जवळ आले की कुमारीकांना काय द्यावे असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. त्यासाठीच आज आपण काही खास पर्याय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमची गिफ्टची निवड आणि खरेदीचे काम काही प्रमाणात सोपे होऊ शकेल.
लहान मुलींना देता येतील अशा बऱ्याच अॅक्सेसरीज बाजारात असतात. लहान मुलींना फ्रक किंवा कोणत्याही कपड्यावर मॅचिंग हेअरबँड, हेअर बो, क्लिप्स अशा गोष्टी लागतात. अशा गोष्टी होलसेल बाजारात अगदी २० ते ५० रुपयांपर्यंत मिळतात.
पाण्याची बाटली हा लहान मुलींना द्यायला एक उत्तम उपाय आहे. बाहेर कुठेही गेलो तरी पाणी पिण्यासाठी बाटली अतिशय आवश्यक असते. शाळा, क्लासेस किंवा फिरायला गेल्यावर पाणी प्यायला बाटली उपयोगी असल्याने हा चांगला पर्याय आहे. अगदी ५० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत चांगल्या बाटल्या बाजारात आणि ऑनलाईनही मिळतात.
लहान मुलींना शाळेसाठी किंवा क्राफ्टसाठी स्टेशनरीच्या वस्तू सतत लागतात. पट्टी, पेन्सिल, पेन, खोडरबर, खडू, स्केचपेन यांसारख्या वस्तू मुलींना दिल्यास त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.
लहान मुलींना भरपूर कपडे लागतात. बाजारात ताग्यातले किंवा कटपीस अतिशय छान मिळतात. असे कटपीस दिल्यास वेगवेगळ्या फॅशनचे फ्रॉक किंवा टॉप शिवून मुली घालू शकतात. कुमारीकांना देण्यासाठी कापड हा अतिशय चांगला पर्याय आहे.
पुस्तकं हाही लहान मुलींना द्यायला एक उत्तम पर्याय ठरु शकतो. अभ्यासाशिवाय वाचन वाढावे यासाठी गोष्टीची पुस्तके देता येऊ शकतात. त्या त्या वयोगटानुसार आपल्या बजेटनुसार पुस्तके दिल्यास मुलांची वाचनाची आवड वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते. अगदी ६० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत ही पुस्तकं बाजारात सहज मिळतात.