Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Updated:January 1, 2026 17:51 IST2026-01-01T17:46:48+5:302026-01-01T17:51:09+5:30
Beauty Jha : ब्युटीने मोमो विकता विकता आपलं सुंदर स्वप्न पूर्ण केलं आहे. आता डॉक्टर बनण्यासाठी ती MBBS चं शिक्षण घेत आहे.

जेव्हा आयुष्याने परीक्षा घेतली, तेव्हा तरुणीने संघर्षालाच आपली ताकद बनवलं. वडिलांची नोकरी सुटल्यानंतर खंबीर निर्धाराने ती कुटुंबाचा आधार बनली. स्वतःचं स्वप्न काहीतरी मोठं करण्याचं होतं, त्यामुळे त्या दिशेने तिची वाटचाल सुरूच राहिली.
दिवसा कित्येक तास मोमोज विकायची आणि रात्री अभ्यास करून आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला, अशा कठीण परिस्थितीत तिने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. ही संघर्षमय कथा आहे बिहारची लेक ब्युटी झा हिची.
ब्युटीने मोमो विकता विकता आपलं सुंदर स्वप्न पूर्ण केलं आहे. आता डॉक्टर बनण्यासाठी ती MBBS चं शिक्षण घेत आहे. तिच्या संघर्षाची आणि यशाची ही प्रेरणादायी गोष्ट जाणून घेऊया...
अनेक वर्षांपूर्वी ब्युटी झाचं कुटुंब चांगल्या भविष्याच्या शोधात बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून दिल्लीत आलं होतं. तिचे वडील एका फॅक्टरीत माळी म्हणून काम करत होते. मात्र, २०२० मध्ये त्यांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत आलं.
घराची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे ब्युटी आणि तिच्या आईने मोमोज विकण्यास सुरुवात केली. जेव्हा कधी तिला रिकामा वेळ मिळायचा, तेव्हा आजूबाजूच्या गोंधळतही ती आपली पुस्तकं घेऊन बसायची आणि मन लावून अभ्यास करायची.
ब्युटीच्या दिनचर्येत पहाटे आणि रात्री अभ्यास करणं आणि संध्याकाळी मोमोज विकणं यांचा समावेश होता. इतक्या अडचणी असूनही ब्युटीचं एकच स्वप्न होतं - डॉक्टर बनणं आणि स्वतःला पांढऱ्या कोटात पाहणं. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ती पुढे जात राहिली.
ब्युटीला हे समजलं की, केवळ शिक्षणाच्या जोरावरच गरिबीतून बाहेर पडता येतं. कोणत्याही मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटची साथ किंवा सुविधा नसतानाही तिने NEET २०२३ मध्ये ४८०९ वी रँक मिळवली.
सध्या ब्युटी दिल्लीतील प्रसिद्ध लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधून MBBS करत आहे. गरिबांवर मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात उपचार करणारी डॉक्टर बनणं हे तिचं ध्येय आहे.
ब्युटीच्या यशाची गोष्ट सांगते की, जर मेहनत आणि जिद्द असेल तर काहीही साध्य करता येतें MBBS ला प्रवेश मिळाल्याने केवळ तिच्या कुटुंबालाच अभिमान वाटला नाही, तर तिची कथा अशा लाखो तरुणांसाठी एक आदर्श आहे जे मोठी स्वप्नं पाहतात.